आपल्या मुलांच्या भावनांची दखल घ्या
६
आपल्या मुलांच्या भावनांची दखल घ्या
हे महत्त्वाचे का आहे? मुलांना आपल्या पालकांना, अर्थात त्यांच्या जीवनातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींना साहजिकच आपल्या भावना सांगाव्याशा वाटतात. पण मुले आपल्या भावना व्यक्त करतात तेव्हा जर आईवडिलांनी प्रत्येक वेळी त्यांची टीका केली तर मुले मनमोकळेपणाने बोलण्याचे सोडून देतील आणि आपल्या भावनांमध्ये व आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच काहीतरी खोट आहे असे त्यांना वाटू लागेल.
हे सोपे का नाही? मुले सहसा आपल्या विचारांची आणि भावनांची अतिशयोक्ती करतात. मुलांनी व्यक्त केलेल्या काही गोष्टी ऐकून कधीकधी आईवडील चिडतात, अस्वस्थ होतात हे ही कबूल आहे. उदाहरणार्थ, नैराश्यामुळे मूल कदाचित असे म्हणते, की “मला मरून जावेसे वाटते.” * आईवडील लगेच त्याला उत्तर देतात, “वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस!” आईवडिलांना भीती वाटते की मुलांना अशा नकारात्मक भावना व्यक्त करू देणे म्हणजे अशा भावनांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे.
यावर उपाय कोणता? ‘ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमे’ असण्याचा जो बायबलमध्ये सल्ला दिला आहे त्याचे पालन करा. (याकोब १:१९) यहोवा देवानेही आपल्या अनेक विश्वासू सेवकांच्या नकारात्मक भावनांचे खंडन केले नाही तर त्या बायबलमध्ये लिहून ठेवल्या आहेत हे आठवणीत असू द्या. (उत्पत्ति २७:४६; स्तोत्र ७३:१२, १३) उदाहरणार्थ ईयोबाला अतिशय खडतर परिस्थितीला तोंड द्यावे लागले तेव्हा त्यानेही मरून जाण्याची इच्छा व्यक्त केली होती.—ईयोब १४:१३.
ईयोबाची विचारसरणी व भावना योग्य नव्हत्या आणि त्या सुधारण्याची गरज होती हे तर उघडच आहे. पण त्याच्या भावनांचे खंडन करण्याऐवजी किंवा त्याला बोलताना मध्येच अडवण्याऐवजी यहोवाने त्याला आपल्या मनातल्या भावना भरभरून व्यक्त करू दिल्या. असे करून त्याने ईयोबाचा आदर केला. आणि त्याचे बोलून झाल्यावरच यहोवाने प्रेमळपणे त्याची चूक सुधारली. एका ख्रिस्ती पित्याने याविषयी असे म्हटले, “यहोवा मला प्रार्थनेत आपले विचार व भावना मोकळेपणाने व्यक्त करू देतो. तेव्हा मीही आपल्या मुलांना त्यांच्या सकारात्मक आणि नकारात्मक, दोन्ही प्रकारच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू द्याव्यात हे रास्तच आहे.”
पुढच्या वेळी तुम्हाला आपल्या मुलाला, “काहीतरी वेड्यासारखे बरळू नकोस,” किंवा “काय बोलतोयस ते जरा विचार करून बोल” असे म्हणण्याचा मोह झाल्यास, येशूचा हा सुप्रसिद्ध नियम आठवा: “लोकांनी तुम्हाशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीहि त्यांच्याशी वर्तन करा.” (लूक ६:३१) उदाहरणार्थ, नोकरीच्या ठिकाणी कोणीतरी तुमचा अपमान केला किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे, कदाचित तुमच्याच एखाद्या चुकीमुळे तुम्ही निराश आहात अशी कल्पना करा. तुम्ही आपले नैराश्य एखाद्या जवळच्या मित्राजवळ बोलून दाखवता. ही नोकरी कराविशी वाटत नाही असे त्याला सांगता. अशावेळी तुमच्या मित्राने काय करावे अशी तुमची अपेक्षा असते? तुम्ही वेड्यासारखे काहीतरी बरळत आहात असे त्याने म्हणावे किंवा समस्या मुळात तुमच्याच चुकीमुळे आहे असे त्याने सांगावे असे तुम्हाला वाटते का? की त्याऐवजी, “अरेरे! खरंच खूप कठीण गेलं असेल तुला हे सहन करायला” असे त्याने म्हटलेले तुम्हाला जास्त आवडेल?
सल्ला देणाऱ्याला खरोखरच आपली परिस्थिती समजते आणि आपल्यासमोर असलेल्या समस्यांची त्याला जाणीव आहे याची खात्री असल्यास मुलांना आणि प्रौढ व्यक्तींनाही सल्ला स्वीकारणे जास्त सोपे जाते. देवाचे वचन म्हणते, “ज्ञान्याच्या हृदयापासून त्याच्या मुखास शिक्षण मिळते. ते त्याच्या वाणीत ज्ञानाची भर घालिते.”—नीतिसूत्रे १६:२३.
तुम्ही दिलेल्या सल्ल्याकडे समोरच्या व्यक्तीने गांभीर्याने लक्ष द्यावे म्हणून तुम्ही काय केले पाहिजे? (g ८/०७)
[तळटीप]
^ आपले जीवन संपवण्याविषयी मुलांनी कोणतीही विधाने केल्यास ती गांभीर्याने घ्या.
[८ पानांवरील संक्षिप्त आशय]
“ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.”—नीतिसूत्रे १८:१३.