देवाचं राज्य कोणकोणत्या गोष्टी करेल?
येशूने आपल्या शिष्यांना देवाच्या राज्यासाठी प्रार्थना करायला शिकवलं. त्याला माहीत होतं की पृथ्वीवर घडणाऱ्या वाईट गोष्टी देवाच्या इच्छेप्रमाणे नाहीत. आणि फक्त देवाचंच राज्य असं सरकार आहे जे या सगळ्या समस्यांना काढून टाकेल. मग देवाचं राज्य नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करेल?
देवाच्या राज्याने आधीच कोणत्या गोष्टी केल्या आहेत?
मागच्या लेखात आपण येशूने दिलेल्या चिन्हाबद्दल वाचलं. या चिन्हात सांगितलेल्या घटना आज आपण स्वतः घडताना पाहत आहोत. आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टीची खात्री पटते की स्वर्गात देवाचं राज्य स्थापन झालं आहे. आणि येशू ख्रिस्त त्याचा राजा आहे.
बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की जेव्हा येशू राज्य करायला सुरुवात करेल, तेव्हा तो सैतानाला आणि त्याच्या दुरात्म्यांना स्वर्गातून काढून टाकेल. त्यामुळे आता त्यांचा प्रभाव फक्त पृथ्वीपर्यंतच मर्यादित आहे. आणि म्हणूनच १९१४ पासून पृथ्वीवरची परिस्थिती इतकी वाईट होत चालली आहे.—प्रकटीकरण १२:७, ९.
जगाची परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. पण देवाच्या राज्याचा राजा या नात्याने येशूने पृथ्वीवरच्या लोकांसाठी बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या आहेत. येशूने अशी भविष्यवाणी केली होती की बायबलमधल्या सत्याचं ज्ञान जगभरातल्या लोकांना दिलं जाईल. आणि या ज्ञानामुळेच बरेच लोक बायबलची तत्त्वं शिकत आहेत आणि ती आपल्या जीवनात लागू करत आहेत. (यशया २:२-४) लाखो लोक कामाबद्दल समतोल दृष्टिकोन ठेवायला आणि आपल्या कौटुंबिक जीवनात बदल करायला शिकले आहेत. तसंच, ते पैशांच्या आणि इतर गोष्टींच्या मागे न लागता, त्यांच्याकडे आहे त्या गोष्टींमध्ये समाधानी राहायलाही शिकले आहेत. देवाकडून शिकलेल्या गोष्टींमुळे आज या लोकांना फायदा होत आहे. तसंच, देवाला आपल्या राज्यामध्ये जसे लोक हवे आहेत तसं ते बनायला शिकत आहेत.
देवाचं राज्य पुढे कोणकोणत्या गोष्टी करणार आहे?
आज स्वर्गात येशू राज्य करत असला, तरी पृथ्वीवर मात्र मानवी सरकारांचंच राज्य आहे. पण देवाने येशूला अशी आज्ञा दिली आहे, की “तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.” (स्तोत्र ११०:२) येशू लवकरच आपल्या सगळ्या विरोधकांचा पूर्णपणे नाश करेल आणि देवाची आज्ञा पाळायला तयार असलेल्या सगळ्यांना सर्व समस्यांतून सोडवेल.
त्या वेळी देवाचं राज्य,
-
खोट्या धर्माचा पूर्णपणे नाश करेल. बायबलमध्ये खोट्या धर्माची तुलना अशा वेश्येसोबत करण्यात आली आहे जिचा लवकरच नाश केला जाईल. ज्या धर्मांनी देवाबद्दल खोटं शिकवलं आहे आणि लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे, त्या धर्मांचा नाश केला जाईल. आणि असं होईल तेव्हा बऱ्याच लोकांना धक्का बसेल.—प्रकटीकरण १७:१५, १६.
-
मानवी सरकारांचा अंत करेल. देवाचं राज्य सर्व मानवी सरकारांचा अंत करण्यासाठी पाऊल उचलेल.—प्रकटीकरण १९:१५, १७, १८.
-
दुष्ट लोकांचा नाश करेल. ज्या लोकांना वाईट गोष्टीच करायच्या आहेत आणि देवाच्या आज्ञा पाळायच्या नाहीत, त्यांच्याबद्दल बायबलमध्ये असं म्हटलं आहे: “दुर्जनांचा देशांतून उच्छेद होईल.”—नीतिसूत्रे २:२२.
-
सैतानाला आणि त्याच्या दुरात्म्यांना निष्क्रिय करेल. यापुढे सैतान आणि त्याचे दुरात्मे “राष्ट्रांना बहकवू” शकणार नाहीत.—प्रकटीकरण २०:३, १०.
जे देवाच्या राज्याची बाजू घेतात त्यांना याचा काय फायदा होईल?
देवाचं राज्य मानवजातीसाठी कोणकोणत्या गोष्टी करेल?
येशू जेव्हा स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करेल, तेव्हा कोणत्याही मानवी शासकाला जमल्या नाहीत अशा चांगल्या गोष्टी तो करेल. त्याला मदत करण्यासाठी मानवांमधून निवडलेले १,४४,००० सहराजे असतील. (प्रकटीकरण ५:९, १०; १४:१, ३) देवाची इच्छा या पृथ्वीवर पूर्ण होईल, या गोष्टीची तो खात्री करेल. देवाचं राज्य पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी कोणकोणत्या गोष्टी करेल?
-
मृत्यू आणि आजारपण कायमचं काढून टाकेल. “मी रोगी आहे असे एकही रहिवासी म्हणणार नाही.” आणि “यापुढे मरण नसेल.”—यशया ३३:२४; प्रकटीकरण २१:४.
-
खरी शांती आणि सुरक्षा आणेल. “तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल.” आणि “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांना घाबरवणार नाही.”—यशया ५४:१३; मीखा ४:४.
-
सगळ्यांना समाधानकारक काम देईल. “माझे निवडलेले आपल्या हाताच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत.”—यशया ६५:२२, २३.
-
पर्यावरणाच्या सगळ्या समस्या सोडवेल. “अरण्य व रुक्ष भूमी ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.”—यशया ३५:१.
-
कायम जिवंत राहण्यासाठी काय करायची गरज आहे हे लोकांना शिकवेल. “सर्वकाळाचं जीवन मिळवण्यासाठी हे आवश्यक आहे, की त्यांनी एकाच खऱ्या देवाला, म्हणजे तुला आणि ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं.”—योहान १७:३.
हे सर्व आशीर्वाद तुम्हाला मिळावेत अशी देवाची इच्छा आहे. (यशया ४८:१८) असं सुंदर भविष्य मिळवण्यासाठी तुम्ही आत्ता काय केलं पाहिजे याची चर्चा पुढच्या लेखात केली जाईल.