फूड अॅलर्जी आणि फूड इनटोलरन्स—काय फरक आहे?
एमीली: “मी चमचा खाली ठेवला आणि तोंडात कसंतरी वाटू लागलं. माझी जीभ जड होऊ लागली. चक्कर येऊ लागली आणि श्वास घेताना त्रास होऊ लागला. माझ्या हातावर आणि मानेवर पित्त उठू लागलं. मी स्थिर राहण्याचा प्रयत्न केला पण मला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहचणं गरजेचं होतं!”
बहुतेक लोकांसाठी, खाणं हा एक आनंदी अनुभव असतो. पण अनेकांसाठी काही प्रकारचे खाद्यपदार्थ “विषासारखे” ठरू शकतात. वर उल्लेख केलेल्या एमीलीसारखं त्यांना फूड अॅलर्जी, म्हणजे काही ठरावीक खाद्यपदार्थांची अॅलर्जी होऊ शकते. एमीलीवर या अॅलर्जीचा जो वाईट परिणाम झाला त्याला अॅनाफिलॅक्सिस असं म्हणतात. यामुळे एका व्यक्तीचा जीवदेखील जाऊ शकतो. पण बहुतेक अॅलर्जी जीवाला घातक नसतात.
गेल्या काही वर्षांत, वेगवेगळ्या फूड अॅलर्जी आणि इनटॉलरन्सबद्दल जास्त माहिती उजेडात आली आहे. काही संशोधनातून असं आढळून आलं की, अनेक लोकांना अॅलर्जी असल्यासारखं वाटत असलं, तरी त्यांपैकी फक्त थोड्या लोकांनाच खरोखरी अॅलर्जी असल्याचं सिद्ध होतं.
फूड अॅलर्जी म्हणजे काय?
द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडीकल असोसिएशन यात डॉक्टर जेनीफर जे. श्नायडर शेफन आणि इतर शास्त्रज्ञांनी प्रकाशित केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे, “फूड अॅलर्जीसाठी जगभरात वेगवेगळ्या व्याख्या दिल्या जातात.” पण बहुतेक जाणकार हे मानतात की अॅलर्जीस् शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमुळे होतात.
एखाद्या खाद्यपदार्थात असलेल्या प्रोटिनमुळे अॅलर्जी होते. आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती चुकून त्या खाद्यपदार्थातील प्रोटिनला हानीकारक समजते. म्हणून ते प्रोटिन आपल्या शरीरात जातं तेव्हा कदाचित ही शक्ती ते नाश करण्यासाठी त्याविरुद्ध ईम्युनोग्लोब्युलीन-ई (आयजीई) सारखे घटक (अॅन्टीबॉडीज) तयार करते. जेव्हा हा पदार्थ पुन्हा खाल्ला जातो तेव्हा या घटकांमुळे हिस्टामाईन आणि त्यासारखी इतर रसायनं तयार होतात.
योग्य परिस्थितीत म्हणजे काही अॅलर्जी नसताना, जेव्हा हिस्टामाईन शरीरात तयार होतं तेव्हा ते शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीसाठी चांगलं असतं. पण ज्या लोकांना खाद्यपदार्थातील एखादं प्रोटिन चालत नसेल तर त्यांच्या शरीरात हिस्टामाईन तयार झाल्यामुळे त्यांना अॅलर्जी होते. पण असं का होतं याची कारणं अजून कळलेली नाहीत.
आपण एखादा पदार्थ पहिल्यांदा खातो तेव्हा आपल्याला काहीच होत नाही. पण जेव्हा तो आपण पुन्हा खातो तेव्हा आपल्याला अॅलर्जी का होते, हे आपल्याला वरील गोष्टीवरून कळतं.
फूड इनटॉलरन्स म्हणजे काय?
फूड इनटॉलरन्स म्हणजे एखादा खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे होणारा फूड अॅलर्जीसारखा परिणाम. पण फूड अॅलर्जीच्या उलट (जी शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमुळे होते) फूड इनटॉलरन्स हे शरीराच्या पचन संस्थेमुळे होतं, त्यामुळे शरीरात अॅन्टीबॉडीज सारखे घटक तयार होत नाहीत. एका व्यक्तीच्या पचन शक्तीत एखादा घटक कमी असल्यामुळे, त्याला एखादा पदार्थ किंवा त्यातील काही रसायनं पचवणं जड जाऊ शकतं. उदाहरणार्थ, काहींना
लॅक्टोज इनटॉलरन्स होतो कारण त्यांच्या पोटात दुधाच्या पदार्थांत असलेली साखर पचवणारे घटक तयार होत नाहीत.फूड इनटॉलरन्सने अॅन्टीबॉडीज सारखे घटक तयार होत नाही. त्यामुळे एखादा पदार्थ पहिल्यांदा खाल्ल्यानेदेखील फूड इनटॉलरन्स होऊ शकतो. आपण तो पदार्थ किती खातो यावर देखील ते अवलंबून आहे. थोड्या प्रमाणात तो पदार्थ खाल्ल्याने काही त्रास होणार नाही पण जास्त प्रमाणात खाल्ल्यावर मात्र इनटॉलरन्स होऊ शकतो. हे अॅलर्जीपेक्षा वेगळं आहे कारण अॅलर्जी असलेला पदार्थ थोड्या प्रमाणात खाल्ल्यानेदेखील जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
आपण दोघांची लक्षणं कशी ओळखू शकतो?
तुम्हाला जर फूड अॅलर्जी झाली असेल तर खाज येणं, पित्त उठणं, घसा, डोळे किंवा जीभेला सूज येणं, उलट्या किंवा जुलाब होणं असे परिणाम दिसतील. पण यापेक्षाही भयानक परिणाम होऊ शकतात जसं की, ब्लड प्रेशर कमी होणं, चक्कर येणं किंवा हार्टअटॅक येणं. अॅलर्जीने होणारे परिणाम झपाट्याने वाढून मृत्यूदेखील होऊ शकतो.
अॅलर्जी कुठल्याही खाद्यपदार्थामुळे होऊ शकते. पण सर्वात त्रासदायक अॅलर्जी पुढील खाद्यपदार्थांमुळे होतात: दूध, अंडी, मासे, कोलंबी-शिंपले यांसारखे कवच असलेले मासे, शेंगदाणे, सोयाबीन, गहू आणि अक्रोड-बदामसारखा सुकामेवा. एका व्यक्तीला कोणत्याही वयात अॅलर्जी होऊ शकते. संशोधनात असं समजलं आहे की जर आईवडीलांपैकी एकाला किंवा दोघांनाही अॅलर्जी असेल तर ती मुलांनादेखील होऊ शकते. पण अनेकवेळा, मुलं मोठी झाल्यावर या अॅलर्जी नाहीशा होतात.
फूड इनटॉलरन्सचे परिणाम हे फूड अॅलर्जीच्या परिणामांसारखे भयानक नसतात. फूड इनटॉलरन्समुळे पोट दुखणं, पोट फुगणं, गॅस होणं, आकडी येणं, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ येणं, थकवा येणं किंवा सतत तब्येत बरी नसल्यासारखं वाटत राहणं हे परिणाम दिसतात. फूड इनटॉलरन्स पुढील काही खाद्यपदार्थांमुळे होऊ शकतो: दुधाचे पदार्थ, गहू, काही खाद्यपदार्थात असलेला ग्लुटन नावाचा पदार्थ, मद्य आणि यीस्ट.
निदान आणि उपचार
जर तुम्हाला फूड अॅलर्जी किंवा फूड इनटॉलरन्स असल्यासारखं वाटत असेल, तर स्वतःच अंदाज बांधून काही खाद्यपदार्थ खाणं बंद करू नका, कारण हे तुमच्यासाठी हानीकारक ठरू शकतं. तसंच तुमच्या शरीराला आवश्यक ती पोषक तत्त्वं मिळणार नाहीत. त्याऐवजी तुम्ही स्वतःला एका चांगल्या डॉक्टरकडून तपासून घेऊ शकता.
फूड अॅलर्जीसाठी कोणतेच ठरावीक उपचार नाहीत. * त्यामुळे ज्या खाद्यपदार्थांमुळे अॅलर्जी होते ते पूर्णपणे टाळण्याशिवाय पर्याय नाही. पण जर तुम्हाला काही खाद्यपदार्थांची कमी प्रमाणात अॅलर्जी किंवा इनटॉलरन्स असेल, तर ते टाळण्यासाठी तुम्ही तो खाद्यपदार्थ कमी प्रमाणात किंवा कमी वेळा खाऊ शकता. पण काही वेळा हा त्रास असणाऱ्यांना ते खाद्यपदार्थ कायमचे किंवा काही काळासाठी तरी सोडून द्यावे लागतात. फूड इनटोलरन्स किती त्रासदायक आहे यावर हे अवलंबून असतं.
जर तुम्हाला फूड अॅलर्जी किंवा फूड इनटॉलरन्स असेल तर तुम्हाला हे जाणून सांत्वन मिळेल की ज्यांना हा त्रास आहे ते ही परिस्थिती हाताळायला शिकले आहेत. आणि ते वेगवेगळ्या पौष्टिक आणि चविष्ट पदार्थांचा आनंद घेत आहेत. (g16-E No. 3)
^ परि. 19 ज्यांना खूप त्रासदायक अॅलर्जी असते त्यांना एक इन्जेक्शन जवळ ठेवण्यास सांगितलं जातं, ज्यात अॅड्रनॅलीन (एपीनेफ्रिन) हे रसायन असतं. अॅलर्जीमुळे अचानक तब्येत बिघडली तर ते स्वतः हे इन्जेक्शन घेऊ शकतात. काही डॉक्टर असं सुचवतात की ज्या मुलांना अॅलर्जी असते, ती मुलं सर्वांना दिसेल असे बॅचकार्ड लावू शकतात ज्यामुळे त्यांच्या शिक्षकांना किंवा सांभाळ करणाऱ्यांना त्यांच्या अॅलर्जीबद्दल माहिती मिळेल.