जीवन कथा
ख्रिस्ताचा सैनिक बनून राहण्याचा दृढ निश्चय असलेला
मोठा गोळीबार चालू होता. बंदुकीतून सुटलेल्या गोळ्या माझ्या अगदी जवळून जात होत्या. मी माझ्याकडे असलेला पांढरा रुमाल हळूहळू वर हवेत धरला. मग, जे सैनिक गोळीबार करत होते त्यांनी मोठ्याने ओरडून मला बाहेर निघण्यास सांगितलं. मी थोडा सावधानतेनंच बाहेर निघालो आणि त्यांच्याकडे गेलो. आता मी जगणार की मरणार हे मला माहीत नव्हतं. पण मी या अशा भयंकर परिस्थितीत कसा सापडलो?
माझा जन्म १९२६ मध्ये ग्रीसमधील कारीत्सा या लहानशा गावात झाला. माझे आईवडील फार कष्टाळू होते. मी माझ्या आठ भावंडांमध्ये सातवा होतो.
माझ्या जन्माच्या एका वर्षाआधी, जॉन पापारीझोस या आवेशी आणि बोलक्या स्वभावाच्या एका बायबल विद्यार्थ्याशी माझ्या आईवडिलांची भेट झाली. त्या काळी यहोवाच्या साक्षीदारांना बायबल विद्यार्थी या नावाने ओळखलं जायचं. जॉनला बायबलच्या वचनांचं खूप चांगलं ज्ञान होतं. बायबलवर त्याने जो तर्क केला त्याची माझ्या आईवडीलांच्या मनावर मोठी छाप पडली. त्यामुळे, माझे आईवडील गावात भरत असलेल्या बायबल विद्यार्थ्यांच्या सभांना हजर राहू लागले. माझ्या आईचा यहोवा देवावर अढळ विश्वास होता. ती शिकलेली नव्हती, तरी जेव्हा केव्हा तिला संधी मिळायची, तेव्हा ती तिच्या विश्वासांबद्दल इतरांनाही सांगायची. पण दुःखाची गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांनी मंडळीतील लोकांच्या अपरिपूर्णतेकडे आणि त्यांच्याकडून होत असलेल्या चुकांकडेच लक्ष दिलं. आणि हळूहळू वडिलांचं ख्रिस्ती सभांना येणं बंद झालं.
मला आणि माझ्या भावंडांना बायबलबद्दल खूप आदर होता. पण किशोरवयात असलेला जोश आणि इच्छा यांमुळे आम्ही बहकत होतो. १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाने युरोपमधील बऱ्याच देशांना आपल्या विळख्यात घेतलं होतं. त्या वेळी आमच्या गावात झालेल्या एका घटनेनं आम्हाला हादरवून टाकलं. आमचा चुलत भाऊ निकोलस हा आमच्या शेजारी राहायचा. त्याचा नुकताच बाप्तिस्मा झाला होता. त्याचं नाव ग्रीक लष्करात सक्तीची भरती करण्यात येणाऱ्यांच्या यादीमध्ये होतं. निकोलस त्या वेळी २० वर्षांचा होता. तो फार धैर्याने लष्करी अधिकाऱ्यांना म्हणाला: “मी युद्धात सहभाग घेणार नाही. कारण मी ख्रिस्ताचा एक सैनिक आहे.” त्यानंतर त्याच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालवला गेला आणि त्याला दहा वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व प्रकारामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसला!
आनंदाची गोष्ट म्हणजे, १९४१ सालाच्या सुरवातीला मित्र राष्ट्रांचं सैन्य काही काळासाठी ग्रीसमध्ये घुसलं. त्यामुळे निकोलसला तुरुंगातून सुटका मिळाली. सुटका मिळताच निकोलस कारीत्साला परत आला.
तो परत आल्यावर माझ्या मोठ्या भावाने, लियासने त्याच्यावर बायबलविषयी प्रश्नांचा भडिमारच केला. मी त्यांचं संभाषण फार लक्षपूर्वक ऐकत होतो. त्यानंतर लियास, मी आणि माझी लहान बहीण एफमोरफिया हिने बायबल अभ्यास सुरू केला. आणि आम्ही नियमित रीत्या इतर साक्षीदारांसोबत सभांनाही हजर राहू लागलो. त्याच्या दुसऱ्याच वर्षी आम्ही तिघांनीही आमचं जीवन यहोवाला समर्पित केलं आणि बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर काही काळातच आमच्या आणखी चार भावंडांनी बाप्तिस्मा घेतला.१९४२ मध्ये कारीत्सातील मंडळीत १५ ते २५ या वयोगटातील नऊ बंधुभगिनी होते. येणाऱ्या काळात आम्हाला बऱ्याच परीक्षांचा आणि समस्यांचा सामना करावा लागेल याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा शक्य व्हायचं, तेव्हा तेव्हा बायबल अभ्यासासाठी, ख्रिस्ती गीतं गाण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी आम्ही एकत्र यायचो. याचा परिणाम म्हणजे आमच्या विश्वासाला बळकटी मिळाली.
यादवी युद्ध
दुसरं महायुद्ध संपण्याच्या मार्गावर असताना, साम्यवादी विचारधारा असलेल्या ग्रीक लोकांनी सरकारविरुद्ध बंड केलं. आणि देशांतर्गत एका मोठ्या यादवी युद्धाला सुरुवात झाली. साम्यवादी विचारधारा असलेल्या या लोकांच्या टोळ्या खेड्यापाड्यांमध्ये जायच्या आणि गावकऱ्यांना त्यांच्यासोबत सामील होण्यासाठी जबरदस्ती करायच्या. अशीच एक टोळी आमच्या गावामध्येही आली, आणि माझ्यासोबत आणखी दोघांना बंदी बनवून घेऊन गेली. माझ्यासोबत बंदी बनवलेले आणखी दोघे म्हणजे, अॅन्टोनियो साऊकारीस आणि लियास. आम्ही तिघांनीही त्यांना फार विनंती करून सांगितलं की आम्ही ख्रिस्ती असून निःपक्ष राहणारे आहोत. पण तरी ते आम्हाला आमच्या गावापासून लांब असलेल्या ऑलंपस डोंगरापर्यंत चालत घेऊन गेले. तिथं पोहोचायला आम्हाला बारा तास लागले.
याच्या काही काळातच त्यांच्या एका अधिकाऱ्याने आम्हाला गनिमी काव्याने छापा घालणाऱ्या त्यांच्या टोळ्यांमध्ये सामील होण्यास सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं की खरे ख्रिस्ती हे लोकांविरुद्ध शस्त्र उचलत नाहीत, तेव्हा रागाने भडकलेल्या त्या अधिकाऱ्याने आम्हाला त्यांच्या उच्च अधिकाऱ्याकडे नेलं. तिथंही आम्ही पुन्हा तेच सांगितलं, तेव्हा तो आम्हाला हुकूम देत म्हणाला: “मग खेचर घ्या आणि जखमी झालेल्यांना युद्धभूमीतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जा.”
“पण आम्हाला सरकारी सैनिकांनी पकडलं तर काय? आम्ही युद्धात त्यांच्याविरुद्ध लढत आहोत असंच ते समजणार नाहीत का?” आम्ही त्याला उत्तर देत म्हणालो. यावर तो अधिकारी म्हणाला: “मग युद्धात लढणाऱ्यांना खेचरावर अन्नपाणी पुरवण्याचं काम करा.” पण आम्ही पुन्हा त्याच्यासोबत तर्क करत म्हणालो: “पण अन्नपाणी घेऊन जाताना आम्हाला दुसऱ्या एखाद्या अधिकाऱ्याने पाहिलं आणि आम्हाला त्यासोबत शसत्रंदेखील घेऊन जायला सांगितली तर काय?” आमच्या या प्रश्नावर तो अधिकारी थांबला आणि थोडा विचार करत त्याने आम्हाला हुकूम दिला: “तर मग डोंगरावरच राहा आणि मेंढरं चारा. तुम्ही मेंढरांची राखण तर नक्कीच करू शकता!”
ग्रीसमध्ये सगळीकडे यादवी युद्धाने जोर पकडला होता. आणि अशा परिस्थितीत आम्हाला वाटलं की मेंढरं राखण्यासाठी आमचा विवेक आम्हाला अनुमती देत आहे. याच्या एक वर्षानंतर लियासला या बंदिवासातून मोकळं करण्यात आलं. कारण, मोठा मुलगा असल्यामुळे विधवा झालेल्या आमच्या आईची काळजी घेण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. अॅन्टोनियो हा आजारी पडला त्यामुळे त्यालाही सोडण्यात आलं. मी मात्र त्यांच्याकडे बंदी बनूनच राहिलो.
यादरम्यान ग्रीक सैनिक बंड केलेल्या साम्यवाद्यांच्या ठिकाणांकडे आगेकूच करत राहिले. त्यामुळे मी ज्या टोळीसोबत बंदी म्हणून होतो, ती डोंगरांमधून पळ काढत जवळ असलेल्या अलबानिया या देशाकडे निघाली. अलबानियाच्या सीमेजवळ असताना अचानक आम्हाला जाणवलं की आमच्या आजूबाजूला ग्रीक सैनिक आहेत. यामुळे बंड केलेल्या या टोळीतील लोक घाबरले आणि पळून जाऊ लागले. मीही घाबरलो आणि तिथल्या एका पडलेल्या झाडाच्या मागे लपलो. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सैनिकांचा गोळीबार चालू असलेल्या अशा या भयंकर परिस्थितीत सापडलो.
मी त्या ग्रीक सैनिकांना सांगितलं की साम्यवाद्यांच्या टोळीने मला बंदी बनवलं होतं. त्यामुळे त्यांनी मला उलटतपासणीसाठी वेरोयाजवळ असलेल्या सैनिकी छावणीमध्ये नेलं. बायबल काळात या ठिकाणाला
बिरुया म्हटलं जायचं. तिथं मला सैनिकांसाठी खंदकं खणण्याचं काम करण्यासाठी सांगितलं गेलं. मी हे काम करण्यास नकार दिला, तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने मी शिक्षेस पात्र असल्याचं सुनावलं आणि हद्दपार करून मला शिक्षेसाठी माक्रानिसी या बेटावर पाठवलं.भयानक बेटावर
अथेन्सपासून पन्नास-एक किलोमीटरवर असलेल्या आटिकाच्या प्रांतात हे बेट होतं. हे बेट म्हणजे ओसाड व उन्हात तापलेल्या खडकांचं एक ठिकाण आहे. इथं पिण्याच्या पाण्याची कमी आहे. हे बेट फक्त १३ किमी लांब आहे. या बेटाची सर्वात जास्त रूंदी म्हणजे २.५ कि.मी. तरी १९४७ पासून १९५८ पर्यंत या बेटावर एक लाखापेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात आलं होतं. यांत काही साम्यवादी चळवळीतील लोक होते, तर काही असेही होते ज्यांच्यावर फक्त ते साम्यवादी असल्याची शंका होती. तसंच सरकारविरुद्ध लढणाऱ्या काही बंडखोरांनाही इथं ठेवण्यात आलं होतं, आणि बरेचसे यहोवाचे साक्षीदारही इथं होते.
१९४९ मध्ये जेव्हा मी या बेटावर आलो, तेव्हा आम्हा कैद्यांना वेगवेगळ्या छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं. मला इतर शेकडो लोकांसोबत कमी शिपाई असलेल्या एका छावणीत पाठवण्यात आलं. तिथं आम्ही एका तंबूत राहायचो. हा तंबू साधारणतः १० लोकांसाठी होता, पण आम्ही जवळजवळ ४० जण त्या तंबूत जमिनीवर झोपायचो. या बेटावर आम्हाला दुर्गंधीयुक्त पाणी प्यावं लागायचं आणि आम्ही बहुधा डाळी आणि वांगीच खायचो. या बेटावर असलेल्या सततच्या धुळीमुळे आणि वाऱ्यामुळे तर जीवन अधिकच कठीण बनलं होतं. पण त्यातल्या-त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे, निदान आम्हाला दगडं तरी इकडून तिकडं वाहावी लागायची नाहीत. या बेटावर असलेला हा एक अशा प्रकारचा छळ होता, ज्यामुळे अनेक कैदी शारीरिक आणि मानसिक रीत्या पार खचून गेले होते.
एक दिवस समुद्र किनाऱ्यावर चालत असताना, मला दुसऱ्या छावणीत असलेले बरेचसे साक्षीदार भेटले. त्या वेळी आम्हा सर्वांना अतिशय आनंद झाला! त्यानंतर आम्ही खूप दक्षता बाळगत, शक्य आहे तेव्हा एकमेकांना भेटायचो. आम्ही फार सावधगिरीने तिथल्या इतर कैद्यांना प्रचारही करायचो. त्यांपैकी काही नंतर यहोवाचे साक्षीदार बनले. त्या बेटावर आम्ही करत असलेल्या अशा कामांमुळे आणि यहोवाला केलेल्या आमच्या कळकळीच्या प्रार्थनांमुळे, आम्हाला आध्यात्मिक रीत्या तग धरून राहण्यास मदत मिळाली.
धगधगत्या अग्नीच्या भट्टीत असल्यासारखी परिस्थिती
सुधारण्यासाठी मला माक्रानिसी या बेटावर पाठवण्यात आल्याच्या दहा महिन्यांनंतर, मला बंदिवान बनवलेल्या अधिकाऱ्यांनी मी सैनिकी गणवेश घालावा असं ठरवलं. मी या गोष्टीला नकार दिला, तेव्हा त्यांनी मला त्या छावणीच्या उच्च अधिकाऱ्यासमोर उभं केलं. मी त्या अधिकाऱ्याला माझा एक लेखी अर्ज दिला. त्यात म्हटलं: “मला फक्त ख्रिस्ताचा एक सैनिक बनून राहायचं आहे.” त्यावर त्याने मला धमकी दिली आणि घाबरवण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर त्याच्या खालोखाल असलेल्या अधिकाऱ्याकडे मला सोपवलं. हा दुसरा अधिकारी एक ग्रीक ऑर्थोडॉक्स बिशप होता. बिशपचा पोषाख घातलेल्या या अधिकाऱ्याच्या प्रश्नांना जेव्हा मी बायबलमधील वचनांच्या मदतीनं मोठ्या धैर्यानं उत्तरं दिली, तेव्हा तो अतिशय रागाने ओरडून म्हणाला: “याला इथून घेऊन जा. हा धर्मवेडा माणूस आहे.”
दुसऱ्या दिवशी सकाळी मला पुन्हा तिथल्या शिपायांनी सैनिकी गणवेश घालण्यासाठी सांगितलं. जेव्हा मी त्यांना नकार दिला तेव्हा त्यांनी मला बुक्क्यांनी व लाकडी दांडक्यानं खूप मारलं. त्यानंतर माझी हाडं तर मोडली नाहीत ना, हे तपासून पाहण्यासाठी त्यांनी मला छावणीतील दवाखान्यात नेलं. मग पुन्हा माझ्या तंबूमध्ये ओढत आणलं. हा प्रकार दोन महिन्यांसाठी दररोज चालला.
मी माझ्या विश्वासाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाही, हे पाहून चिडलेल्या त्या सैनिकांनी एक नवीन युक्ती अजमावून पाहिली. त्यांनी माझे हात पाठीमागे बांधले आणि कोणतीही दयामाया न बाळगता अगदी क्रूरतेनं माझ्या पायांच्या तळव्यांवर जाड दोरीने मारत राहिले. जीवाला भेदून जाणाऱ्या त्या असह्य वेदनांमध्ये मी येशूचे शब्द आठवले: “जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेषटे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.” (मत्त. ५:११, १२) या छळाला काही अंत नाही असं मला वाटत होतं, आणि शेवटी मी बेशुद्ध झालो.
जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी अतिशय थंड अशा एका खोलीमध्ये होतो. तिथं खाण्यापिण्यासाठी काहीच नव्हतं आणि अंगावर ओढण्यासाठी ब्लँकेटही नव्हतं. या अशा परिस्थितीतही मला शांत आणि स्वस्त चित्त वाटत होतं. बायबलमध्ये जसं म्हटलं आहे त्याप्रमाणे “देवाने दिलेली शांती” माझं अंतःकरण व माझे विचार राखत होती. (फिलिप्पै. ४:७) दुसऱ्या दिवशी एका दयाळू शिपायाने मला पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी काही आणून दिलं. तसंच त्याने मला त्या थंडीत अंगात घालण्यासाठी एक जॅकेटही दिलं. मग दुसऱ्या एका शिपायानेही मला त्याच्या वाट्याचं अन्न दिलं. यहोवा प्रेमळपणे घेत असलेली काळजी, मी या आणि अशा अनेक मार्गांनी अनुभवत होतो.
मी सुधारण्याच्या पलीकडे असलेला एक बंडखोर आहे, असं मानून तिथल्या अधिकाऱ्यांनी मला अथेन्सच्या लष्करी न्यायालयात नेलं. त्या न्यायालयाने मला तीन वर्षांसाठी ग्यारोस या बेटावर असलेल्या तुरुंगात शिक्षेसाठी पाठवलं. हे बेट माक्रानिसीपासून ५० किमी पूर्वेकडे आहे.
“आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो”
ग्यारोसमधील तुरुंग हा लाल विटांचा बनवलेला जणू एक मोठा किल्लाच होता. यात ५,००० पेक्षा जास्त राजकीय कैद्यांना कैद करण्यात आलं होतं. या तुरुंगात ख्रिस्ती विश्वासामुळे आणि तटस्थ भूमिकेमुळे आम्हा सात यहोवाच्या साक्षीदारांनाही कैद करण्यात आलं होतं. एकमेकांना भेटण्यावर या तुरुंगात बंदी होती. तरी आम्ही सातही जण बायबल अभ्यासासाठी लपूनछपून एकमेकांना भेटायचो. आम्हाला
तुरुंगात चोरून आत आणलेली टेहळणी बुरूज मासिकंदेखील मिळायची. आमच्या अभ्यासासाठी मग आम्ही या मासिकांच्या हाताने लिहून प्रती बनवायचो.एक दिवस जेव्हा आम्ही लपून बायबल अभ्यास करत होतो, तेव्हा एका शिपायानं आम्हाला पाहिलं. त्याने आमच्याकडे असलेली प्रकाशनं आणि साहित्यं जप्त केली. यानंतर आम्हाला तिथल्या वॉर्डच्या अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचा हुकूम मिळाला. या प्रकारानंतर आता आमची शिक्षा लांबवली जाईल अशी आम्हाला पक्की खात्री होती. पण याच्या अगदी उलट घडलं. तो अधिकारी म्हणाला: “आम्हाला माहीत आहे की तुम्ही लोक कोण आहात. आणि तुम्ही घेतलेल्या ख्रिस्ती तटस्थ भूमिकेसाठी आम्हाला तुमचा आदरही आहे. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो. आपापल्या कामावर परत जा.” या अधिकाऱ्याने आमच्यातील काहींना त्यांची कामं बदलून सोपी कामंदेखील दिली. आमची अंतःकरणे कृतज्ञतेने भरून आली. अगदी त्या तुरुंगातही आमच्या ख्रिस्ती तटस्थतेमुळे यहोवाच्या नावाला गौरव मिळत होता.
आमच्या अढळ विश्वासामुळे आम्हाला इतरही काही चांगले परिणाम पाहायला मिळाले. गणिताचा एक प्राध्यापक असलेला कैदी आमची चांगली वागणूक पाहून फार प्रभावित झाला. त्याने आम्हाला आमच्या विश्वासाबद्दल विचारलं. आम्हा साक्षीदारांना १९५१ सालच्या सुरुवातीला तुरुंगातून सुटका मिळाली. त्या वेळी त्या प्राध्यापकालाही त्या तुरुंगातून सोडण्यात आलं. काही काळाने तोदेखील यहोवाचा एक साक्षीदार बनला आणि पूर्णवेळेची सेवा करू लागला.
आजही मी एक ख्रिस्ताचा सैनिकच आहे
तुरुंगातून सुटका मिळाल्यानंतर मी कारीत्सा या माझ्या गावी, माझ्या कुटुंबाकडे परतलो. याच्या काही काळाने मी माझ्या देशातील इतर काही लोकांसोबत ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या ठिकाणी स्थलांतरित झालो. तिथं माझी भेट जॅनेटसोबत झाली. जॅनेट चांगलं उदाहरण असलेली एक ख्रिस्ती बहीण होती. आमच्या लग्नानंतर आम्ही आमच्या एका मुलाला आणि तीन मुलींना ख्रिस्ती विश्वासात वाढवलं.
आज माझं वय ९० पेक्षा जास्त आहे. आणि या वयातही मी उत्साहाने मंडळीमध्ये एक वडील म्हणून सेवा करत आहे. तुरुंगात आणि बंदिवान म्हणून असताना माझ्यावर झालेल्या शारीरिक छळामुळे आजही कधीकधी मला त्रास होतो. खासकरून जेव्हा मी प्रचार कार्यात सहभाग घेतो तेव्हा मला शारीरिक वेदना होतात. पण असं असलं तरी, ‘ख्रिस्ताचा सैनिक’ बनून राहण्याचा माझा दृढ निश्चय आजही कायम आहे.—२ तीम. २:३.