आपण “वाट पाहत” राहण्याची वृत्ती कशी जोपासू शकतो?
“मी . . . वाट पाहत राहीन.”—मीखा ७:७.
१. आपण कशामुळे अधीर होऊ शकतो?
सन १९१४ मध्ये मशीही राज्याची स्थापना झाली तेव्हा सैतानाच्या जगाचे शेवटचे दिवस सुरू झाले. त्या वर्षी, स्वर्गात युद्ध झाले व त्यानंतर येशूने सैतानाला आणि दुरात्म्यांना स्वर्गातून पृथ्वीवर टाकले. (प्रकटीकरण १२:७-९ वाचा.) सैतानाला माहीत आहे की त्याचा फक्त “थोडा” काळ राहिला आहे. (प्रकटी. १२:१२) पण, हा “थोडा” काळ अनेकांनी अपेक्षा केली होती त्यापेक्षा जास्त काळ चालला आहे. यहोवा सैतानाच्या जगाचा अंत कधी करेल या विचाराने व्यक्तिशः आपण अधीर झालो आहोत का?
२. या लेखात कशावर चर्चा केली जाईल?
२ अधीरपणा खूप धोक्याचा ठरू शकतो कारण त्यामुळे आपण अविचारीपणे वागायला लागू. तर मग, आपण वाट पाहत राहण्याची वृत्ती कशी जोपासू शकतो? पुढील प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याद्वारे अशी वृत्ती बाळगण्यास हा लेख आपल्याला मदत करेल. (१) धीर दाखवण्याच्या बाबतीत आपण संदेष्टा मीखाच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करू शकतो? (२) कोणत्या घटनांवरून दिसून येईल की अंत जवळ आला आहे? (३) यहोवाच्या धीराबद्दल आपण कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो?
मीखाच्या उदाहरणावरून आपण काय शिकू शकतो?
३. मीखाच्या दिवसांत इस्राएलात कशी परिस्थिती होती?
३ मीखा ७:२-६ वाचा. यहोवाचा संदेष्टा मीखा याच्या दिवसांत इस्राएली लोकांची आध्यात्मिक स्थिती दिवसेंदिवस खालावत जात होती. दुष्ट राजा आहाज याच्या राज्यात तर ते यहोवाला अगदीच अविश्वासू झाले होते. मीखाने या अविश्वासू इस्राएलांची तुलना ‘काटेरी झुडपाशी’ आणि ‘काटेरी कुंपणाशी’ केली. काटेरी झुडपाच्या जवळून जाणाऱ्याला ज्या प्रकारे इजा होते त्याच प्रकारे, इस्राएली लोकांशी व्यवहार करणाऱ्यांना त्यांच्या वाईट वागणुकीमुळे हानी पोहचत असे. त्या लोकांमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला होता की कुटुंबांत फुटी पडू लागल्या होत्या. ही परिस्थिती आपण स्वतःहून बदलू शकत नाही हे मीखाला चांगल्या प्रकारे माहीत होते म्हणून त्याने यहोवाला कळकळीने प्रार्थना केली. आणि मग, यहोवा यातून काय मार्ग काढेल यासाठी तो धीराने वाट पाहत राहिला. योग्य वेळ येईल तेव्हा यहोवा नक्की काहीतरी करेल असा पूर्ण विश्वास मीखाने बाळगला.
४. आपल्याला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते?
४ मीखाप्रमाणे आपल्यालाही स्वार्थी लोकांमध्ये राहावे लागते. बरेच लोक उपकार न स्मरणारे, बेइमान आणि ममताहीन झाले आहेत. (२ तीम. ३:२, ३) आपल्यासोबत काम करणारे, शाळासोबती आणि शेजारी स्वार्थी व आत्मकेंद्री वृत्ती दाखवतात तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटते. यहोवाच्या उपासकांपैकी अनेकांना याहून मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागते. येशूने त्याच्या अनुयायांना सांगितले होते की त्यांना कुटुंबाचा छळ सहन करावा लागेल; आणि याबद्दल सांगताना त्याने मीखा ७:६ या वचनातील शब्दांचाच उपयोग केला. त्याने म्हटले: “मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू यांच्यात फूट पाडण्यास मी आलो आहे; आणि मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.” (मत्त. १०:३५, ३६) सत्यात नसलेल्या कुटुंबीयांकडून अपमान होणे आणि छळ सहन करणे किती कठीण आहे! आपण जर असा छळ सहन करत असू तर कुटुंबाच्या दबावाखाली न येण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ही समस्या सोडवण्यासाठी यहोवा नक्कीच काहीतरी करेल हा विश्वास बाळगून आपण त्याला एकनिष्ठ राहिले पाहिजे आणि धीराने वाट पाहिली पाहिजे. आपण जर यहोवाला सतत मदत मागत राहिलो तर तो नक्कीच आपल्याला छळ सहन करत राहण्यासाठी शक्ती आणि बुद्धी देईल.
५, ६. यहोवाने मीखाला कशा प्रकारे आशीर्वाद दिला? पण, मीखा काय पाहू शकला नाही?
५ मीखाने धीर दाखवल्यामुळे यहोवाने त्याला आशीर्वाद दिला. आहाज राजा आणि त्याच्या दुष्ट राज्याचा नाश झाल्याचे मीखाने पाहिले. आहाज राजाच्या मुलाने म्हणजेच हिज्कीया या चांगल्या राजाने पुढे राज्य चालवल्याचे आणि शुद्ध उपासनेची पुनःस्थापना केल्याचेही त्याने पाहिले. त्याचबरोबर, जेव्हा अश्शूरी लोकांनी इस्राएलच्या उत्तरेकडील राज्यावर हल्ला केला तेव्हा शोमरोनाविषयी जी भविष्यवाणी मीखाने लिहिली होती तीदेखील पूर्ण होताना त्याने पाहिली.—मीखा १:६.
६ पण, यहोवाने मीखाला ज्या भविष्यवाण्या लिहायला सांगितल्या होत्या त्या सर्वच पूर्ण होताना त्याला पाहता आल्या नाहीत. उदाहरणार्थ, मीखाने असे लिहिले होते: “शेवटल्या दिवसांत . . . परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील. देशोदेशीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी जातील व म्हणतील, चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर . . . चढून जाऊ.” (मीखा ४:१, २) ही भविष्यवाणी पूर्ण होण्याच्या कितीतरी काळाआधीच मीखा मरण पावला. पण मरेपर्यंत यहोवाला विश्वासू राहण्याचा त्याने निर्धार केला होता. त्याच्या आजूबाजूला राहणारे लोक काय करत आहेत याचा त्याने स्वतःवर प्रभाव पडू दिला नाही. त्याने लिहिले: “सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही [“यहोवा,” NW] आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.” (मीखा ४:५) मीखा वाईट परिस्थितीतही धीर दाखवू शकला कारण त्याला पूर्ण खात्री होती की यहोवा नक्कीच त्याची सर्व अभिवचने पूर्ण करेल. अशा रीतीने, विश्वासू मीखाने यहोवावर भरवसा दाखवला.
७, ८. (क) यहोवावर भरवसा ठेवण्याचे कोणते रास्त कारण आपल्याजवळ आहे? (ख) कोणती गोष्ट केल्याने उरलेला वेळ भरभर सरत जाईल?
७ मीखाप्रमाणे आपलाही यहोवावर भरवसा आहे का? असा भरवसा दाखवण्याचे रास्त कारण आपल्याकडे आहे. कारण, मीखाने केलेली भविष्यवाणी पूर्ण होताना आपण स्वतः पाहिली आहे. “शेवटल्या दिवसांत” सर्व राष्ट्रांतून, अनेक जातींचे आणि विविध भाषा बोलणारे लाखो लोक यहोवाच्या “पर्वतावर” आले आहेत; हे लोक, एकमेकांशी शत्रुत्व असणाऱ्या देशांतून आलेले असले, तरी त्यांनी आपआपल्या “तरवारी मोडून” टाकल्या आहेत आणि “युद्धकला” शिकण्याचे नाकारले आहे. (मीखा ४:३) खरोखर, यहोवाच्या शांतीप्रिय लोकांपैकी एक असण्याचा किती मोठा बहुमान आपल्याला मिळाला आहे!
८ खरेतर, यहोवाने लवकरच या दुष्ट जगाचा नाश करावा असे आपल्याला मनापासून वाटते. पण, आपल्याला जर धीराने वाट पाहायची असेल तर आपण सर्व गोष्टी यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहिल्या पाहिजेत. यहोवाने त्याच्या “नेमलेल्या मनुष्याच्याद्वारे” म्हणजेच येशू ख्रिस्ताच्याद्वारे मानवांचा न्याय करण्यासाठी एक दिवस ठरवला आहे. (प्रे. कृत्ये १७:३१) पण त्याआधी यहोवा सर्व प्रकारच्या लोकांना “सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत” पोहचण्याची, या ज्ञानाप्रमाणे चालण्याची आणि तारण प्राप्त करण्याची संधी देत आहे. लोकांचा जीव धोक्यात आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. (१ तीमथ्य २:३, ४ वाचा.) लवकरच अंत येईल. जर आपण यहोवाबद्दलचे खरे ज्ञान घेऊ इच्छिणाऱ्या लोकांना मदत करण्यात स्वतःला व्यस्त ठेवले तर उरलेला वेळ भरभर सरत जाईल. आणि जेव्हा अंत येईल तेव्हा आपल्याला हा विचार करून किती आनंद होईल की आपण स्वतःला राज्याची सुवार्ता सांगण्यात व्यस्त ठेवले!
कोणत्या घटनांवरून दिसून येईल की अंत जवळ आला आहे?
९-११. १ थेस्सलनीकाकर ५:३ या वचनात केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली आहे का? स्पष्ट करा.
९ पहिले थेस्सलनीकाकर ५:१-३ वाचा. लवकरच, राष्ट्रे “शांती आहे, निर्भय आहे” अशी घोषणा करतील. पण या फसवणुकीला बळी पडू नये म्हणून, आपण “जागे व सावध” राहिले पाहिजे. (१ थेस्सलनी. ५:६) आध्यात्मिक रीत्या जागृत राहण्यासाठी आपण अशा काही घटनांची उजळणी करू या ज्यांनी “शांती आहे, निर्भय आहे” ही महत्त्वपूर्ण घोषणा होण्याकरता जणू मार्ग मोकळा केला आहे.
१० दोन्ही विश्वयुद्धांनंतर राष्ट्रे शांतीची मागणी करू लागली. पहिल्या विश्वयुद्धानंतर, शांती आणण्याच्या उद्देशाने राष्ट्रसंघाची (लीग ऑफ नेशन्स) स्थापना करण्यात आली. दुसऱ्या विश्वयुद्धानंतर जगात शांती यावी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. या दोन्ही संघटना मानवजातीसाठी शांती आणतील या आशेने सरकार आणि धार्मिक पुढारी या संस्थांकडे डोळे लावून होते. उदाहरणार्थ, संयुक्त राष्ट्रसंघाने १९८६ हे आंतरराष्ट्रीय शांतीचे वर्ष म्हणून घोषित केले. त्या वर्षी, अनेक राजकीय आणि धार्मिक पुढारी, शांती यावी यासाठी इटलीतील असीसीमधील कॅथलिक चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी एकत्रित जमले होते.
११ पण, शांतीबद्दल करण्यात आलेल्या या घोषणांमुळे १ थेस्सलनीकाकर ५:३ मध्ये सांगितलेली भविष्यवाणी पूर्ण झाली नाही. का? कारण, पूर्वभाकीत केलेला “अकस्मात नाश” अद्यापही आलेला नाही.
१२. “शांती आहे, निर्भय आहे,” या घोषणेबद्दल आपल्याला काय माहीत आहे?
१२ भविष्यात “शांती आहे, निर्भय आहे,” ही महत्त्वाची घोषणा कोण करेल? ख्रिस्ती धर्मजगतातील आणि इतर धर्मांतील पुढाऱ्यांची यात काय भूमिका असेल? अनेक राजकीय पुढारी या घोषणेत कसा सहभाग घेतील? याबद्दल शास्त्रवचनांत काहीही सांगण्यात आलेले नाही. पण आपल्याला एवढेच माहीत आहे की ही घोषणा कशीही करण्यात आली आणि लोकांना ती कितीही खरी वाटली, तरी ती फक्त एक फसवणूक असेल. ही जुनी व्यवस्था सैतानाच्या हातातच असेल. ही व्यवस्था निरुपयोगी आहे आणि ती आहे तशीच राहील. ख्रिस्ती या नात्याने आपण जर सैतानाच्या या घोषणेवर विश्वास ठेवला आणि त्यात सहभागी झालो तर खरेच ही एक दुःखाची गोष्ट ठरेल!
१३. देवदूतांनी नाशाचे वारे धरून का ठेवले आहेत?
१३ प्रकटीकरण ७:१-४ वाचा. आपण १ थेस्सलनीकाकर ५:३ मधील भविष्यवाणीच्या पूर्णतेची वाट पाहत असताना, शक्तिशाली देवदूतांनी महासंकटाचे विनाशकारी वारे अडवून धरले आहेत. ते कशाची वाट पाहत आहेत? प्रेषित योहानाने सांगितले की देवाच्या अभिषिक्त दासांवर शेवटचा शिक्का मारला जाणे अगत्याचे आहे. शेवटचा शिक्का मारण्याचे हे कार्य पूर्ण झाल्यानंतर, देवदूतांनी अडवून धरलेले विनाशकारी वारे ते सोडून टाकतील. मग काय होईल?
१४. मोठ्या बाबेलचा विनाश अगदी जवळ आला आहे हे कशावरून दिसून येते?
१४ खोट्या धर्माचे जागतिक साम्राज्य असलेली मोठी बाबेल नाशास पात्र आहे; आणि लवकरच तिचा नाश केला जाईल. मोठ्या बाबेलचा नाश होईल तेव्हा “लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे,” तिला साहाय्य करू शकणार नाहीत. तिचा नाश जवळ आल्याची चिन्हेदेखील दिसू लागली आहेत. (प्रकटी. १६:१२; १७:१५-१८; १८:७, ८, २१) खरे पाहता, आजही प्रसार माध्यमांतून धर्मांवर आणि धार्मिक पुढाऱ्यांवर टीका केली जाते तेव्हा मोठ्या बाबेलला पाठिंबा नसल्याचे दिसून येते. पण तरीही या पुढाऱ्यांना वाटते की ते सुरक्षित आहेत. किती मोठा गैरसमज! “शांती आहे, निर्भय आहे,” ही घोषणा झाल्यानंतर, सैतानाच्या जगातील सरकारे खोट्या धर्मावर अचानक हल्ला करतील आणि त्याचा कायमचा नाश करतील. मोठ्या बाबेलचा नेहमीसाठी नाश केला जाईल! अशा थरारक घटना पाहण्यासाठी धीराने वाट पाहणे योग्यच नाही का?—प्रकटी. १८:८, १०.
यहोवाच्या धीराबद्दल आपण कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो?
१५. यहोवाने आतापर्यंत धीर का धरला आहे?
१५ यहोवाच्या नावाचा लोक अनादर करत असले, तरीही त्याने कारवाई करण्यासाठी योग्य वेळ येण्याची आजवर धीराने वाट पाहिली आहे. नम्र लोकांचा नाश व्हावा अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही. (२ पेत्र ३:९, १०) आपलाही दृष्टिकोन यहोवासारखाच आहे का? यहोवाचा दिवस येण्याआधी त्याने आतापर्यंत दाखवलेल्या धीराबद्दल आपण पुढील मार्गांनी कृतज्ञता व्यक्त करू शकतो.
१६, १७. (क) निष्क्रिय झालेल्यांना आपण मदत का केली पाहिजे? (ख) निष्क्रिय झालेल्यांनी यहोवाजवळ परतणे अत्यंत गरजेचे का आहे?
१६ निष्क्रिय झालेल्यांना मदत करा. एक जरी हरवलेले मेंढरू सापडले तरी स्वर्गात आनंद होतो असे येशूने म्हटले. (मत्त. १८:१४; लूक १५: ३-७) खरेच, यहोवाच्या नावाबद्दल ज्यांनी प्रेम दाखवले आहे ते आज जरी त्याच्या सेवेत थंड पडले असले तरी यहोवाला त्यांच्याबद्दल मनापासून काळजी वाटते. आपण जेव्हा अशा बंधुभगिनींना मंडळीत परतण्यासाठी मदत करतो तेव्हा यहोवाला आणि देवदूतांना आनंद होतो.
१७ तुम्हीदेखील निष्क्रिय झालेल्यांपैकी एक आहात का? कदाचित मंडळीतील एखाद्याने तुमचे मन दुखावले असेल आणि त्यामुळे तुम्ही सभांना येण्याचे थांबवले असेल. कदाचित या गोष्टीला आता काही काळ झाला असेल. तेव्हा स्वतःला असे विचारा: ‘आता माझं जीवन पहिल्यापेक्षा जास्त अर्थपूर्ण झालं आहे का, आता मी जास्त आनंदी आहे का? यहोवानं मला दुखवलं का, की एखाद्या अपरिपूर्ण मानवानं? यहोवानं कधी माझं वाईट केलं आहे का?’ यहोवाला नेहमी आपले भले व्हावे असेच वाटते. आपण यहोवाला केलेल्या समर्पणाशी जडून राहण्यास चुकलो तरी त्याने पुरवलेल्या चांगल्या गोष्टींचा तो आपल्याला आनंद घेऊ देतो. (याको. १:१६, १७) यहोवाचा दिवस लवकरच येणार आहे. तेव्हा, आपला प्रेमळ पिता यहोवा याच्याजवळ येण्याची आणि या शेवटल्या काळात सर्वात सुरक्षित ठिकाण असलेल्या ख्रिस्ती मंडळीत परतण्याची हीच वेळ आहे.—अनु. ३३:२७; इब्री १०:२४, २५.
१८. जे पुढाकार घेतात त्यांना पाठिंबा देणे महत्त्वाचे का आहे?
१८ मंडळीत पुढाकार घेणाऱ्यांना एकनिष्ठपणे पाठिंबा द्या. प्रेमळ मेंढपाळ या नात्याने यहोवा आपल्याला मार्गदर्शन देतो आणि आपले संरक्षण करतो. त्याने कळपाचा मुख्य मेंढपाळ म्हणून येशूला नेमले आहे. (१ पेत्र ५:४) जगभरात १,००,००० पेक्षा जास्त मंडळ्यांमध्ये वडील देवाच्या मेंढरांची व्यक्तिगत रीत्या काळजी घेतात. (प्रे. कृत्ये २०:२८) पुढाकार घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या या वडिलांना आपण एकनिष्ठ राहून पाठिंबा देतो, तेव्हा यहोवाने आणि येशूने आपल्यासाठी जे काही केले आहे त्याप्रती आपण कृतज्ञता दाखवतो.
१९. आज आपण सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार कसा करू शकतो?
१९ आपल्या बंधुभगिनींशी घनिष्ठ नातेसंबंध जोडा. याचा काय अर्थ होतो? जेव्हा एखाद्या प्रशिक्षित सैन्यावर शत्रूचा हल्ला होतो तेव्हा सर्व सैनिक खांद्याला खांदा लावून एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहतात. यामुळे शत्रू त्यांना ओलांडून पुढे जाऊ शकत नाही. तसेच, आज सैतान देवाच्या लोकांवर अधिकाधिक हल्ले करत आहे. म्हणून ही वेळ आपल्याच बांधवांबरोबर भांडत बसण्याची नाही. उलट, एकमेकांशी घनिष्ठ नातेसंबंध जोडण्याची, इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याची आणि यहोवावर भरवसा ठेवण्याची ही वेळ आहे.
२०. आज आपण काय केले पाहिजे?
२० तर मग, आपण सर्व जण आध्यात्मिक रीत्या जागृत राहू या आणि धीराने वाट पाहू या. त्याचबरोबर “शांती आहे, निर्भय आहे,” या घोषणेची आणि अभिषिक्त जनांवर शेवटला शिक्का मारण्याचे कार्य पूर्ण होण्याची वाट पाहत राहू या. त्यानंतर, चार देवदूतांनी अडवून धरलेले विनाशकारी वारे सोडले जातील आणि मोठ्या बाबेलचा नाश केला जाईल. या थरारक घटना घडण्याची वाट पाहत असताना यहोवाच्या संघटनेत पुढाकार घेणाऱ्यांचे मार्गदर्शन आपण स्वीकारू या. सैतानाच्या आणि त्याच्या दुरात्म्यांच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण आपल्या बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू या! स्तोत्रकर्त्याने केलेल्या या आर्जवाकडे लक्ष देणे आज अत्यंत गरजेचे आहे: “अहो परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा; तुमचे मन धीर धरो.”—स्तो. ३१:२४.