वाचकांचे प्रश्न
यहेज्केलच्या पुस्तकात उल्लेख करण्यात आलेला मागोग देशातील गोग कोण आहे?
बऱ्याच वर्षांपासून, आपल्या प्रकाशनांमध्ये असं सांगण्यात आलं आहे, की ‘मागोगचा गोग’ हे नाव स्वर्गातून खाली टाकलेल्या सैतानाला देण्यात आलं आहे. कारण प्रकटीकरणाच्या पुस्तकात, सर्व राष्ट्रांकडून देवाच्या लोकांविरुद्ध होणाऱ्या हल्ल्याचं नेतृत्व सैतान करेल असं सांगण्यात आलं आहे. (प्रकटी. १२:१-१७) त्यामुळे, गोग हा सैतानच आहे असं आपण समजत होतो.
पण, यामुळे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. उदाहरणार्थ, गोगच्या नाशाबद्दल बोलताना यहोवानं सांगितलं, की मी गोगला “नाना प्रकारच्या हिंस्र पक्ष्यांस व वनपशूंस भक्ष्यार्थ [खाण्यास] देईन.” (यहे. ३९:४) पुढे त्यानं असंही सांगितलं, की मी “गोगला पुरण्यासाठी इस्राएलमधील एक जागा निवडेन.” (यहे. ३९:११, ईझी-टू-रीड) पण, सैतान एक अदृश्य आत्मिक प्राणी आहे. तर मग, त्याला पक्षी व रानातली जनावरं कशी खाऊ शकतील? शिवाय, त्याला पृथ्वीवर पुरलं जाणं कसं शक्य आहे? बायबल स्पष्टपणे सांगतं, की सैतानाला एक हजार वर्षांसाठी अथांग डोहात टाकण्यात येईल. त्याला पशू-पक्षी खाणार नाहीत किंवा त्याला पुरलंही जाणार नाही.—प्रकटी. २०:१, २.
हजार वर्षांनंतर, सैतानाला अथांग डोहातून सोडण्यात येईल. मग “तो पृथ्वीच्या चार कोपऱ्यांतील गोग व मागोग राष्ट्रांस ठकवावयास व त्यांस लढाईसाठी एकत्र करावयास बाहेर येईल,” असं बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. (प्रकटी. २०:८) पण जर सैतानच गोग आहे, तर तो स्वतःलाच फसवेल असा याचा अर्थ होणार नाही का? म्हणूनच, यहेज्केलच्या किंवा प्रकटीकरणाच्या पुस्तकांतील “गोग” सैतानाला सूचित करत नाही हे स्पष्टच आहे.
मग मागोगचा गोग कोण आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी, देवाच्या लोकांवर नेमकं कोण हल्ला करेल हे समजून घेणं गरजेचं आहे. बायबलमध्ये ‘मागोग देशातील गोगने’ केलेल्या हल्ल्याविषयी, “उत्तरेच्या राजाने” केलेल्या हल्ल्याविषयी आणि “पृथ्वीवरील राजांनी” केलेल्या हल्ल्याविषयी वाचायला मिळतं. (यहे. ३८:२, १०-१३; दानी. ११:४०, ४४, ४५; प्रकटी. १७:१४; १९:१९) हे सगळे वेगवेगळे हल्ले आहेत का? असं म्हणता येणार नाही. खरंतर, या सर्व अहवालांत अशा एका शेवटल्या हल्ल्याबद्दल सांगितलं आहे, ज्यानंतर लगेचच हर्मगिदोनाची सुरवात होईल. आणि बायबल आपल्याला सांगतं की या हल्ल्यात पृथ्वीवरील सर्वच राषट्रे सामील असतील. त्यामुळे, असं दिसतं की बायबलमध्ये या एकाच हल्ल्याविषयी सांगताना वेगवेगळी नावं वापरण्यात आली आहेत.—प्रकटी. १६:१४, १६.
त्याचप्रमाणे, यहेज्केलच्या काळातच हयात असलेल्या दानीएल संदेष्ट्यानं उत्तरेच्या राजाविषयी असं म्हटलं, “पूर्वेकडल्या व उत्तरेकडल्या बातम्यांनी तो चिंताक्रांत होईल; तेव्हा मोठ्या संतापाने पुष्कळांचा नाश व उच्छेद करण्यास तो निघून जाईल. समुद्राच्या व शोभिवंत पवित्र पर्वतांच्या दरम्यान तो आपले दरबारी तंबू ठोकेल, पण त्याचा अंत येईल; कोणी त्यास साहाय्य करणार नाही.” (दानी. ११:४४, ४५) यहेज्केलच्या पुस्तकात गोगविषयी जे सांगण्यात आलं आहे त्याच्याशी हे शब्द मिळतेजुळते आहेत.—यहे. ३८:८-१२, १६.
देवाच्या लोकांवर होणाऱ्या या शेवटच्या हल्ल्यानंतर काय होईल? दानीएल सांगतो, “तुझ्या लोकांच्या वतीनं उभा असलेला [१९१४ पासून] मोठा अधिपती मीखाएल त्या काळात [हर्मगिदोनाच्या वेळी] उभा राहील. तेव्हा कोणतंही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आली नाही अशी विपत्ती [मोठं संकट] येईल. आणि तुझ्या लोकांपैकी ज्या कुणाची नावं पुस्तकात लिहिलेली असतील ते सर्व त्या वेळी बचावतील.” (दानी. १२:१, NW) प्रकटीकरण १९:११-२१ मध्येही आपल्याला अशाच प्रकारचं वर्णन वाचायला मिळतं.
पण, प्रकटीकरण २०:८ मध्ये सांगण्यात आलेला “गोग व मागोग” कोण आहे? हजार वर्षं संपल्यावर जेव्हा शेवटली परीक्षा होईल त्या वेळी यहोवाविरुद्ध बंड करून त्याच्या लोकांवर हल्ला करणाऱ्या सर्वांना उद्देशून हे नाव वापरण्यात आलं आहे. तेसुद्धा मागोगच्या गोगप्रमाणेच, म्हणजे मोठ्या संकटाच्या शेवटी देवाच्या लोकांवर हल्ला करणाऱ्या राष्ट्रांच्या समुहाप्रमाणेच, तिरस्काराची मनोवृत्ती दाखवतील. पण, ज्याप्रमाणे हर्मगिदोनात या सर्व राष्ट्रांचा नाश केला जाईल त्याचप्रमाणे गोग व मागोगचाही शेवटी पूर्णपणे नाश केला जाईल. (प्रकटी. १९:२०, २१; २०:९) तेव्हा, येशूच्या हजार वर्षांनंतर बंड करणाऱ्यांना “गोग व मागोग” असं जे म्हटलं आहे ते योग्यच नाही का?
आपण देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करतो. आणि त्यामुळे, येणाऱ्या दिवसांत “उत्तरेचा राजा” कोण असेल हे जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक आहोत. पण, देवाच्या लोकांविरुद्ध हल्ला करणाऱ्या राष्ट्रांचं नेतृत्व करणारा कोणीही असला, तरी दोन गोष्टींच्या बाबतीत आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो: (१) मागोगच्या गोगवर व त्याच्या सैन्यावर विजय मिळवला जाईल आणि शेवटी त्यांचा नाश केला जाईल. (२) आपला राजा येशू, देवाच्या लोकांचा बचाव करेल आणि त्यांना शांती व खरी सुरक्षा असणाऱ्या नवीन जगात आणेल.—प्रकटी. ७:१४-१७.