तुम्हाला माहीत होतं का?
बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे प्राचीन इस्राएलात खरंच खूप झाडं होती का?
बायबल सांगतं की अभिवचन दिलेल्या देशातील काही भागात झाडं अगदी “विपुल” प्रमाणात होती. (१ राजे १०:२७; यहो. १७:१५, १८) पण, सध्या या क्षेत्रात झाडांचं प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे, तिथं पूर्वी खरंच पुष्कळ प्रमाणात झाडं होती का, अशी शंका टीकाकार व्यक्त करतात.
‘लाईफ इन बिब्लिकल इस्राएल’ या पुस्तकात स्पष्ट करण्यात आलं आहे, की “प्राचीन इस्राएलमध्ये आजच्या तुलनेत खूप जास्त प्रमाणात झाडं होती.” तिथल्या डोंगराळ प्रदेशात खासकरून पाईन, ओक आणि एलोन जातीच्या वृक्षांचं प्रमाण जास्त होतं. तसंच, मध्य पर्वतरांग आणि भूमध्य सागर किनारपट्टी यांच्यामध्ये असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उंबराची झाडंदेखील होती.
‘प्लान्ट्स ऑफ द बायबल’ या पुस्तकात सांगितल्यानुसार, इस्राएलमधील काही क्षेत्रात आज झाडं दिसतच नाहीत. याचं कारण हे पुस्तक असं देतं, “लोकांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी, शेतीसाठी, तसंच बांधकाम आणि जळणासाठी लाकूडतोड केली आणि यामुळे हळूहळू तिथली झाडं कमी होत गेली.”