मुख्य विषय | सर्वात चांगली भेट!
“मला मिळालेली ती सर्वात चांगली भेटवस्तू होती”
हे शब्द एका १३ वर्षांच्या मुलीचे आहेत. तिला जेव्हा एक छानसा कुत्रा भेट म्हणून मिळाला, तेव्हा तिने असं म्हटलं होतं. एका यशस्वी व्यवसायिकेच्या बाबांनी, ती शाळेत असताना तिला कंप्युटर भेट म्हणून दिला होता. ती म्हणते की या भेटवस्तूमुळे तिचं आयुष्य बदलून गेलं. नवीनच लग्न झालेला एक पती म्हणतो की त्याच्या पत्नीने त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला त्याला स्वतःच्या हातांनी बनवलेलं कार्ड दिलं. तो म्हणतो, की त्याला मिळालेल्या भेटवस्तूंपैकी ही सर्वात चांगली भेटवस्तू होती.
प्रत्येक वर्षी, अनेक लोक आपल्या मित्रांना किंवा नातेवाइकांना काही खास प्रसंगी भेटवस्तू देतात. ती भेटवस्तू “सर्वात चांगली” असावी यासाठी ते बराच खटाटोप करतात. त्यासाठी ते आपला बराच वेळ आणि पैसा खर्च करतात. आणि अनेकांना जेव्हा वर उल्लेख केलेल्या प्रतिक्रियांसारखी प्रतिक्रिया ऐकायला मिळते, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. तुमच्याबाबतीत काय? मनापासून कदर केली जाईल अशी एखादी भेटवस्तू तुम्हाला मिळावी किंवा तुम्ही एखाद्याला द्यावी, अशी तुमची इच्छा आहे का?
असं करणं सर्वांनाच आवडेल. कारण ज्याला भेटवस्तू मिळते त्यालाच नाही, तर जो भेटवस्तू देतो त्यालाही आनंद होतो. खरंतर बायबलही म्हणतं: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.” (प्रेषितांची कार्ये २०:३५) आपण दिलेल्या भेटवस्तूची मनापासून कदर केली जाते, तेव्हा देण्यात मिळणाऱ्या आनंदात आणखीन भर पडते.
मग तुम्ही भेट देण्यातून खरा आनंद कसा मिळवू शकता? आणि, तुम्ही ज्या व्यक्तीला भेट देणार आहात तिलाही खरा आनंद कसा मिळू शकतो? आणि समजा तुम्हाला “सर्वात चांगली” भेटवस्तू देणं शक्य नसेल, तर तुम्ही असं काय करू शकता ज्यामुळे तुमच्या भेटवस्तूची मनापासून कदर केली जाईल?