‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहा’
‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहा’
“शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”—रोम. १२:१८.
१, २. (क) येशूने आपल्या अनुयायांना कोणत्या गोष्टीविषयी आधीच सांगितले होते? (ख) विरोध होत असताना आपण कोणती मनोवृत्ती दाखवावी याबद्दलचा उपयुक्त सल्ला आपल्याला कोठे आढळतो?
येशूने आपल्या शिष्यांना आधीच सांगितले होते, की जगातील लोक त्यांचा विरोध करतील. ते असे का करतील याचे कारणही येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या संध्याकाळी त्यांना सांगितले होते. त्याने आपल्या प्रेषितांना म्हटले: “तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करिते.”—योहा. १५:१९.
२ येशूचे हे शब्द किती खरे आहेत हे प्रेषित पौलाने स्वतः अनुभवले. आपला तरुण सोबती तीमथ्य याला लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात पौलाने म्हटले: ‘तू माझे शिक्षण, आचार, संकल्प, विश्वास, सहनशीलता, प्रीति, धीर, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे ही ओळखली आहेत.’ मग पुढे त्याने म्हटले: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीम. ) विरोध होत असताना आपण कोणती मनोवृत्ती दाखवली पाहिजे, याविषयी पौलाने रोममधील बांधवांना लिहिलेल्या पत्राच्या १२ व्या अध्यायात उपयुक्त सल्ला दिला. पौलाचा हा सल्ला अंत समयात जगत असलेल्या आपल्या सर्वांसाठीच अत्यंत उपयोगी आहे. ३:१०-१२
“जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा”
३, ४. (क) कुटुंबातील सर्वच सदस्य यहोवाचे उपासक नसतात तेव्हा आणि (ख) आपल्या शेजाऱ्यांशी वागताना रोमकर १२:१७ मध्ये दिलेला सल्ला कशा प्रकारे लागू करता येईल?
३रोमकर १२:१७ वाचा. पौलाने म्हटले, की लोक आपल्याशी वैरभावाने वागतात तेव्हा आपण जशास तसे वागू नये. ज्या कुटुंबांतील सर्वच सदस्य यहोवाचे उपासक नाहीत अशा कुटुंबांसाठी हा सल्ला विशेष महत्त्वाचा आहे. आपला विवाहसोबती मनाला लागेल अशा रीतीने आपल्याशी वागल्यास आपणही तसेच वागून त्याला धडा शिकवावा, असा एक ख्रिस्ती व्यक्ती विचार करत नाही. कारण ‘वाइटाबद्दल वाईट अशी फेड केल्याने’ काहीच साध्य होत नाही. उलट, अशा प्रकारच्या वागणुकीमुळे परिस्थिती सहसा आणखीनच बिघडते.
४ म्हणून पौल त्यापेक्षाही एक चांगला मार्ग सुचवतो: “सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा.” कुटुंबामध्ये पती आपल्या पत्नीच्या विश्वासासंबंधी तिला टाकून बोलला तरीही त्याच्याशी प्रेमानेच वागल्यास ती भांडणतंटा टाळू शकते. (नीति. ३१:१२) बेथेल कुटुंबाचा सदस्य असलेला कारलोस नावाचा एक बांधव आठवून सांगतो, की कशा प्रकारे त्याच्या आईने नेहमी प्रेमळपणे वागून, तसेच घराची जबाबदारी चोख निभावून त्याच्या वडिलांच्या कट्टर विरोधावर मात केली. “तिनं नेहमीच आम्हाला त्यांचा आदर करायला शिकवलं. मला बूल (एक फ्रेंच खेळ) खेळायला फारसं आवडत नसे तरीसुद्धा मी वडिलांसोबत तो खेळ खेळावा असा तिचा आग्रह असायचा. त्यामुळं त्यांचा मूड लगेच बदलायचा.” सरतेशेवटी त्यांनी बायबल अभ्यास सुरू केला व बाप्तिस्माही घेतला. यहोवाचे साक्षीदार ‘सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्विक’ किंवा भले ते करण्याचा कशा प्रकारे प्रयत्न करतात याचे आणखी एक उदाहरण म्हणजे, एखादे संकट कोसळते तेव्हा ते आपल्या शेजाऱ्यांना व्यावहारिक मार्गांनी मदत करतात. यामुळे अनेकदा लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असलेला कलुषितपणा दूर करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
‘निखाऱ्यांनी’ विरोधावर मात करणे
५, ६. (क) विरोधकांच्या मस्तकावर जळत्या ‘निखाऱ्यांची रास’ करण्याचा काय अर्थ होतो? (ख) रोमकर १२:२० मध्ये दिलेल्या सल्ल्याचे पालन केल्यामुळे कोणते चांगले परिणाम निष्पन्न होऊ शकतात याविषयी तुम्हाला आलेला एखादा अनुभव सांगा.
५रोमकर १२:२० वाचा. पौलाने हे शब्द लिहिले तेव्हा त्याच्या मनात नक्कीच नीतिसूत्रे २५:२१, २२ मधील शब्द असावेत, ज्यात म्हटले आहे: “तुझा शत्रु भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तान्हेला असल्यास त्याला पाणी प्यावयाला दे; असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखाऱ्यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल.” पौलाने रोमकरांस पत्राच्या १२ व्या अध्यायात दिलेल्या एकंदर सल्ल्यावरून समजते, की आपला विरोध करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी किंवा त्यांचा अपमान करण्यासाठी त्याने निखाऱ्यांचे रूपक नक्कीच वापरले नसावे. उलट, नीतिसूत्रांत आणि पौलाने रोमकरांस लिहिलेल्या पत्रात वापरलेले निखाऱ्यांचे उदाहरण, खनिजांपासून धातू गाळण्याच्या जुन्या काळातील एका पद्धतीशी संबंधित असू शकते. १९ व्या शतकातील चार्ल्स ब्रिजेस नामक एका इंग्रज विद्वानाने काय म्हटले ते लक्षात घ्या: “कठीण स्वरूपाचा धातू गाळण्यासाठी त्यास केवळ खालून विस्तव देणे पुरेसे नाही तर त्याच्या वरती देखील जळत्या निखाऱ्यांची रास ठेवावी; अशा रीतीने वरून व खालून त्यास पूर्णपणे झाकावे. सहनशील, निःस्वार्थ असे ज्वलंत प्रेमही [या निखाऱ्यांप्रमाणेच] शक्तिशाली असते. अशा प्रेमामुळे सर्वात कठोर हृदयालाही पाझर फुटतो.”
६ जळत्या ‘निखाऱ्यांप्रमाणे’ आपल्या विरोधकांप्रती केलेली प्रेमळ कृत्ये त्यांच्या मनावर सकारात्मक प्रभाव पाडून त्यांच्या मनात आपल्याबद्दल असलेला द्वेषभाव नाहीसा करू शकतात. या प्रेमळ कृत्यांमुळे यहोवाच्या उपासकांकडे व बायबलच्या संदेशाकडे लोक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतील. प्रेषित पेत्राने लिहिले: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हांविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.”—१ पेत्र २:१२.
‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहा’
७. येशू आपल्या शिष्यांना कोणती शांती देतो आणि त्यामुळे काय करण्याची प्रेरणा आपल्याला मिळाली पाहिजे?
७रोमकर १२:१८ वाचा. येशूने आपल्या मृत्यूच्या आधीची संध्याकाळ आपल्या शिष्यांच्या सहवासात घालवली. त्यावेळी त्याने त्यांना म्हटले: “मी तुम्हास शांति देऊन ठेवितो; मी आपली शांति तुम्हास देतो.” (योहा. १४:२७) येशू आपल्या शिष्यांना कोणती शांती देतो? यहोवा देव आणि त्याचा प्रिय पुत्र यांचे आपल्यावर प्रेम व अनुग्रह आहे या जाणिवेमुळे मिळणाऱ्या आंतरिक शांतीविषयी तो बोलत होता. याच आंतरिक समाधानामुळे आपल्याला इतरांसोबत शांतीने राहण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे. खरे ख्रिस्ती शांतीप्रिय व शांती प्रस्थापित करणारे आहेत.—मत्त. ५:९.
८. कौटुंबिक वर्तुळात व ख्रिस्ती मंडळीत आपण शांती प्रस्थापित करणारे कसे होऊ शकतो?
८ कौटुंबिक वर्तुळात शांती प्रस्थापित करण्याचा एक मार्ग म्हणजे मतभेदांचे रूपांतर मोठ्या भांडणांत होण्यापूर्वीच लवकरात लवकर मतभेद मिटवून टाकणे. (नीति. १५:१८; इफिस. ४:२६) हीच गोष्ट ख्रिस्ती मंडळीत देखील लागू होते. शांती राखण्याचा जीभ आवरण्याशी संबंध आहे असे प्रेषित पेत्र सांगतो. (१ पेत्र ३:१०, ११) याकोब देखील जीभेचा योग्य वापर करण्यासंबंधी तसेच, मत्सर व भांडखोर वृत्ती बाळगण्याविरुद्ध सडेतोड सल्ला दिल्यानंतर म्हणतो: “वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे; पण शांति करणाऱ्यासाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.”—याको. ३:१७, १८.
९. ‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहण्याचा’ प्रयत्न करत असताना आपण कोणती दक्षता बाळगली पाहिजे?
९रोमकर १२:१८ मध्ये पौलाने जे म्हटले त्यावरून समजते, की केवळ कौटुंबिक वर्तुळात व ख्रिस्ती मंडळीतच शांतीसंबंध राखणे पुरेसे नाही. तर आपण ‘सर्व माणसांबरोबर शांतीने राहिले’ पाहिजे असे तो म्हणतो. यामध्ये आपले शेजारी, सहकर्मी, शाळासोबती आणि सेवा कार्यात भेटणारे लोक येतात. पण, हा सल्ला देताना प्रेषित पौल, “शक्य तर . . . तुम्हाकडून होईल तितके” असे म्हणतो. याचा अर्थ, आपण ‘सर्वांबरोबर शांतीने’ राहण्याचा सर्वतोपरी प्रयत्न तर करतो पण, असे करताना देवाच्या नीतिमान तत्त्वांचे उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता बाळगतो.
सूड उगवण्याचा हक्क यहोवाचा
१०, ११. ‘देवाच्या क्रोधाला वाट देण्याचा’ काय अर्थ होतो आणि असे करणे उचित का आहे?
१०रोमकर १२:१९ वाचा. आपल्या उपासनेचा व सेवा कार्याचा ‘विरोध करणाऱ्यांशी’—अगदी आपला छळ करणाऱ्यांशी देखील आपण जशास तसे न वागता ‘सौम्यतेने’ वागावे. (२ तीम. २:२३-२५) पौल ख्रिश्चनांना सल्ला देतो की त्यांनी सूड उगवू नये तर ‘देवाच्या क्रोधाला वाट द्यावी.’ ख्रिस्ती या नात्याने आपण ही गोष्ट लक्षात ठेवतो, की सूड उगवण्याचा हक्क आपला नाही. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “राग सोडून दे, क्रोधाविष्टपणाचा त्याग कर; जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ति होते.” (स्तो. ३७:८) आणि शलमोनाने सल्ला दिला: “वाइटाचा बदला मी घेईन असे म्हणू नको; परमेश्वरावर भरवसा ठेवून राहा म्हणजे तो तुला साहाय्य करील.”—नीति. २०:२२.
११ विरोधक आपले नुकसान करतात तेव्हा त्यांचा न्याय करण्याचे काम यहोवाच्या हाती सोपवून देणे सुज्ञतेचे ठरेल. त्याला जरुरीचे वाटले तर आणि जेव्हा त्याला योग्य वाटेल तेव्हा तो त्यांना शिक्षा देईल. पौलाने पुढे असेही म्हटले: “असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,’ असे प्रभु म्हणतो.” (अनुवाद ३२:३५ पडताळून पाहा.) स्वतः सूड उगवण्याचा प्रयत्न केल्यास आपण आपली मर्यादा सोडून वागत आहोत व जो हक्क सर्वस्वी यहोवाचा आहे तो गर्विष्ठपणे स्वतःच्या हातात घेत आहोत असा त्याचा अर्थ होईल. शिवाय, “मी फेड करीन” असे जे अभिवचन यहोवाने दिले आहे त्यावरही आपला भरवसा नाही असे दिसून येईल.
१२. यहोवाचा क्रोध केव्हा प्रकट होईल आणि कसा?
१२ पौलाने रोमकरांस लिहिलेल्या पत्राच्या सुरुवातीला म्हटले: “वास्तविक जी माणसे अनीतीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो.” (रोम. १:१८) यहोवा ‘मोठ्या संकटाच्या’ वेळी त्याच्या पुत्राद्वारे त्याचा क्रोध स्वर्गातून प्रकट करेल. (प्रकटी. ७:१४) हे “देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक [असेल],” असा पौल दुसऱ्या एका प्रेरित पत्रात खुलासा करतो. तो म्हणतो: “तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांति देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय आहे, म्हणून प्रभु येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल: तो आपल्या सामर्थ्यवान् दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.”—२ थेस्सलनी. १:५-८.
बऱ्याने वाइटाला जिंका
१३, १४. (क) लोक आपला विरोध करतात तेव्हा आपल्याला आश्चर्य का वाटू नये? (ख) आपला छळ करणाऱ्यांना आपण आशीर्वाद कसा देऊ शकतो?
१३रोमकर १२:१४, २१ वाचा. यहोवा आपला उद्देश सिद्धीस नेईल यावर पूर्ण भरवसा असल्यामुळे आपण निश्चिंत राहून आपल्याला सोपवलेल्या कार्यावर—“राज्याची ही सुवार्ता सर्व जगात” गाजविण्याच्या कार्यावर आपले लक्ष केंद्रित करू शकतो. (मत्त. २४:१४) या ख्रिस्ती कार्यामुळे आपण विरोधकांचा रोष ओढवतो याची आपल्याला जाणीव आहे कारण येशूने आधीच सांगितले होते: “माझ्या नावामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करितील.” (मत्त. २४:९) त्यामुळे लोक आपला विरोध करतात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटत नाही किंवा आपण खचूनही जात नाही. प्रेषित पेत्राने म्हटले: “प्रियजनहो, तुमची पारख होण्यासाठी जी अग्निपरीक्षा तुम्हावर आली आहे तिच्यामुळे आपणांस काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका; ज्याअर्थी तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहा त्याअर्थी आनंद करा; म्हणजे त्याचे गौरव प्रगट होण्याच्या वेळेसहि तुम्ही उल्लास व आनंद कराल.”—१ पेत्र ४:१२, १३.
१४ आपला छळ करणाऱ्यांबद्दल मनात अढी बाळगण्याऐवजी यांपैकी काही जण अजाणपणे आपल्याशी असे वागत असतील हे लक्षात ठेवून आपण त्यांना बायबलचे सत्य शिकवण्याचा प्रयत्न करतो. (२ करिंथ. ४:४) तसेच, पौलाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्याचाही आपण प्रयत्न करतो. त्याने म्हटले: “तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वादच द्या, शाप देऊ नका.” (रोम. १२:१४) आपल्या विरोधकांना आशीर्वाद देण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करणे. येशूने डोंगरावर दिलेल्या प्रवचनात म्हटले: “जे तुमचा द्वेष करितात त्यांचे बरे करा; जे तुम्हास शाप देतात त्यांस आशीर्वाद द्या; जे तुमची निर्भर्त्सना करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.” (लूक ६:२७, २८) प्रेषित पौलाला स्वतःच्या अनुभवावरून याची जाणीव झाली होती, की छळ करणारा देखील ख्रिस्ताचा विश्वासू शिष्य व यहोवाचा आवेशी सेवक बनू शकतो. (गलती. १:१३-१६, २३) पौलाने लिहिलेल्या आणखी एका पत्रात त्याने म्हटले: “आमची निर्भर्त्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो; आमची छळणूक होत असता आम्ही ती सहन करितो; आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करितो.”—१ करिंथ. ४:१२, १३.
१५. बऱ्याने वाइटाला जिंकण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग कोणता?
१५ तेव्हा, एक खरा ख्रिस्ती रोमकरांस पत्राच्या १२ व्या अध्यायातील शेवटच्या वचनात दिलेल्या सल्ल्याचे पालन करतो: “वाइटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाइटाला जिंक.” सर्व वाईट गोष्टींचा उगम दियाबल सैतान आहे. (योहा. ८:४४; १ योहा. ५:१९) प्रेषित योहानाला दिलेल्या दृष्टान्तात येशूने आपल्या अभिषिक्त बांधवांविषयी म्हटले की, “[सैतानाला] त्यांनी कोकऱ्याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले.” (प्रकटी. १२:११) यावरून स्पष्ट होते, की सैतानावर व सध्याच्या जगावर असलेल्या त्याच्या वाईट प्रभावावर मात करण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे साक्षकार्य करून अर्थात देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करून लोकांचे बरे करणे.
आशेने हर्षित व्हा
१६, १७. रोमकरांस १२ व्या अध्यायातून (क) आपण आपल्या जीवनाचा कशा प्रकारे उपयोग करावा, (ख) मंडळीतील बंधूभगिनींसोबत कशा प्रकारे वागावे (ग) तसेच, आपल्या विरोधकांशी कशा प्रकारे वागावे याबाबतींत आपल्याला काय शिकायला मिळाले आहे?
१६ पौलाने रोम येथील बांधवांना लिहिलेल्या पत्रातील १२ व्या अध्यायाच्या या संक्षिप्त चर्चेने आपल्याला बऱ्याच गोष्टींची आठवण करून दिली आहे. आपल्याला हे शिकायला मिळाले आहे, की यहोवाचे समर्पित सेवक या नात्याने आपण आत्मत्याग करण्यास तयार असले पाहिजे. देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन आपण स्वेच्छेने हे त्याग करतो कारण हीच देवाची इच्छा आहे हे आपण समजून घेतले आहे आणि आपल्याला याची खातरी पटली आहे. आपण आत्म्यात आवेशी राहून आपल्याला लाभलेल्या निरनिराळ्या कृपादानांचा देवाच्या सेवेत उपयोग करण्यास अत्सुक आहोत. आपण नम्रतेने व आपल्या मर्यादांची जाणीव राखून सेवा करतो. तसेच, ख्रिस्ती मंडळीचे ऐक्य टिकवून ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. आतिथ्य करण्यास आपण तत्पर असतो व आपल्या बांधवांच्या सुखदुःखात सहभागी होतो.
१७ रोमकरांस पत्रातील १२ व्या अध्यायातून आपल्याला विरोधाचा सामना कसा करावा याविषयीही बरेच मार्गदर्शन मिळते. आपण विरोधकांशी जशास तसे वागू नये. उलट, प्रेमळपणे वागून आपण त्यांचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बायबल तत्त्वांशी तडजोड न करता आपण शक्य तितके सर्व माणसांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करावा. ही गोष्ट कौटुंबिक वर्तुळात, ख्रिस्ती मंडळीत, शेजाऱ्यांशी वागताना, कामाच्या ठिकाणी, शाळेत आणि आपल्या सेवा कार्यात देखील लागू होते. अगदी उघडपणे आपला विरोध किंवा छळ केला जातो तेव्हा देखील, सूड उगवणे यहोवाच्या हातात आहे हे आठवणीत ठेवून आपण बऱ्याने वाइटाला जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे.
१८. रोमकरांस पत्र १२:१२ मध्ये कोणत्या तीन गोष्टी करण्याचे प्रोत्साहन दिले आहे?
१८रोमकर १२:१२ वाचा. या सुज्ञ, व्यवहारोपयोगी सल्ल्यासोबतच पौल आपल्याला आणखी तीन गोष्टी करण्याचे प्रोत्साहन देतो. आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या गोष्टी यहोवाच्या मदतीशिवाय करणे शक्य नसल्यामुळे प्रेषित पौल आपल्याला ‘प्रार्थनेत तत्पर राहण्यास’ सांगतो. असे केल्यामुळे ‘संकटात धीर धरण्याबद्दल’ पौलाने पुढे दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे आपल्याला शक्य होईल. शेवटी, यहोवाने आपल्याकरता जे भवितव्य राखून ठेवले आहे त्यावर आपण आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे. तसेच, आपण सार्वकालिक जीवनाच्या ‘आशेविषयी नेहमी हर्षित’ किंवा आनंदी असले पाहिजे, मग ते स्वर्गातील जीवन असो किंवा पृथ्वीवरील.
उजळणी
• आपण विरोधाला कशा प्रकारे तोंड दिले पाहिजे?
• आपण जीवनाच्या कोणकोणत्या क्षेत्रांत शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपण हे कसे करू शकतो?
• विरोध किंवा छळ होतो तेव्हा आपण सूड उगवण्याचा प्रयत्न करणे का योग्य नाही?
[अभ्यासाचे प्रश्न]
[८ पानांवरील चित्र]
यहोवाचे उपासक नसलेल्या लोकांना व्यावहारिक मार्गांनी मदत केल्याने त्यांच्या मनातील द्वेषभाव दूर होऊ शकतो
[९ पानांवरील चित्र]
ख्रिस्ती मंडळीत तुम्ही शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करता का?