व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या संग्रहातून

‘परीक्षाप्रसंगी’ ते खंबीर राहिले

‘परीक्षाप्रसंगी’ ते खंबीर राहिले

१९१४ मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान बायबल विद्यार्थ्यांची तटस्थ भूमिका बऱ्‍याच लोकांच्या नजरेत आली. (यश. २:२-४; योहा. १८:३६; इफिस. ६:१२) ब्रिटनमधील देवाच्या सेवकांनी याचा सामना कसा केला?

हेन्री हडसन

१९१६ मध्ये ब्रिटनने लष्करी सेवा कायदा बनवला ज्यात १८ ते ४० वयोगटातील अविवाहित पुरुषांना सैन्यात भरती होण्यास सांगण्यात आले. एखाद्याने सैन्यात भरती होण्यास नकार दिल्यास आणि त्याचा हा नकार खरोखरच त्याच्या “धार्मिक किंवा नैतिक विश्‍वासांवर” आधारित असल्यास त्याला लष्करी सेवेतून सूट देण्याची तरतूद या कायद्यात होती. कोणाला सूट द्यावी व कितपत सूट द्यावी हे ठरवण्यासाठी सरकारने न्यायसभांची स्थापना केली.

थोड्याच काळानंतर सुमारे ४० बायबल विद्यार्थ्यांना लष्करी तुरुंगात टाकले गेले आणि ८ जणांना फ्रान्सला युद्ध लढण्यास पाठवले. बांधवांप्रती केलेला हा अन्याय पाहून ब्रिटन येथील बांधवांनी प्रधानमंत्री हर्बर्ट ॲसक्विथ यांना एक पत्र लिहिले ज्यात त्यांनी याबद्दल निषेध व्यक्‍त केला. या पत्रासोबत त्यांनी एक अर्ज जोडला ज्यात ५,५०० लोकांच्या सह्‍या होत्या.

ज्या ८ जणांना फ्रान्सला पाठवले होते त्यांनी युद्धामध्ये सहभाग घेण्यास नकार दिल्यामुळे त्यांना गोळीने ठार मारण्याचा हुकूम देण्यात आल्याची बातमी मिळाली. गोळीबार करण्याकरता बांधवांना उभे करण्यात आले तेव्हा त्यांची शिक्षा बदलून त्यांना दहा वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला. त्यांना इंग्लंडमधील तुरुंगात टाकले गेले.

जेम्स फ्रेडरिक स्कॉट

युद्ध सुरूच होते. आता विवाहित पुरुषांनीही सैन्यात भरती व्हावे असा हुकूम काढण्यात आला. इंग्लंडमधील मँचिस्टर येथील न्यायसभेत एका खटल्याची सुनावणी सुरू झाली. आरोपी होता डॉक्टर हेन्री हडसन जो एक बायबल विद्यार्थी होता. ३ ऑगस्ट १९१६ रोजी न्यायालयाने त्याला नियमांचे उल्लंघन करण्याबद्दल दोषी ठरवले, त्याच्यावर दंड लावला आणि त्याला सैन्याच्या हातात सोपवले. त्याच वेळी स्कॉटलंडमधील एडिनबर्गमध्येही एक सुनावणी सुरू होती. २५ वर्षांचा कॉलपोर्टर जेम्स फ्रेडरिक स्कॉट याला निर्दोष शाबीत करण्यात आले. सरकारने या निर्णयाविरुद्ध अपील केले, पण नंतर हा खटला मागे घेऊन लंडनमधील एका खटल्याकडे आपले लक्ष वळवले. या खटल्यात बंधू हर्बर्ट किप्स यांना दोषी शाबीत करण्यात आले, त्यांना दंड ठोठावण्यात आला आणि सैन्याच्या हाती सोपवण्यात आले.

सप्टेंबर १९१६ पर्यंत एकूण २६४ बांधवांनी लष्करी सेवेतून सूट मिळवण्यासाठी अर्ज भरला होता. यांपैकी ५ जणांना सूट देण्यात आली, १५४ जणांना “राष्ट्रीय महत्त्व असलेली” कामे देण्यात आली, २३ जणांना लष्करातच, लढाईशी संबंधित नसलेली इतर कामे करण्यासाठी नेमण्यात आले, ८२ जणांना लष्कराच्या अधीन करण्यात आले, आणि काहींविरुद्ध हुकूम न मानल्याबद्दल लष्करी न्यायालयात खटला भरण्यात आला. या पुरुषांना तुरुंगात दिल्या जाणाऱ्‍या क्रूर वागणुकीविरुद्ध लोकांनी आवाज उठवला, म्हणून सरकारने त्यांना लष्करी तुरुंगातून काढून श्रम शिबिरांत टाकले.

प्राईस ह्‍यूझ

एडगर क्ले आणि नंतर ब्रिटनमध्ये शाखा पर्यवेक्षक म्हणून सेवा केलेले प्राईस ह्‍यूझ यांनी वेल्स येथील एका धरणावर काम केले. दुसरीकडे पाहता, फ्रान्सहून परतलेल्या ८ जणांपैकी एक, हर्बर्ट सीनियर यांना यॉर्कशर येथील वेकफिल्ड तुरुंगात टाकण्यात आले. इतरांना डार्टमूर तुरुंगातील रूक्ष वातावरणात काबाडकष्ट करण्याची शिक्षा दिली गेली. विवेकबुद्धीला पटत नसल्यामुळे ज्यांनी लष्करी सेवा करण्यास नकार दिला होता अशा लोकांची संख्या या तुरुंगात सर्वात जास्त होती.

एक बायबल विद्यार्थी फ्रँक प्लॅट लढाईशी संबंधित नसलेली इतर कामे करण्यास तयार होता. पण त्याला युद्धस्थळी पाठवण्यात आले तेव्हा त्याने युद्धात भाग घेण्यास नकार दिल्यामुळे त्याला बऱ्‍याच काळापर्यंत क्रूर छळाचा सामना करावा लागला. ॲटकिनसन पॅजेट यांनी लष्करी सेवेत भरती झाल्याच्या काही काळानंतर सत्य स्वीकारले. युद्धात लढण्यास नकार दिल्यामुळे त्यांनासुद्धा लष्करी आधिकाऱ्‍यांकडून अतिशय क्रूर वागणूक मिळाली.

हर्बर्ट सीनियर

जवळजवळ एका शतकाआधी, ख्रिस्ती या नात्याने तटस्थ भूमिका घेण्याचा काय अर्थ होतो हे आपल्या बांधवांना तितके स्पष्ट नव्हते, तरीसुद्धा त्यांनी यहोवा देवाला आनंदी करण्याचा प्रयत्न केला. या अहवालात ज्या बांधवांचा नावाने उल्लेख केला आहे त्यांनी खडतर ‘परीक्षाप्रसंगी’ तटस्थ भूमिका घेण्याच्या बाबतीत उत्तम उदाहरण मांडले. (प्रकटी. ३:१०)—ब्रिटनमधील आमच्या संग्रहातून.