व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्न

वाचकांचे प्रश्न

यरीहो शहर अगदी कमी कालावधीतच काबीज करण्यात आलं, याचा काही पुरावा आहे का?

यहोशवा ६:१०-१५, २० मधील अहवाल सांगतो, की इस्राएली सैनिक दर दिवशी यरीहो शहराभोवती एक प्रदक्षिणा घालायचे. असं त्यांनी सहा दिवस केलं आणि सातव्या दिवशी मात्र त्यांनी शहराला सात प्रदक्षिणा घातल्या. मग देवानं यरीहो शहराची मजबूत तटबंदीची भिंत पाडली आणि इस्राएलांनी ते शहर काबीज केलं. मग बायबल सांगतं त्यानुसार, यरीहो शहराभोवती घालण्यात आलेला वेढा कमी अवधीचा होता हे सिद्ध करण्यासाठी पुरातत्व शास्त्रज्ञांकडे काही आधार आहे का?

प्राचीन काळात, शहराच्या भोवती वेढा देऊन ते काबीज करण्याची पद्धत अगदी सर्वसामान्य होती. हा वेढा जर जास्त काळासाठी असेल, तर शहरातील लोक साठवून ठेवलेलं अन्नधान्य वापरायचे. शेवटी जेव्हा शत्रू सैनिक त्या शहरावर चढाई करायचे, तेव्हा शहरातील इतर सर्व गोष्टींसोबत ते अन्नधान्यही लुटायचे. म्हणूनच, जेव्हा या पद्धतीनं नाश करण्यात आलेल्या पॅलेस्टाईनच्या शहरांचे अवशेष तपासण्यात आले, तेव्हा त्या ठिकाणी अन्नसाठा जवळजवळ संपल्याचं आढळून आलं. पण यरीहो शहराच्या बाबतीत मात्र असं नव्हतं. याविषयी सांगताना, बायबल इतिहासाचा पुरातत्व अहवाल देणारं एक पुस्तक (बिब्लिकल आर्किओलॉजी रिव्यू) म्हणतं, की “[यरीहोच्या] अवशेषांमध्ये, मातीच्या भांड्यांसोबत अतिशय मोठ्या प्रमाणात आढळलेली दुसरी गोष्ट म्हणजे धान्याचा साठा.” पुस्तक पुढे असं म्हणतं: “अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात धान्य सापडणं ही एक असामान्य गोष्ट आहे.”

बायबल म्हणतं, की इस्राएलांनी यरीहो शहरातील अन्नधान्य लुटलं नाही. कारण यहोवानं तशी आज्ञा त्यांना दिली होती. (यहो. ६:१७, १८) शिवाय, बायबल सांगतं, की इस्राएलांनी कापणीच्या हंगामानंतर, म्हणजे शहरात मोठ्या प्रमाणात धान्यसाठा असतो, तेव्हा यरीहोवर आक्रमण केलं. (यहो. ३:१५-१७; ५:१०) त्यामुळे यरीहो शहरात मोठ्या प्रमाणात मिळालेल्या धान्यावरून हे स्पष्ट होतं, की बायबलमध्ये सांगितल्यानुसार यरीहो शहराभोवती देण्यात आलेला वेढा अत्यंत कमी कालावधीचा होता.