अभ्यास लेख ४८
अचानक आलेल्या परिस्थितींमध्येही तुम्ही यहोवावर भरवसा ठेवू शकता
“हिंमत धर . . . ‘कारण मी तुमच्यासोबत आहे,’ असं सैन्यांचा देव यहोवा म्हणतो.”—हाग्ग. २:४.
गीत ११९ खरा विश्वास बाळगू या!
सारांश a
१-२. (क) यरुशलेमला परतणाऱ्या यहुद्यांमध्ये आणि आपल्यामध्ये कोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? (ख) यहुद्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला, याबद्दल थोडक्यात सांगा. (“ हाग्गय, जखऱ्या आणि एज्रा यांचा काळ” ही चौकट पाहा.)
तुम्हाला कधीकधी भविष्याची चिंता वाटते का? कदाचित तुमची नोकरी गेली असेल आणि कुटुंबाचं पोट आता कसं भरायचं याची तुम्हाला चिंता असेल. तुम्ही राहता त्या ठिकाणी कदाचित अस्थिर राजकीय परिस्थिती असेल. तुम्हाला प्रचारात विरोधाचा किंवा छळाचाही सामना करावा लागत असेल. आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असेल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करत असला, तरी एका गोष्टीमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ती कोणती? इस्राएलमधल्या लोकांनासुद्धा यांसारख्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. तेव्हा यहोवा त्यांच्यासोबत होता, यावर विचार केल्यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल.
२ बाबेलमध्ये राहणारे यहुदी तिथे सुखासमाधानाचं आयुष्य जगत होते. पण आता त्यांना अशा एका ठिकाणी जावं लागलं, ज्याबद्दल त्यांना खूप कमी माहिती होती. यासाठी त्यांना भक्कम विश्वासाची गरज होती. कारण नवीन ठिकाणी गेल्यावर काही काळातच त्यांना तिथल्या अस्थिर राजकीय आणि आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर त्यांना विरोधाला तोंड द्यावं लागलं. त्यामुळे त्यांच्यापैकी काहींना यहोवाचं मंदिर पुन्हा बांधण्याच्या कामावर लक्ष द्यायला कठीण जात होतं. म्हणूनच जवळपास इ.स.पू. ५२० मध्ये यहुदी लोकांचा आवेश पुन्हा वाढवण्यासाठी यहोवा हाग्गय आणि जखऱ्या संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवतो. (हाग्ग. १:१; जख. १:१) हे संदेष्टे त्यांना प्रोत्साहन देतात आणि याचा त्यांच्यावर खूप चांगला परिणाम होतो. त्याबद्दल आपण या लेखात पुढे पाहणारच आहोत. पण जवळपास ५० वर्षांनंतरही यहुदी लोकांचा आवेश पुन्हा खचतो. म्हणून यहोवा, नियमशास्त्राच्या प्रती तयार करण्यात कुशल असलेल्या एज्राला बाबेलमधून यरुशलेमला पाठवतो. तो तिथल्या लोकांना, खऱ्या उपासनेला आपल्या जीवनात पहिल्या स्थानी ठेवायचं उत्तेजन देतो.—एज्रा ७:१, ६.
३. या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत? (नीतिवचनं २२:१९)
३ हाग्गय आणि जखऱ्या यांच्या भविष्यवाण्यांमुळे विरोध होत असतानाही यहोवावर आपला भरवसा टिकवून ठेवण्यासाठी देवाच्या लोकांना मदत झाली. तसंच, आपल्यावरही जेव्हा अचानक समस्या येतात तेव्हा यहोवावर भरवसा ठेवण्यासाठी आपल्यालाही या भविष्यवाण्यांमुळे मदत होऊ शकते. (नीतिवचनं २२:१९ वाचा.) हाग्गय आणि जखऱ्याने देवाचा जो संदेश सांगितला त्यावर विचार करत असताना आणि एज्राच्या उदाहरणावर मनन करत असताना आपण पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करू या: अचानक आलेल्या समस्यांचा यहुद्यांवर कसा परिणाम झाला? जेव्हा आपल्यावर संकटं येतात तेव्हा देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे आपण लक्ष का दिलं पाहिजे? संकटाच्या काळात आपण यहोवावरचा भरवसा कसा वाढवू शकतो?
अचानक आलेल्या समस्यांचा यहुद्यांवर कसा परिणाम झाला?
४-५. मंदिर बांधण्यासाठी असलेला यहुदी लोकांचा आवेश कदाचित कशामुळे कमी झाला असेल?
४ यरुशलेमला परतणाऱ्या यहुद्यांना बरंच काम करायचं होतं. त्यांनी लगेचच यहोवाची वेदी बांधली आणि मंदिराचा पाया घातला. (एज्रा ३:१-३, १०) पण त्यांचा हा उत्साह लगेच मावळला. कारण मंदिराच्या कामासोबतच त्यांना त्यांची घरं बांधायची होती, शेती करायची होती आणि आपल्या कुटुंबाच्या गरजाही पूर्ण करायच्या होत्या. (एज्रा २:६८, ७०) इतकंच काय तर मंदिराचं काम थांबवण्यासाठी कट रचणाऱ्या शत्रूंच्या विरोधाचाही त्यांना सामना करावा लागणार होता.—एज्रा ४:१-५.
५ यरुशलेमला परतणाऱ्या यहुद्यांना राजकीय अस्थिरता आणि आर्थिक मंदीचाही सामना करावा लागला. आता यरुशलेम पर्शियन साम्राज्याचा भाग बनलं होतं. इ.स.पू. ५३० मध्ये पर्शियाचा राजा कोरेश याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी कॅम्बायसेस हा राजा बनला. या राजाने इजिप्त काबीज करण्यासाठी एक लष्करी मोहीम राबवली. इजिप्तवर हल्ला करायला जाताना त्याच्या सैनिकांनी, इस्राएली लोकांकडे अशी मागणी केली की त्यांनी त्यांच्यासाठी अन्नपाण्याची आणि राहण्याची सोय करावी. त्यामुळे इस्राएली लोकांवर या गोष्टींचाही भार वाढला. नंतर कॅम्बायसेसच्या जागी दारयावेश पहिला हा राजा बनला. त्याच्या शासनाच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या प्रजेने बंड केलं. याचा परिणाम म्हणजे त्या काळात भरपूर राजकीय अस्थिरता वाढली होती. त्यामुळे यरुशलेमला परतणाऱ्या यहुद्यांना ते आपल्या कुटुंबाची काळजी कशी घेतील, असा प्रश्न नक्कीच पडला असेल. पुढे काय होईल अशी चिंता असल्यामुळे काही यहुद्यांना असंही वाटलं की यहोवाचं मंदिर पुन्हा बांधायची ही योग्य वेळ नाही.—हाग्ग. १:२.
६. जखऱ्या ४:६, ७ प्रमाणे यहुद्यांना आणखी कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला आणि जखऱ्याने त्यांना कोणती खातरी दिली?
६ जखऱ्या ४:६, ७ वाचा. आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेचा सामना करण्यासोबतच यहुद्यांना छळाचाही सामना करावा लागला. इ.स.पू. ५२२ मध्ये मंदिर पुन्हा बांधण्याच्या कामावर बंदी घालण्यात त्यांच्या शत्रूंना यश मिळालं. पण जखऱ्याने यहुद्यांना याची खातरी करून दिली, की कुठलीही समस्या आली तरी यहोवा त्याच्या पवित्र शक्तीने त्यांना मदत करेल. मग इ.स.पू. ५२० मध्ये दारयावेश राजाने ही बंदी उठवली आणि इतकंच नाही तर यहुद्यांना मंदिराच्या बांधकामासाठी लागणारा खर्चही दिला. यासोबतच त्याने अधिकाऱ्यांना यहुद्यांना मदत करायला सांगितलं.—एज्रा ६:१, ६-१०.
७. यहुद्यांनी यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष दिलं तेव्हा त्यांना कोणते आशीर्वाद मिळाले?
७ हाग्गय आणि जखऱ्याद्वारे यहोवाने त्याच्या लोकांना असं वचन दिलं, की जर त्यांनी मंदिराच्या बांधकामाला महत्त्व दिलं तर तो त्यांना नक्की मदत करेल. (हाग्ग. १:८, १३, १४; जख. १:३, १६) या संदेष्ट्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यहुद्यांनी इ.स.पू. ५२० मध्ये मंदिराचं काम पुन्हा सुरू केलं. आणि अगदी पाच वर्षांच्या आतच ते पूर्ण केलं. अचानक आलेल्या समस्या असतानाही यहुद्यांनी देवाची इच्छा पूर्ण करण्याला महत्त्व दिल्यामुळे यहोवाने फक्त त्यांच्या गरजाच पुरवल्या नाहीत, तर त्यांना आध्यात्मिक रितीनेही मदत केली. याचा परिणाम असा झाला, की त्यांनी आनंदाने यहोवाची सेवा केली.—एज्रा ६:१४-१६, २२.
देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष द्या
८. हाग्गय २:४ मध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकडे आपलं लक्ष लावायला आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते? (तळटीपसुद्धा पाहा.)
८ मोठं संकट खूप जवळ आहे. त्यामुळे प्रचार करण्याची जी आज्ञा आपल्याला दिली आहे, तिचं पालन करणं किती गरजेचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. (मार्क १३:१०) पण आर्थिक समस्यांमुळे किंवा प्रचारकार्यात छळाचा सामना करावा लागत असल्यामुळे आपल्याला सेवाकार्यावर लक्ष द्यायला कठीण जाऊ शकतं. पण देवाच्या राज्याला महत्त्व देण्यासाठी कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत होऊ शकते? “सैन्यांचा देव यहोवा” b आपल्या बाजूने आहे याची खातरी आपण ठेवू शकतो. जर आपण स्वतःच्या इच्छांना नाही तर देवाच्या राज्याला पहिलं स्थान दिलं, तर तो आपल्याला नक्की मदत करेल. म्हणून आपल्याला घाबरण्याची गरज नाही.—हाग्गय २:४ वाचा.
९-१०. मत्तय ६:३३ मधले येशूचे शब्द किती खरे आहेत, हे एका जोडप्याने कसं अनुभवलं?
९ ओलेग आणि आयरीना c या जोडप्याचा विचार करा. ते पायनियर म्हणून सेवा करत आहेत. दुसऱ्या एका मंडळीला मदत करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर देशातली आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांची नोकरी गेली. ते जवळपास एक वर्ष छोटंमोठं काम करत होते. कारण त्यांना कायमची अशी नोकरी मिळत नव्हती. पण या काळातही त्यांनी यहोवाची प्रेमळ साथ आणि भाऊबहिणींकडून मिळणारी मदत अनुभवली. अचानक आलेल्या या समस्यांना त्यांनी कसं तोंड दिलं? ओलेग सुरुवातीला खूप निराश झाले होते. पण त्यांनी म्हटलं: “सेवाकार्यात व्यस्त राहिल्यामुळे जीवनातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला आम्हाला मदत झाली.” त्यानंतरही ते नोकरी शोधत राहिले, पण त्यासोबतच त्यांनी स्वतःला सेवाकार्यात व्यस्त ठेवलं.
१० एके दिवशी प्रचार करून घरी आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा एक मित्र जवळजवळ १६० कि.मी. प्रवास करून त्यांच्यासाठी खाण्यापिण्याचं सामान असलेल्या दोन पिशव्या घेऊन आला आहे. ओलेग म्हणतात: “त्या दिवशी, यहोवा आपली किती काळजी करतोय आणि आपल्या मंडळीचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे आम्ही पुन्हा एकदा अनुभवलं. आम्हाला याची पूर्ण खातरी पटली, की आपली परिस्थिती कितीही खराब वाटत असली, तरी यहोवा त्याच्या सेवकांना कधीच विसरत नाही.”—मत्त. ६:३३.
११. आपण जर देवाची इच्छा पूर्ण करण्याकडे जास्त लक्ष दिलं तर आपण कोणत्या गोष्टीची खातरी ठेवू शकतो?
११ आपण शिष्य बनवण्याचं जे जीवन वाचवणारं काम आहे, त्यावर लक्ष लावावं अशी यहोवाची इच्छा आहे. परिच्छेद ७ मध्ये सांगितल्याप्रमाणे हाग्गयने यहोवाच्या लोकांना असं प्रोत्साहन दिलं होतं, की ते जणू मंदिराचा पाया पुन्हा एकदा घालत आहेत अशा प्रकारे त्यांनी त्यांची पवित्र सेवा नव्याने सुरू करावी. जर त्यांनी तसं केलं, तर यहोवा त्यांना नक्कीच आशीर्वाद देणार होता. (हाग्ग. २:१८, १९) त्याचप्रमाणे आपणसुद्धा यहोवाने दिलेल्या कामाला जास्त महत्त्व दिलं, तर यहोवा आपल्या प्रयत्नांवर नक्की आशीर्वाद देईल याची खातरी आपण ठेवू शकतो.
यहोवावरचा भरवसा कसा वाढवता येईल?
१२. एज्रा आणि इतर यहुद्यांना मजबूत विश्वासाची गरज का होती?
१२ इ.स.पू. ४६८ मध्ये एज्राने बाबेलहून यरुशलेमला जाणाऱ्या यहुद्यांच्या दुसऱ्या गटासोबत प्रवास केला. हा प्रवास करताना एज्रा आणि इतर इस्राएली लोकांना मजबूत विश्वासाची गरज होती. कारण ते ज्या मार्गाने प्रवास करणार होते तो त्यांच्यासाठी सुरक्षित नव्हता. त्यांच्यासोबत मंदिरासाठी लागणारं भरपूर सोनं आणि चांदी होती. त्यामुळे त्यांना लुटारूंचा धोका होता. (एज्रा ७:१२-१६; ८:३१) यासोबतच त्यांच्या लक्षात आलं, की यरुशलेमसुद्धा त्यांच्यासाठी सुरक्षित नव्हतं. त्या शहरात खूप कमी लोक राहत होते आणि त्याच्या भिंती आणि फाटक यांनासुद्धा दुरुस्तीची गरज होती. तर मग यहोवावर भरवसा ठेवण्याच्या बाबतीत आपण एज्राकडून काय शिकू शकतो?
१३. एज्राचा यहोवावरचा भरवसा कसा मजबूत झाला? (तळटीपसुद्धा पाहा.)
१३ परीक्षेच्या काळात यहोवाने त्याच्या लोकांना कशी साथ दिली हे एज्राने पाहिलं होतं. याच्या काही वर्षांआधी म्हणजे इ.स.पू. ४८४ मध्ये एज्रा कदाचित बाबेलमध्ये राहत असावा. तेव्हा अहश्वेरोश राजाने संपूर्ण पर्शियाच्या साम्राज्यामध्ये राहणाऱ्या यहुद्यांचा नाश करायचं फर्मान काढलं. (एस्ते. ३:७, १३-१५) त्यामुळे एज्राचा जीवसुद्धा धोक्यात होता. हे फर्मान ऐकून प्रत्येक ‘प्रांतातले’ यहुदी उपवास करतात आणि आक्रोश करतात. त्यांनी नक्कीच यहोवाला मार्गदर्शनासाठी प्रार्थनाही केली असेल. (एस्ते. ४:३) यहुद्यांच्या विरुद्ध रचलेला हा कट कसा उलटला हे जेव्हा एज्रा आणि इतर यहुद्यांना कळलं, तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल, याचा विचार करा! (एस्ते. ९:१, २) या कठीण काळात एज्राने जे अनुभवलं त्यामुळे भविष्यात येणाऱ्या परीक्षांसाठी तो तयार झाला असेल. आणि यहोवा त्याच्या लोकांना सुरक्षित ठेवतो, या गोष्टीवरचा त्याचा भरवसा आणखी मजबूत झाला असेल. d
१४. अचानक आलेल्या परिस्थितीमध्ये जेव्हा एका बहिणीने यहोवाची काळजी अनुभवली तेव्हा तिला काय शिकायला मिळालं?
१४ अचानक आलेल्या समस्यांमध्ये यहोवा आपली काळजी कशी घेतो हे जेव्हा आपण अनुभवतो, तेव्हा त्याच्यावरचा आपला भरवसा आणखी वाढतो. पूर्व युरोपमध्ये राहणाऱ्या ॲनास्तेशिया या बहिणीच्या उदाहरणाचा विचार करा. राजकीय बाबतीत निष्पक्ष राहण्यासाठी तिने स्वतःची नोकरी सोडली. ती म्हणते: “माझ्या जीवनात पहिल्यांदाच अशी वेळ आली होती, की माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. पण मी सगळं काही यहोवावर सोडून दिलं. आणि तो माझी किती प्रेमळपणे काळजी घेतोय, हे मी पाहिलं. जर पुढे कधी पुन्हा एकदा माझी नोकरी गेली तर मला जास्त चिंता वाटणार नाही. कारण माझा स्वर्गातला पिता आज जशी माझी काळजी घेतोय, तशी पुढेही घेईल.”
१५. यहोवावरचा भरवसा टिकवून ठेवायला एज्राला कोणत्या गोष्टीमुळे मदत झाली? (एज्रा ७:२७, २८)
१५ यहोवा आपल्यासोबत आहे हे एज्राने ओळखलं. कठीण काळात यहोवाने त्याला कशी मदत केली यावर विचार केल्यामुळे यहोवावरचा भरवसा टिकवून ठेवायला एज्राला मदत झाली. ‘यहोवा माझ्यासोबत आहे,’ या एज्राच्या शब्दांवर विचार करा. (एज्रा ७:२७, २८ वाचा.) एज्राने यांसारखेच शब्द आणखी पाच वेळा त्याच्या पुस्तकात वापरले.—एज्रा ७:६, ९; ८:१८, २२, ३१.
१६. कोणत्या परिस्थितींमध्ये यहोवा आपल्यासोबत आहे हे अनुभवण्याची संधी आपल्याला मिळू शकते? (चित्रसुद्धा पाहा.)
१६ जेव्हा आपण एखाद्या समस्येचा सामना करत असतो तेव्हा यहोवा आपल्याला मदत करू शकतो. उदाहरणार्थ, अधिवेशनाला जाता यावं म्हणून तुम्ही तुमच्या बॉसकडे सुट्टी मागता. किंवा मंडळीतल्या सगळ्या सभांना उपस्थित राहता यावं म्हणून कामाच्या वेळेत काही फेरबदल करावेत म्हणून तुम्ही त्यांना विनंती करता. अशा वेळी यहोवा आपल्यासोबत आहे, हे अनुभवण्याची एक संधीच तुम्हाला मिळत असते. तुमच्यासाठी गोष्टी कशा बदलत आहेत, हे पाहून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. आणि त्यामुळे यहोवावरचा तुमचा भरवसा आणखी मजबूत होईल.
१७. कठीण परिस्थितीत एज्राने नम्रता कशी दाखवली? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)
१७ एज्राने नम्रपणे यहोवाला प्रार्थना केली. प्रत्येक वेळी जेव्हा एज्राला जबाबदारीच्या ओझ्याखाली दबल्यासारखं वाटलं, तेव्हा त्याने नम्रपणे यहोवाला प्रार्थना केली. (एज्रा ८:२१-२३; ९:३-५) या गोष्टीमुळेच इतरांनीही त्याला साथ दिली आणि त्याच्या विश्वासाचं अनुकरण केलं. (एज्रा १०:१-४) आपल्यालाही आपल्या कुटुंबाच्या गरजांची किंवा त्यांच्या सुरक्षिततेची चिंता वाटते, तेव्हा आपणसुद्धा पूर्ण भरवशाने यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे.
१८. यहोवावरचा आपला भरवसा कशामुळे वाढू शकतो?
१८ जर आपण नम्रपणे यहोवाकडे मदत मागितली आणि आपल्या भाऊबहिणींकडून मदत स्वीकारली, तर यहोवावरचा आपला भरवसा आणखी वाढेल. एरीकाने कठीण परिस्थितीत यहोवावरचा आपला भरवसा कसा टिकवून ठेवला त्याचा विचार करा. तिला तीन मुलं आहेत. पण तिच्यावर अचानक वाईट परिस्थिती आली. जन्म न झालेल्या तिच्या बाळाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर लगेचच तिच्या पतीचाही मृत्यू झाला. या सगळ्या गोष्टी आठवून ती म्हणते: “यहोवा तुम्हाला कशी मदत करेल हे तुम्ही आधीच सांगू शकत नाही. तुम्ही कल्पनाही केली नसेल अशा मार्गाने तो तुम्हाला मदत करतो. भाऊबहीण जेव्हा माझ्याशी बोलायचे आणि माझ्यासाठी जे काही करायचे त्यातून मला माझ्या प्रार्थनांचं उत्तर मिळतंय हे जाणवायचं. जर मी माझ्या भाऊबहिणींसमोर माझं मन मोकळं केलं, तर त्यांना मला मदत करायला आणखी सोपं जाईल हे मला समजलंय.”
शेवटपर्यंत यहोवावर भरवसा ठेवा
१९-२०. यरुशलेमला परत येऊ न शकणाऱ्या यहुद्यांकडून आपण काय शिकू शकतो?
१९ यरुशलेमला परत न येऊ शकणाऱ्या यहुद्यांकडूनही आपण एक मोलाचा धडा शिकू शकतो. त्यांपैकी काहींना त्यांच्या वाढत्या वयामुळे, गंभीर आजारामुळे किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे यरुशलेमला परत येता आलं नसेल. पण तरीसुद्धा यरुशलेमला परतणाऱ्या यहुद्यांसोबत त्यांनी मंदिरासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी पाठवल्या. (एज्रा १:५, ६) यरुशलेमला परतणारा पहिला गट आल्यानंतर जवळपास १९ वर्षांनंतरही असं दिसतं की बाबेलमध्ये राहणारे यहुदी त्यांना स्वच्छेने भेटवस्तू पाठवतच होते.—जख. ६:१०.
२० यहोवासाठी आपल्याला हवं ते करता येत नसलं, तरी आपण याची खातरी ठेवू शकतो, की त्याला खूश करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे जे प्रयत्न करतो त्यांची तो कदर करतो. हे आपल्याला कसं कळतं? जखऱ्याच्या दिवसांत यहोवाने त्याच्या संदेष्ट्याला बाबेलच्या बंदिवानांनी पाठवलेल्या सोन्या-चांदीपासून एक मुकुट बनवायला सांगितला होता. (जख. ६:११) हा “सुंदर मुकुट” त्यांनी उदारपणे केलेल्या दानाची एक “आठवण” असणार होता. (जख. ६:१४) यावरून आपण ही खातरी ठेवू शकतो, की कठीण काळात आपण यहोवाची सेवा करण्यासाठी जे प्रयत्न करतो ते यहोवा कधीच विसरत नाही.—इब्री ६:१०.
२१. भविष्यात येणाऱ्या समस्यांचा धैर्याने सामना करायला आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?
२१ यात कुठलीच शंका नाही, की या शेवटल्या काळात आपल्याला अनपेक्षित परिस्थितींचा सामना करावा लागणार आहे. इतकंच नाही तर भविष्यात आपली परिस्थिती आणखी बिघडेल. (२ तीम. ३:१, १३) पण आपण या चिंतेने भारावून जाऊ नये. हाग्गयच्या दिवसांत यहोवाने त्याच्या लोकांना जे म्हटलं, ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. यहोवाने म्हटलं: “मी तुमच्यासोबत आहे . . . म्हणून भिऊ नका.” (हाग्ग. २:४, ५) आपणसुद्धा या गोष्टीची खातरी ठेवू शकतो, की जोपर्यंत आपण यहोवाची इच्छा पूर्ण करत राहू तोपर्यंत तो आपल्याला मदत करेल. या लेखातून आपण हाग्गय आणि जखऱ्या संदेष्ट्यांच्या भविष्यवाण्यांमधून आणि एज्राच्या उदाहरणातून बरंच काही शिकलो. शिकलेले धडे लागू केल्यामुळे भविष्यात अचानक समस्या येतील तेव्हा त्यांचा सामना करताना यहोवावरचा आपला भरवसा टिकवून ठेवायला आपल्याला मदत होईल.
गीत १२२ निर्भय व निश्चयी राहा!
a आर्थिक संकटाचा, अस्थिर राजकीय परिस्थितीचा किंवा प्रचारकार्यात होणाऱ्या विरोधाचा सामना करावा लागतो, तेव्हा यहोवावरचा आपला भरवसा मजबूत करायला मदत व्हावी म्हणून हा लेख तयार करण्यात आला आहे.
b “सैन्यांचा देव यहोवा” हे शब्द हाग्गयच्या पुस्तकात १४ वेळा येतात. या शब्दांवरून यहुद्यांना आणि आज आपल्यालाही याची आठवण होते, की यहोवाकडे अमर्याद ताकद आहे आणि स्वर्गदूतांचं अफाट सैन्य त्याच्या आज्ञेत आहेत.—स्तो. १०३:२०, २१.
c काही नावं बदलण्यात आली आहेत.
d नियमशास्त्राच्या प्रती बनवण्यात कुशल असलेल्या एज्राचासुद्धा यरुशलेमला जाण्याआधीच यहोवाच्या भविष्यवाणीवर मजबूत विश्वास होता.—२ इति. ३६:२२, २३; एज्रा ७:६, ९, १०; यिर्म. २९:१४.
e चित्राचं वर्णन: एक भाऊ अधिवेशनाला जाण्यासाठी आपल्या बॉसकडे सुट्टी मागत आहे, पण त्याला सुट्टी मिळत नाही. तो पुन्हा सुट्टी मागायला जाण्याआधी मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी यहोवाकडे प्रार्थना करतो. तो आपल्या बॉसला अधिवेशनाच्या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका दाखवतो आणि बायबलवर आधारित असलेला हा कार्यक्रम त्याच्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते सांगतो. याची त्याच्या बॉसवर चांगली छाप पडते आणि तो त्याच्या रजेच्या अर्जाचा पुन्हा विचार करतो.