व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—माइक्रोनीशियामध्ये

त्यांनी स्वतःला स्वेच्छेने वाहून घेतले—माइक्रोनीशियामध्ये

कॅथरिन ही अमेरिकेत लहानाची मोठी झाली आणि वयाच्या १६ व्या वर्षी तिने यहोवाची साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा घेतला. ती सेवाकार्यात बरीच मेहनत घ्यायची, पण ती ज्या क्षेत्रात प्रचार करायची त्या ठिकाणी खूप कमी लोक राज्याच्या संदेशाला चांगला प्रतिसाद द्यायचे. ती म्हणते: “मी अशा अनेकांचे अनुभव वाचले होते ज्यांनी देवाला जाणून घेण्यास मदत करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला आपल्याकडे पाठवावे अशी प्रार्थना केली होती. देवाला जाणून घेण्यासाठी उत्सुक असलेली अशीच एखादी व्यक्ती मलाही भेटावी असं मला मनापासून वाटायचं, पण असं कधीच घडलं नाही.”

अनेक वर्षांपर्यंत त्याच क्षेत्रात सेवा केल्यानंतर कॅथरिन अशा ठिकाणी जाऊन सेवा करण्याचा विचार करू लागली जेथे लोक राज्य संदेशाला चांगला प्रतिसाद देतील. पण, आपल्याला हे जमेल की नाही याची तिला भीती होती. कारण, ती आपल्या जीवनात फक्त एकदाच आपल्या कुटुंबापासून दूर राहिली होती आणि तेसुद्धा फक्त दोन आठवड्यांसाठी. आणि त्या दोन आठवड्यांतही तिला दररोज आपल्या घरच्यांची खूप आठवण यायची. असे असले, तरीही यहोवाच्या शोधात असलेल्या एखाद्या व्यक्तीला मदत करण्याच्या तीव्र इच्छेमुळे ती आपल्या भीतीवर मात करू शकली. कोणत्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सेवा करता येईल यावर विचार केल्यानंतर तिने ग्वाम येथील शाखा कार्यालयाला पत्र लिहून कळवले आणि त्यांच्याकडून हवी असलेली माहिती मिळवली. जुलै २००७ मध्ये २६ वर्षांची असताना कॅथरिन, पॅसिफिक महासागरात असलेल्या सायपान या बेटावर राहायला गेली. हे ठिकाण तिच्या घरापासून जवळजवळ १०,००० कि.मी. दूर होते. या नवीन ठिकाणी तिला कोणते अनुभव आले?

दोन प्रार्थनांचे उत्तर

नवीन मंडळीत आल्यानंतर लवकरच प्रचार कार्य करताना कॅथरिनची डॉरिस नावाच्या एका स्त्रीशी भेट झाली. ४५ च्या आसपास वय असलेली ही स्त्री बायबल अभ्यास करण्यास तयार झाली. बायबल काय शिकवते या पुस्तकातील तीन अध्यायांवर चर्चा केल्यानंतर कॅथरिनला तिची काळजी वाटू लागली. ती म्हणते: “डॉरिस खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करत होती आणि मला तिचं नुकसान करायचं नव्हतं. कारण मी कधीही नियमित बायबल अभ्यास घेतला नव्हता. त्यामुळे, मला वाटलं की डॉरिससोबत एखाद्या जास्त अनुभवी आणि शक्यतो तिच्याच वयाच्या बहिणीनं अभ्यास करणं योग्य ठरेल.” डॉरिसचा अभ्यास घेण्याकरता योग्य बहीण मिळावी म्हणून कॅथरिनने यहोवाला प्रार्थनेत मदत मागितली. त्यानंतर तिने डॉरिसला याबद्दल सांगण्याचे ठरवले.

कॅथरिन सांगते, की “डॉरिससोबत याबद्दल चर्चा करण्याआधीच तिनं मला सांगितलं की एका समस्येबद्दल तिला माझ्याशी बोलायचं आहे. तिच्या समस्येविषयी ऐकून घेतल्यानंतर, तिच्यासारख्याच समस्येचा सामना करण्याकरता यहोवानं मला कशा प्रकारे मदत पुरवली होती हे मी तिला सांगितलं. यासाठी तिनं माझे आभार मानले.” त्यानंतर डॉरिस कॅथरिनला म्हणाली: “यहोवा तुझा उपयोग करून मला मदत करत आहे. जेव्हा तू पहिल्यांदा माझ्या घरी आली होतीस तेव्हा  मी अनेक तासांपासून बायबल वाचत होते. मी रडूनरडून देवाजवळ प्रार्थना करत होते की कुणीतरी येऊन मला बायबल समजण्यास मदत करावी आणि तेव्हाच तू दार वाजवलं. यहोवानं मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर दिलं होतं!” कॅथरिनला तो हृदयस्पर्शी क्षण आठवतो तेव्हा तिचे डोळे भरून येतात. ती म्हणते: “डॉरिस त्या दिवशी जे बोलली त्यामुळे मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं होतं. यहोवानं मला हे दाखवून दिलं की मी तिचा अभ्यास घेऊ शकते.”

२०१० साली डॉरिसचा बाप्तिस्मा झाला आणि आज ती स्वतः अनेकांचे बायबल अभ्यास चालवत आहे. कॅथरिन म्हणते: “एका प्रामाणिक अंतःकरणाच्या व्यक्तीला यहोवाचा सेवक बनण्यास मदत करण्याची माझी अनेक वर्षांपासून असलेली इच्छा पूर्ण झाली, त्यासाठी मला खूप आनंद होतो!” कॅथरिन सध्या पॅसिफिकमधील कोसरे नावाच्या बेटावर खास पायनियर या नात्याने सेवा करत आहे.

तीन आव्हाने—त्यांचा कसा सामना करावा?

राज्य प्रचारकांची जास्त गरज असलेल्या माइक्रोनीशियामध्ये शंभरपेक्षा जास्त बांधवांनी आणि बहिणींनी (ज्यांचे वय १९ ते ७९ मध्ये आहे) परदेशाहून येऊन सेवा केली आहे. २००६ साली १९ वर्षांची असताना ग्वाम इथे स्थलांतरित झालेली एरिका नावाची बहीण जे म्हणते त्यावरून या अनेक आवेशी राज्य प्रचारकांच्या भावना अगदी चांगल्या प्रकारे व्यक्त होतात. ती म्हणते: “अशा क्षेत्रात जिथं लोक सत्याचे भुकेले आहेत तिथं पायनियर सेवा करणं खरंच खूप आनंदविणारं आहे. अशा प्रकारची पूर्णवेळेची सेवा निवडण्याचा निर्णय घेण्यासाठी यहोवानं मला मदत केली, म्हणून मी त्याची खूप कृतज्ञ आहे. खरंच इतका आनंद दुसऱ्या कोणत्याच कार्यात मिळू शकत नाही!” एरिका सध्या मार्शल बेटांतील ईबाय या बेटावर खास पायनियर या नात्याने सेवा करत आहे. हे खरे आहे की अनोळखी देशात जाऊन सेवा करणे इतके सोपे नाही. त्या ठिकाणी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. आपण आता त्यांपैकी तीन आव्हानांबद्दल चर्चा करू या आणि माइक्रोनीशियामध्ये स्थलांतरित झालेल्यांनी या आव्हानांचा कशा प्रकारे सामना केला ते पाहू या.

एरिका

राहणीमान. २००७ साली २२ वर्षांचा असताना सायमन हा इंग्लंडवरून पलाऊ या बेटावर सेवा करण्याकरता आला. येथे आल्यानंतर लगेचच त्याला कळले की तो त्याच्या मायदेशी जितके पैसे कमवत होता त्याच्या तुलनेत तो आता खूपच कमी कमवू शकत होता. तो म्हणतो: “मनाला वाटेल ते खरेदी करण्याची माझी सवय मला मोडावी लागली. मला कोणते खाद्यपदार्थ घ्यायचे आहेत हे मी विचारपूर्वक ठरवतो आणि ते कमी भावात कुठं मिळतील हे पाहतो. एखादी वस्तू बिघडल्यास मी तिचे जुने सुटे भाग विकत घेऊन ती दुरुस्त करण्यासाठी कोणाची तरी मदत घेतो.” अशा प्रकारे आपले राहणीमान साधे केल्यामुळे त्याच्यावर कसा परिणाम झाला? सायमन म्हणतो: “जीवनात कोणत्या गोष्टी खरोखरच गरजेच्या आहेत हे ठरवण्यास मला खूप मदत झाली. शिवाय, कमी पैशात खर्च कसा भागवावा हेही मी शिकलो आहे. अनेक वेळा यहोवाचा शक्तिशाली हात मला साहाय्य करत असल्याचं मी अनुभवलं आहे. गेल्या सात वर्षांत या ठिकाणी सेवा करत असताना, माझ्याजवळ खाण्यासाठी काहीच नव्हतं किंवा माझ्या डोक्यावर छत नव्हतं असं कधीच घडलं नाही.” हे अगदी खरे आहे की जे लोक राज्याच्या कामाला आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्यासाठी साधे राहणीमान स्वीकारतात त्यांना यहोवा नक्कीच साहाय्य पुरवतो.—मत्त. ६:३२, ३३.

घरच्यांची आठवण. एरिका म्हणते: “माझं माझ्या घरच्यांवर खूप प्रेम आहे, त्यामुळे मला ही काळजी होती की जर त्यांची सतत आठवण आली तर मला सेवाकार्यावर लक्ष केंद्रित करणं शक्य होणार नाही.” या आव्हानाला तोंड देण्यासाठी तिने स्वतःला कसे तयार केले? ती सांगते, की “स्थलांतर करण्याआधी मी या विषयावर आधारित  टेहळणी बुरूजचे अंक वाचले. त्यामुळे मला या आव्हानाचा सामना करण्यास खूप मदत झाली. एका लेखात मी एका मुलीविषयी वाचलं जिच्या आईनं तिला यहोवाच्या प्रेमळ काळजीचे आश्वासन देण्याकरता म्हटलं, की ‘माझ्यापेक्षा यहोवा तुझी जास्त चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो.’ हे वाचल्यावर मलाही खूप हिम्मत मिळाली.” हॅना आणि तिचे पती पॅट्रिक हे दोघे मार्शल बेटांवरील मज्यूरो या बेटावर सेवा करत आहेत. हॅनाला तिच्या घरच्यांची आठवण येते तेव्हा ती मंडळीतील बांधवांवर आणि बहिणींवर तिचे लक्ष केंद्रित करते. यामुळे तिला या आव्हानाचा सामना करण्यास मदत मिळते. ती म्हणते: “आपल्या जगभरातल्या बहीण-भावांसाठी मी यहोवाचे खूप आभार मानते कारण तेदेखील माझं कुटुंबच आहे. त्यांच्या प्रेमळ मदतीशिवाय मला जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करणं शक्यच झालं नसतं.”

सायमन

मित्र बनवणे. सायमन म्हणतो: “जेव्हा तुम्ही एका नवीन देशात येता तेव्हा सर्वकाही वेगळं असतं. कधीकधी, मी केलेली मस्करी इतरांना पूर्णपणे समजत नाही याचं मला वाईट वाटतं.” एरिका म्हणते: “सुरुवातीला मला खूप एकटंएकटं वाटायचं, पण त्यामुळे मला इथं येण्याच्या माझ्या हेतूवर विचार करण्यास मदत मिळाली. मी इथं स्वतःच्या फायद्यासाठी नाही तर यहोवाची जास्त सेवा करता यावी म्हणून आले आहे, यावर मी लक्ष केंद्रित केलं.” ती पुढे म्हणते: “काही काळानं माझी मंडळीत अनेकांशी चांगली मैत्री झाली. ही मैत्री माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे.” सायमनने पालावान भाषा शिकून घेण्याकरता खूप मेहनत घेतली. यामुळे आता त्याला स्थानिक बांधवांसोबत मनापासून संवाद साधणे शक्य झाले आहे. (२ करिंथ. ६:१३) नवीन भाषा शिकून घेण्याकरता मेहनत घेतल्यामुळे तो इतर बांधवांना प्रिय वाटू लागला. जेव्हा नवीन बांधव स्थानिक बांधवांसोबत मिळून काम करतात तेव्हा मंडळीत जवळचे मैत्रीसंबंध निर्माण होतात. जास्त गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवा करणाऱ्यांना आणखी कोणते आशीर्वाद लाभतात?

मोठ्या प्रमाणावर मिळणारे आशीर्वाद

प्रेषित पौलाने लिहिले, की “जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल.” (२ करिंथ. ९:६) जे लोक आपले सेवाकार्य वाढवण्यासाठी मेहनत घेतात त्यांच्याबाबतीत पौलाचे शब्द खरे ठरतात. माइक्रोनीशियात सेवा करणाऱ्या बांधवांना कोणते आशीर्वाद मिळाले आहेत?

पॅट्रिक आणि हॅना

माइक्रोनीशियात बायबल अभ्यास सुरू करण्याच्या आणि बायबल विद्यार्थी सत्य शिकून व जीवनात लागू करून कशी प्रगती करतात, हे पाहण्याच्या अनेक संधी अजूनही उपलब्ध आहेत. पॅट्रिक आणि हॅना यांनी ३२० रहिवासी असलेल्या अँगऑर नावाच्या एका लहानशा बेटावरही सेवाकार्य केले आहे. त्या ठिकाणी दोन महिने प्रचार केल्यानंतर त्यांची एका स्त्रीशी भेट झाली, जी एकटी पालक होती. तिने लगेच बायबल अभ्यास स्वीकारला, सत्य जणू शोषून घेतले आणि जीवनात बरेच मोठे बदल केले. हॅना म्हणते: “प्रत्येक अभ्यासानंतर जेव्हा आम्ही सायकलींवरून घरी जायला निघायचो तेव्हा दोघंही एकमेकांकडे बघून, ‘यहोवा तुझे खूप खूप आभार!’ असं म्हणायचो.” हॅना पुढे असे म्हणते: “मला माहीत आहे की यहोवानं कोणत्या न कोणत्या मार्गानं या स्त्रीला स्वतःची ओळख करून दिलीच असती; पण जास्त गरज असलेल्या या ठिकाणी सेवा करत असल्यामुळे या नम्र मनोवृत्तीच्या स्त्रीला मदत करण्याची सुसंधी आम्हाला मिळाली. हा आमच्या जीवनातला सर्वात समाधानदायक अनुभव आहे!” एरिका म्हणते: “जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला यहोवाची ओळख करून घेण्यास मदत करता तेव्हा मोबदल्यात तुम्हाला इतका आनंद मिळतो की तो शब्दांत व्यक्त करता येत नाही!”

तुम्हीही हातभार लावू शकता का?

अनेक देशांमध्ये जास्त राज्य प्रचारकांची गरज आहे. तुम्हीदेखील जास्त गरज असलेल्या अशा क्षेत्रांत जाऊन मदत करू शकता का? तुमची अशी इच्छा असल्यास ती आणखी बळकट व्हावी म्हणून यहोवाला प्रार्थना करा. याविषयी मंडळीतील वडीलांशी, विभागीय पर्यवेक्षकाशी किंवा ज्यांनी अशा क्षेत्रात जाऊन सेवा केली आहे त्यांच्याशी चर्चा करा. अशा क्षेत्रात जाऊन सेवा करण्याची योजना करताना त्या क्षेत्रावर देखरेख करणाऱ्या शाखा कार्यालयाला पत्र लिहून जास्त माहिती मिळवा. * कोण जाणे, कदाचित उद्या तुम्हीदेखील त्या हजारो तरुण, वयस्कर, विवाहित व अविवाहित बांधवांपैकी एक असाल ज्यांनी स्वतःला यहोवाच्या सेवेकरता स्वेच्छेने वाहून घेतले आहे आणि जे आज अनेक आशीर्वाद अनुभवत आहेत!

^ परि. 17 आपली राज्य सेवा ऑगस्ट २०११ मधील, “तुम्ही ‘मासेदोनियात जाऊ’ शकाल का?” हा लेख पाहा.