अभ्यास लेख ६
बायबल त्याच्या लेखकाबद्दल काय सांगतं?
“मी ज्या गोष्टी तुला सांगतोय, त्या सगळ्या एका पुस्तकात लिही.”—यिर्म. ३०:२.
गीत ९६ देवाचं अनमोल वचन
सारांश a
१. यहोवाने आपल्याला बायबल दिलंय यासाठी आपण त्याचे आभार का मानले पाहिजेत?
यहोवाने आपल्याला बायबल दिलंय, यासाठी आपण त्याचे किती आभारी आहोत! रोजच्या जीवनातल्या समस्यांना यशस्वीपणे तोंड देण्यासाठी, बायबलमध्ये त्याने मोलाचा सल्ला दिला आहे. तसंच, भविष्यासाठी त्याने आपल्याला एक सुंदर आशाही दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, बायबलमध्ये त्याने त्याच्या बऱ्याच गुणांबद्दल सांगितलंय. त्याच्या या सुंदर गुणांवर आपण विचार करतो तेव्हा आपलं मन खरंच भरून येतं आणि आपल्याला त्याच्याशी आणखी जवळची मैत्री करावीशी वाटते.—स्तो. २५:१४.
२. लोकांनी आपल्याला जाणून घ्यावं म्हणून यहोवाने काय केलं?
२ लोकांनी आपल्याला जाणून घ्यावं अशी यहोवाची इच्छा आहे. त्यासाठी पूर्वी त्याने काही लोकांना स्वप्नं आणि दृष्टान्त दाखवले. तसंच स्वर्गदूतांद्वारे त्यांच्यापर्यंत संदेश पोचवले. (गण. १२:६; प्रे. कार्यं १०:३, ४) पण ही स्वप्नं, दृष्टान्त आणि संदेश लिहून ठेवले नसते, तर आपल्याला त्यांबद्दल कळलं नसतं आणि त्यांचा अभ्यासही करता आला नसता. म्हणूनच यहोवाने काही माणसांना या गोष्टी ‘एका पुस्तकात लिहायला’ सांगितल्या. (यिर्म. ३०:२) ‘खऱ्या देवाचा मार्ग परिपूर्ण असल्यामुळे’ त्याने आपल्यासोबत बोलण्यासाठी हे जे माध्यम निवडलंय, ते खरंच खूप चांगलं आणि आपल्या फायद्याचं आहे, अशी आपण खातरी ठेवू शकतो.—स्तो. १८:३०.
३. बायबल आजपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी यहोवाने काय केलं आहे? (यशया ४०:८)
३ यशया ४०:८ वाचा. गेल्या हजारो वर्षांपासून बायबलने विश्वासू स्त्री-पुरूषांना खूप मोलाचं मार्गदर्शन दिलंय. हे कसं काय शक्य झालं? कारण बायबल तर अशा साहित्यांवर लिहिण्यात आलं होतं, जे सहज नष्ट होऊ शकतं. त्यामुळे त्याच्या मूळ प्रतींपैकी आज एकही प्रत अस्तित्वात नाही. पण आपल्या या पवित्र लिखाणाच्या बऱ्याच प्रती तयार केल्या जातील अशी योजना यहोवाने केली. प्रती तयार करणारे नकलाकार जरी अपरिपूर्ण असले, तरी ते आपलं काम करताना खूप बारीक लक्ष द्यायचे. आणि म्हणूनच हिब्रू शास्त्रवचनांबद्दल एका विद्वानाने असं म्हटलं: “आपण खातरीने म्हणू शकतो, की या लिखाणांसारखं दुसरं कोणतंही प्राचीन लिखाण आपल्यापर्यंत जसंच्या तसं पोचलेलं नाही.” बायबल हे जरी हजारो वर्षांपूर्वी आणि नष्ट होणाऱ्या साहित्यांवर लिहिलेलं असलं, तसंच त्याच्या प्रती बनवणारे नकलाकार अपरिपूर्ण असेल, तरी आज आपण बायबलमध्ये जे काही वाचतो ते त्याच्या लेखकाचेच विचार आहेत असं आपण खातरीने म्हणू शकतो.
४. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
४ प्रत्येक “चांगली देणगी आणि परिपूर्ण दान,” हे यहोवाकडून आहे. (याको. १:१७) बायबल ही यहोवाकडून मिळालेली एक सुंदर भेट आहे. तुम्हाला कोणी कधी अशी भेट दिली आहे का, ज्याची तुम्हाला खूप गरज होती? यावरून कळतं, की ती व्यक्ती आपल्याला खूप चांगलं ओळखते आणि आपल्याला काय हवंय हे तिला चांगलं माहीत आहे. बायबलसुद्धा असंच आहे. आपण जेव्हा बायबल वाचतो, तेव्हा यहोवा आपल्याला किती चांगलं ओळखतो आणि आपल्याला कशाची गरज आहे हे त्याला चांगलं माहीत आहे, हे आपल्याला कळतं. तसंच, बायबल वाचल्यामुळे यहोवाच्या बऱ्याच गुणांबद्दल आपल्याला समजतं. जसं की, तो खूप बुद्धिमान आहे, न्यायी आहे आणि त्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे. या लेखात आपण याच तीन गुणांबद्दल पाहणार आहोत. तर चला सगळ्यात आधी आपण हे पाहू, की बायबल वाचल्यामुळे यहोवा खूप बुद्धिमान आहे हे आपल्याला कसं कळतं.
बायबल वाचल्यामुळे देव किती बुद्धिमान आहे ते आपल्याला कळतं
५. बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टींवरून कसं कळतं की देव बुद्धिमान आहे?
५ आपल्याला चांगल्या सल्ल्याची किती गरज आहे, हे यहोवाला माहीत आहे. म्हणूनच बायबलसारखी जी सुंदर भेट त्याने दिली आहे, त्यात रोजच्या जीवनासाठी लागणारे बरेच सल्ले आहेत. बायबलचा सल्ला मानल्यामुळे बऱ्याच लोकांना फायदा झाला आहे आणि त्यामुळे त्यांचं पूर्ण जीवनच बदलून गेलंय. यावरून कळतं, की यहोवा खरंच किती बुद्धिमान आहे. मोशेने जेव्हा बायबलची सुरवातीची काही पुस्तकं लिहिली, तेव्हा इस्राएली लोकांना त्याने काय म्हटलं याकडे लक्ष द्या: “हे फक्त पोकळ शब्द नाहीत, तर हे तुमचं जीवन आहे.” (अनु. ३२:४७) ज्यांनी बायबलचा सल्ला मानला ते चांगलं आणि आनंदी जीवन जगू शकले. (स्तो. १:२, ३) आज बायबल लिहून हजारो वर्षं जरी झाली असली, तरी त्याची ताकद कमी झालेली नाही. आजसुद्धा बायबलमुळे बऱ्याचं लोकांचं जीवन बदललंय. उदाहरणार्थ, jw.org/mr वर “बायबलमुळे जीवन बदलतं” ही लेखमालिका जर तुम्ही पाहिली, तर तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं पाहायला मिळतील, ज्यांचं जीवन बायबलमुळे बदलून गेलंय. खरंच जे लोक आज देवाच्या वचनावर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनात ते ‘कार्य करत आहे.’—१ थेस्सलनी. २:१३.
६. बायबलसारखं जगात दुसरं कोणतंच पुस्तक नाही असं का म्हणता येईल?
६ बायबलसारखं जगात दुसरं कोणतंच पुस्तक नाही. असं का म्हणता येईल? कारण बायबलचा लेखक यहोवा देव सर्वशक्तिमान देव आहे. तो नेहमीच अस्तित्वात होता आणि तो कायम अस्तित्वात राहील. तसंच, त्याच्यासारखं बुद्धिमान दुसरं कोणीही नाही. पण इतर पुस्तकांचा विचार केला तर त्यांचे लेखक एक ना एक दिवस मरून जातात आणि त्यातल्या गोष्टी काही काळानंतर काहीच उपयोगाच्या राहत नाहीत. पण बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टी कायमच उपयोगाच्या असल्याचं दिसतं. आधीच्या काळातसुद्धा लोकांना त्यामुळे फायदा झालाय आणि आजही होतोय. जेव्हा आपण हे पवित्र पुस्तक वाचतो आणि त्यात शिकायला मिळालेल्या गोष्टींवर मनन करतो, तेव्हा त्यातला सल्ला आपल्या जीवनात कसा लागू करायचा, हे समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा लेखक यहोवा देव त्याची जबरदस्त पवित्र शक्ती आपल्याला देतो. (स्तो. ११९:२७; मला. ३:१६; इब्री ४:१२) जर बायबलचा लेखकच आपल्याला इतकी मदत करायला तयार आहे, तर मग बायबल नियमितपणे वाचून आपण त्याचा फायदा का करून घेऊ नये?
७. पूर्वीच्या काळात देवाच्या वचनामुळे कशा प्रकारे देवाच्या लोकांमध्ये एकता टिकून राहिली?
७ बायबलचा लेखक किती बुद्धिमान आहे, हे बायबलच्या आणखी एका वैशिष्ट्यावरून समजतं. आणि ते वैशिष्ट्य म्हणजे, बायबलमध्ये देवाच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यातलं ऐक्य टिकवून ठेवायची ताकद आहे. इस्राएली लोक जेव्हा वचन दिलेल्या देशात आले, तेव्हा ते देशभर पसरले आणि वेगवेगळ्या भागांमध्ये राहू लागले. ते वेगवेगळी कामं करायचे. काही जण मासेमारी करायचे, काही जण कळप राखायचे, तर आणखी काही जण शेतीवाडी करायचे. त्यामुळे एका भागात राहणारे इस्राएली लोक दुसऱ्या भागात राहणाऱ्या आपल्या भाऊबहिणींना अगदी सहज विसरू शकत होते. पण यहोवाने असं होऊ दिलं नाही. त्याने आपल्या लोकांना अशी आज्ञा दिली, की काही खास प्रसंगी त्यांनी एकत्र यावं म्हणजे देवाचं वचन त्यांना ऐकता येईल आणि त्याचा अर्थ समजून घेता येईल. (अनु. ३१:१०-१३; नहे. ८:२, ८, १८) विचार करा, एक विश्वासू इस्राएली या आज्ञेप्रमाणे यरुशलेमला यायचा आणि वेगवेगळ्या भागातून आलेल्या आपल्या लाखो भाऊबहिणींना भेटायचा, तेव्हा त्याला किती आनंद होत असेल! अशा प्रकारे यहोवाने आपल्या लोकांना एकत्र यायला आणि त्यांच्यातली एकी टिकवून ठेवायला मदत केली. नंतर जेव्हा ख्रिस्ती मंडळ्यांची स्थापना झाली, तेव्हा त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे आणि वेगवेगळ्या संस्कृतीचे बरेच लोक होते. पण देवाच्या वचनावर प्रेम असल्यामुळे ते सगळे एकत्र मिळून खऱ्या देवाची उपासना करू शकत होते. आणि नव्याने विश्वास स्वीकारणारे लोक इतर भाऊबहिणींच्या मदतीने आणि सभांमध्ये एकत्र येऊन देवाचं वचन चांगल्या प्रकारे समजू शकत होते.—प्रे. कार्यं २:४२; ८:३०, ३१.
८. आजसुद्धा यहोवाच्या लोकांना एकत्र मिळून त्याची उपासना करायला बायबल कशी मदत करत आहे?
८ आजसुद्धा आपला बुद्धिमान देव बायबलद्वारे आपल्या लोकांना शिकवत आहे. आणि त्यांना एकत्र करून त्यांच्यातलं ऐक्य टिकवून ठेवत आहे. ते कसं? बायबलद्वारेच आपल्याला यहोवाबद्दलची सगळी सत्यं शिकायला मिळतात. आजसुद्धा आपण सभांमध्ये, संमेलनांमध्ये आणि अधिवेशनांमध्ये एकत्र येतो. त्या ठिकाणी शास्त्रवचनं वाचून दाखवली जातात, स्पष्ट करून सांगितली जातात आणि त्यांच्यावर चर्चा केली जाते. अशा प्रकारे आपल्या उपासकांनी “खांद्याला खांदा लावून” आपली उपासना करावी हा यहोवाचा जो मूळ उद्देश होता तो बायबलमुळे पूर्ण होत आहे.—सफ. ३:९.
९. बायबलमधल्या गोष्टी कोण समजू शकतं? (लूक १०:२१)
९ यहोवा बुद्धिमान आहे हे आणखी एका गोष्टीवरून दिसून येतं. त्याने शास्त्रवचनांतल्या बऱ्याच गोष्टी अशा प्रकारे लिहून घेतल्या आहेत, की फक्त नम्र मनाचे लोकच त्या समजू शकतात. (लूक १०:२१ वाचा.) आज जगभरातले बरेच लोक बायबल वाचतात. याबद्दल एका विद्वानाने असं म्हटलं: “बायबल हे एकच असं पुस्तक आहे जे सगळ्यात जास्त वाचलं जातंय आणि तेही खूप मन लावून.” पण फक्त नम्र मनाचे लोकच त्यातल्या गोष्टी समजू शकतात आणि त्याप्रमाणे चालू शकतात.—२ करिंथ. ३:१५, १६.
१०. यहोवा बुद्धिमान आहे हे बायबलमधल्या आणखी कोणत्या गोष्टीमुळे कळतं?
१० यहोवा बुद्धिमान आहे, हे बायबलमधल्या आणखी एका गोष्टीमुळे कळतं. यहोवा बायबलद्वारे आपल्या सगळ्यांनाच शिकवतो. पण तो आपल्याला फक्त एक गट म्हणून नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकाला एक व्यक्ती म्हणूनसुद्धा शिकवतो आणि सांत्वन देतो. आपण बायबल वाचतो तेव्हा आपल्या प्रत्येकाबद्दल यहोवाला किती काळजी आहे, ते आपल्याला जाणवतं. (यश. ३०:२१) तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का, की तुम्ही एखाद्या समस्येतून जात आहात आणि बायबलमधून एखादं वचन वाचल्यावर तुम्हाला जाणवतं, की हे खास माझ्यासाठीच लिहिलंय? बायबल खरंतर लाखो-करोडो लोकांसाठी लिहिण्यात आलं होतं. पण तरीसुद्धा असं कसं होऊ शकतं, की त्यातली माहिती आजही लागू होते आणि ती वाचत असताना जणू तुमच्यासाठीच लिहिली आहे, असं तुम्हाला वाटतं? कारण बायबलचा लेखक विश्वातला सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहे.—२ तीम. ३:१६, १७.
बायबल वाचल्यामुळे देव किती न्यायी आहे ते कळतं
११. बायबल ज्या प्रकारे लिहिण्यात आलं त्यावरून यहोवा भेदभाव करत नाही हे कसं दिसून येतं?
११ यहोवा एक न्यायी देव आहे. (अनु. ३२:४) आणि जो न्यायी आहे तो कधीच भेदभाव करत नसतो. यहोवासुद्धा कधीच भेदभाव करत नाही. (प्रे. कार्यं १०:३४, ३५; रोम. २:११) बायबल ज्या भाषांमध्ये लिहिण्यात आलं होतं त्यावरून यहोवाचा हा सुंदर गुण दिसून येतो. बायबलच्या पहिल्या ३९ पुस्तकांपैकी बहुतेक पुस्तकं ही हिब्रू भाषेत लिहिण्यात आली आहेत. कारण त्या काळात देवाचे लोक ही भाषा चांगल्या प्रकारे समजू शकत होते. पण पहिल्या शतकापर्यंत ग्रीक भाषा ही सगळ्यात जास्त बोलली जाऊ लागली. त्यामुळे बायबलची शेवटली २७ पुस्तकं याच भाषेत लिहिण्यात आली आहेत. यहोवाने आपलं वचन फक्त एकाच भाषेत लिहिलं जावं असा विचार केला नाही. पण आज पाहिलं तर जगभरात वेगवेगळी भाषा बोलणारे जवळपास ८ अब्ज लोक आहेत. मग या सगळ्या लोकांना यहोवाबद्दल कसं काय शिकायला मिळेल?
१२. दानीएल १२:४ मधले शब्द या शेवटल्या काळात कसे पूर्ण होत आहेत?
१२ यहोवाने दानीएल संदेष्ट्याद्वारे असं वचन दिलं होतं, की अंताच्या समयात बायबलमध्ये असलेलं “खरं ज्ञान खूप वाढेल,” आणि अनेकांना ते कळेल. (दानीएल १२:४ वाचा.) आज बायबल आणि बायबल आधारित साहित्याचं खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर केलं जात आहे, प्रकाशित केलं जात आहे आणि वितरण केलं जात आहे. आणि अशा प्रकारे बायबलमधलं खरं ज्ञान वाढत आहे. आज बायबल जगातलं सगळ्यात जास्त भाषांतर केलेलं आणि वितरीत केलेलं पुस्तक आहे. आज बऱ्याच कंपन्या बायबलचं भाषांतर करून त्यांची छपाई करतात. पण त्यांच्या किंमती खूप जास्त आहेत. पण यहोवाच्या साक्षीदारांनी मात्र संपूर्ण बायबल किंवा त्याच्या काही भागांचं २४० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर केलं आहे. आणि ते मिळवण्यासाठी आज एक पैसासुद्धा द्यावा लागत नाही. त्यामुळे अंत येण्याआधी आज सगळ्या राष्ट्रांमधले लोक ‘राज्याच्या या आनंदाच्या संदेशाला’ खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. (मत्त. २४:१४) यहोवाची अशी इच्छा आहे, की जगातल्या जास्तीत जास्त लोकांनी बायबल वाचून त्याला जाणून घ्यावं. यातून तो किती न्यायी देव आहे हे दिसून येतं. तसंच तो किती प्रेमळ आहे, हेसुद्धा दिसून येतं.
बायबल वाचल्यामुळे देव किती प्रेमळ आहे हे दिसून येतं
१३. बायबलमधून यहोवाचं प्रेम दिसून येतं असं आपण का म्हणू शकतो? (योहान २१:२५)
१३ बायबल वाचल्यामुळे यहोवाचा सगळ्यात मुख्य गुण कोणता आहे, हे आपल्याला कळतं; तो म्हणजे प्रेम. (१ योहा. ) यहोवाने त्याच्या वचनात म्हणजे बायबलमध्ये कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि कोणत्या सांगितलेल्या नाहीत याचाच विचार करा. त्याच्यासोबत एक जवळचं नातं जोडण्यासाठी, तसंच सध्या एक आनंदी जीवन जगण्यासाठी आणि पुढे भविष्यात सर्वकाळचं जीवन मिळवण्यासाठी जितक्या माहितीची गरज आहे, अगदी तितकीच माहिती त्याने बायबलमध्ये दिली आहे. देवाने आपल्याला ज्या माहितीची गरज नाही, ती माहिती देऊन आपल्याला गोंधळात टाकलेलं नाही. यावरून कळतं, की त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे.— ४:८योहान २१:२५ वाचा.
१४. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे, हे बायबलच्या आणखी कोणत्या गोष्टीवरून आपल्याला कळतं?
१४ यहोवा ज्या प्रकारे आपल्याशी बोलतो त्यातूनसुद्धा त्याचं प्रेम दिसून येतं. तो नेहमी आपला आदर होईल अशा प्रकारे आपल्याशी बोलतो. त्याने बायबलमध्ये आपल्या जीवनातल्या प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी नियमावर नियम घालून दिले नाहीत. याउलट, तो वेगवेगळ्या लोकांच्या जीवन कथांवरून, रोमांचक भविष्यवाण्यांमधून आणि व्यावहारिक सल्ला देऊन आपल्याला योग्य निर्णय घ्यायला मदत करतो. अशा प्रकारे देवाचं वचन आपल्याला मनापासून त्याच्यावर प्रेम करायला आणि त्याची आज्ञा पाळायला प्रोत्साहन देतं.
१५. (क) यहोवाला आपल्याबद्दल काळजी आहे, हे त्याच्या वचनातून आपल्याला कसं दिसून येतं? (ख) चित्रात दाखवलेली मुलगी, तरुण भाऊ आणि एक वयस्कर बहीण बायबल काळातल्या कोणत्या व्यक्तींवर मनन करत आहेत? (उत्प. ३९:१, १०-१२; २ राजे ५:१-३; लूक २:२५-३८)
१५ यहोवाला आपल्याबद्दल खूप काळजी आहे हेसुद्धा बायबलमधून आपल्याला कळतं. कसं बरं? बायबलमध्ये असे कितीतरी अहवाल आहेत, ज्यांतून मानवी भावना व्यक्त होतात. आपण बायबलमध्ये सांगितलेल्या लोकांच्या भावना समजू शकतो, कारण तेसुद्धा “आपल्यासारख्याच भावना” असलेले लोक होते. (याको. ५:१७) सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायबल काळातल्या लोकांसोबत यहोवा कसा वागला हे जेव्हा आपण पाहतो, तेव्हा तो खूप ‘दयाळू आणि कृपाळू’ आहे हे आपल्याला समजतं.—याको. ५:११.
१६. आपल्या उपासकांनी चुका केल्यानंतर यहोवा त्यांच्याशी ज्या प्रकारे वागला, त्यातून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं? (यशया ५५:७)
१६ यहोवा आणखी कोणत्या एका मार्गाने आपल्यावर प्रेम करतो, हेसुदधा बायबलमधून आपल्याला कळतं. आपल्याकडून जेव्हा चुका होतात तेव्हा यहोवा आपल्याला सोडून देणार नाही अशी खातरी आपल्याला बायबलमधून मिळते. इस्राएली लोकांचाच विचार करा. त्यांनी यहोवाविरुद्ध वारंवार पाप केलं. पण जेव्हा त्यांनी मनापासून पश्चात्ताप केला, तेव्हा यहोवाने त्यांना क्षमा केली. (यशया ५५:७ वाचा.) देवाचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनासुद्धा माहीत होतं. त्या वेळी मंडळीतला एक जण गंभीर पाप करत होता. पण नंतर जेव्हा त्याने मनापासून पश्चात्ताप केला, तेव्हा प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने त्यांना त्याला ‘क्षमा करून सांत्वन द्यायला’ सांगितलं. (२ करिंथ. २:६, ७; १ करिंथ. ५:१-५) आपल्या उपासकांच्या हातून जेव्हा चुका झाल्या तेव्हा यहोवाने त्यांना नाकारलं नाही. ही गोष्ट खरंच किती विशेष आहे! उलट त्यांच्यावर प्रेम असल्यामुळे त्याने त्यांना मदत केली, त्यांना सुधारलं आणि त्यांना त्याच्यासोबत जवळची मैत्री करायला मदत केली. आजही जे आपल्या चुकांबद्दल मनापासून पश्चात्ताप करतात त्यांना यहोवा क्षमा करायला तयार आहे.—याको. ४:८-१०.
यहोवाकडून मिळालेल्या मौल्यवान भेटीची कदर करा
१७. बायबल ही एक मौल्यवान भेट आहे असं का म्हणता येईल?
१७ बायबल ही यहोवाकडून मिळालेली एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान भेट आहे. असं का म्हणता येईल? कारण बायबलमधून आपल्याला कळतं की यहोवा किती बुद्धिमान आहे, न्यायी आहे आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे. इतकंच नाही तर आपल्याला हेही कळतं, की आपण यहोवाला जाणून घ्यावं आणि त्याच्याशी मैत्री करावी अशी त्याची इच्छा आहे.
१८. यहोवाकडून मिळालेल्या अनमोल भेटीबद्दल आपण त्याचे आभार कसे मानू शकतो?
१८ बायबल ही यहोवाकडून मिळालेली एक मौल्यवान भेट आहे, हे आपण कधीच विसरू नये. (याको. १:१७) उलट या सुंदर भेटीसाठी आपण यहोवाचे नेहमी आभार मानले पाहिजेत. त्यासाठी आपण रोज बायबल वाचलं पाहिजे आणि त्यावर मनन केलं पाहिजे. हे करण्यासाठी आपण जी मेहनत घेऊ त्यावर यहोवा नक्की आशीर्वाद देईल आणि त्याचं ज्ञान आपल्याला मिळेल अशी खातरी आपण बाळगू शकतो.—नीति. २:५.
गीत ९८ देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र
a बायबल आपल्याला यहोवासोबत एक जवळची मैत्री करायला मदत करतं. या पवित्र पुस्तकातून आपण देवाच्या बुद्धीबद्दल, न्यायाबद्दल आणि प्रेमाबद्दल काय शिकू शकतो? आपल्याला जे शिकायला मिळेल त्यामुळे देवाच्या वचनाबद्दलची आपली कदर आणखी वाढेल. यासोबतच, बायबल आपल्या स्वर्गातल्या पित्याकडून मिळालेली एक सुंदर भेट आहे याची जाणीव आपल्याला होईल.