व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या मुलांपैकी एक बनणे

देवाच्या मुलांपैकी एक बनणे

देवाच्या मुलांपैकी एक बनणे

कोरियातील लढाईनंतर जवळजवळ ३० वर्षांनी, कोरियन ब्रॉडकास्टिंग सिस्टमने लढाईच्या काळात एकमेकांपासून ताटातूट झालेल्या कुटुंबीयांना एकत्र आणण्यासाठी एक विशेष कार्यक्रम सुरू केला. याचा काय परिणाम झाला? जवळजवळ ११,००० जणांचे त्यांच्या प्रिय व्यक्‍तींसोबत पुनर्मीलन झाले. यांपैकी काहींनी आनंदाश्रू गाळून, काहींनी आनंदाने किंचाळून तर काहींनी घट्ट बिलगून आपल्या प्रिय जनांची पुन्हा भेट झाल्याचा आनंद व्यक्‍त केला. द कोरिया टाईम्स या वर्तमानपत्राने एका वृत्तात असे म्हटले: “कोरियन लोकांनी आजपर्यंत कधीही एकाच वेळी इतक्या स्वाभाविकपणे आनंदाश्रू गाळले नसतील.”

ब्राझीलमध्ये, सेझार याच्या बालपणी त्याच्या वडिलांनी कर्ज फेडता आले नाही म्हणून कर्जाच्या रकमेऐवजी त्यालाच देऊन टाकले. दहा वर्षांनंतर सेझारला त्याची खरी आई सापडली तेव्हा त्याला इतका आनंद झाला की त्याला दत्तक घेतलेल्या श्रीमंत आईवडिलांना सोडून तो आपल्या खऱ्‍या आईसोबत राहायला गेला.

एकमेकांपासून दूर गेलेले किंवा ताटातूट झालेले कौटुंबिक सदस्य पुन्हा एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांना अवर्णनीय आनंद होतो. बायबल सांगते की फार पूर्वी मानव, देवाच्या कुटुंबापासून दूर गेले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे आज पुन्हा एकदा त्यांचे पुनर्मीलन होत आहे. पण देवाच्या कुटुंबापासून मानव कशामुळे दुरावले? आणि तुम्ही या आनंदात कशा प्रकारे सामील होऊ शकता?

देवाच्या कुटुंबापासून मानव कशा प्रकारे दूर गेले?

निर्माणकर्ता यहोवा देव याच्याविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो: “जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.” (स्तोत्र ३६:९) यहोवा त्याची सेवा करणाऱ्‍या बुद्धिजीवी प्राण्यांच्या एका मोठ्या विश्‍वव्यापी कुटुंबाचा पिता आहे. या कुटुंबाच्या स्वर्गीय भागात देवदूतांचा समावेश होतो. हे यहोवाचे आत्मिक पुत्र आहेत. या कुटुंबाच्या पृथ्वीवरील भागात मानव आहेत ज्यांना यहोवाची पृथ्वीवरील मुले बनण्याची आशा आहे.

याआधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे, देवाचा पहिला मानवी पुत्र आदाम याने त्याची आज्ञा मोडली तेव्हा मानवजात आपल्या प्रेमळ पित्यापासून व सृष्टिकर्त्यापासून दुरावली. (लूक ३:३८) ही अतिशय दुःखद घटना होती. कारण आदामाने देवाच्या विरोधात जाऊन देवाच्या मुलांपैकी असण्याचा बहुमान स्वतः तर गमावलाच पण अद्याप जन्म न झालेल्या त्याच्या संततीलाही त्याने या बहुमानापासून वंचित केले. याच संदर्भात देवाने आपला सेवक मोशे याच्याद्वारे असे म्हटले: “हे बिघडले आहेत, हे [देवाचे] पुत्र नव्हत, हा त्यांचा दोष आहे.” (अनुवाद ३२:४, ५; यशया ६:३) अशा प्रकारे, मानवजात देवापासून दूर गेली, जणू अनाथच झाली.—इफिसकर २:१२.

मानवजात देवापासून किती दूर गेली हे दाखवण्याकरता बायबलमध्ये देवाच्या कुटुंबात सामील नसलेल्यांना “शत्रु” म्हटले आहे. (रोमकर ५:८, १०) देवापासून दुरावल्यानंतर मानवजातीला सैतानाच्या क्रूर शासनाखाली अनेक दुःखे सहन करावी लागली आहेत. आणि आदामापासून मिळालेल्या पापाच्या व अपरिपूर्णतेच्या वारशामुळे त्यांना अनेक घातक दुष्परिणामही भोगावे लागले आहेत. (रोमकर ५:१२; १ योहान ५:१९) पापी मानव, देवाच्या कुटुंबात सामील होऊ शकतात का? ते अपरिपूर्ण असूनही, आदाम व हव्वा पाप करण्यापूर्वी होते त्याप्रमाणेच, खऱ्‍या अर्थाने देवाची मुले बनू शकतात का?

दूर गेलेल्या मुलांना एकत्रित करणे

यहोवाने आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या अपरिपूर्ण मानवांच्या फायद्याकरता प्रेमळपणे काही तरतुदी केल्या. (१ करिंथकर २:९) प्रेषित पौलाने याविषयी खुलासा केला: “जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता.” (२ करिंथकर ५:१९) याआधीच्या लेखात स्पष्ट केल्याप्रमाणे, यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला लोकांच्या पापांची खंडणी म्हणून दिले. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) प्रेषित योहानाने कृतज्ञतेने लिहिले: “आपल्याला देवाची लेकरे म्हणावे यात बापाने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पाहा!” (१ योहान ३:१, पं.र.भा.) अशा रीतीने, आज्ञाधारक मानवजातीला पुन्हा एकदा यहोवाच्या कुटुंबात सामील होण्याची संधी मिळाली.

देवाच्या कुटुंबात एकत्रित केले जाणारे सर्व मानव त्यांच्या स्वर्गातील पित्याच्या प्रेमळ देखरेखीखाली ऐक्याने त्याची सेवा करतील. हे जरी खरे असले तरी, त्यांना दोन गटांत एकत्रित केले जाण्याविषयी बायबलमध्ये कसे वर्णन केले आहे याकडे लक्ष द्या: “ख्रिस्ताच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे [देवाने] स्वतःच्या इच्छेनुरूप स्वसंकल्पाचे रहस्य आपल्याला कळविले, ती योजना अशी की, कालखंडाच्या पूर्णतेची व्यवस्था लावताना स्वर्गात पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र करावे.” (इफिसकर १:९, १०) देवाने अशा प्रकारची व्यवस्था का केली आहे?

यहोवाने आपल्या मुलांना दोन गटांमध्ये एकत्रित करण्याची व्यवस्था केल्यामुळे खरे तर, त्याच्या कुटुंबातील ऐक्यात भरच पडेल. हे समजून घेणे फार कठीण नाही. देवाचे कुटुंब इतके मोठे आहे की त्याची तुलना एखाद्या राष्ट्राशी करता येते. कोणत्याही राष्ट्रात, कायदा व सुव्यवस्था राहावी आणि यामुळे सर्वांचे जीवन सुखकर व्हावे म्हणून, काही जणांना सरकार स्थापन करण्यासाठी निवडले जाते. अर्थात, आजपर्यंत कोणतेही मानवी सरकार खरी शांती आणू शकलेले नाही. पण देवाने आपल्या कुटुंबाकरता एक परिपूर्ण सरकार स्थापन केले आहे. त्याने स्वर्गात एक सरकार किंवा राज्य स्थापन करण्याकरता आपल्या मुलांपैकी काहींना निवडले आहे. हाच “स्वर्गात” असणारा देवाच्या मुलांचा पहिला गट आहे. ते स्वर्गातून “पृथ्वीवर राज्य करितील.”—प्रकटीकरण ५:१०.

देवाची पृथ्वीवरील मुले

स्वर्गासोबतच, यहोवा “पृथ्वीवर” देखील लाखो लोकांना एकत्रित करत आहे. कालांतराने, हे लोक त्याची पृथ्वीवरील मुले बनतील. एका दयाळू पित्याप्रमाणे तो त्यांना आपले प्रेमळ मार्ग शिकवतो. म्हणूनच, अनेक वेगवेगळ्या देशांतून असले तरीसुद्धा ते सर्व जण एकोप्याने व शांतीने राहतात. जे हिंसक, स्वार्थी, अनैतिक प्रवृत्तीचे आहेत किंवा जे देवाच्या आज्ञेविरुद्ध वागतात त्यांनाही ‘देवाशी समेट’ करण्याकरता आमंत्रित केले जात आहे.—२ करिंथकर ५:२०.

देवाशी समेट करून त्याची मुले बनण्याचे निमंत्रण जे स्वीकारत नाहीत त्यांच्याविषयी काय? यहोवा आपल्या कुटुंबातील शांती व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी अशा लोकांविरुद्ध कडक कारवाई करेल. त्याने “न्यायनिवाड्याचा व भक्‍तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस” ठरवला आहे. (२ पेत्र ३:७) त्याचा विरोध करणाऱ्‍या सर्वांना तो पृथ्वीवरून घालवेल. तेव्हा यहोवाच्या आज्ञांचे पालन करणारे सुटकेचा निःश्‍वास टाकतील!—स्तोत्र ३७:१०, ११.

यानंतर हजार वर्षांचा शांतीचा काळ येईल. या काळात देवाच्या प्रेमाला प्रतिसाद देणाऱ्‍या सर्वांना हळूहळू, आदामाने गमावलेली परिपूर्णता परत प्राप्त होईल. तेव्हा मृतांनाही पुन्हा जिवंत केले जाईल. (योहान ५:२८, २९; प्रकटीकरण २०:६; २१:३, ४) अशा रीतीने देव ही प्रतिज्ञा पूर्ण करेल: ‘[मानव] सृष्टीहि स्वतः नश्‍वरतेच्या दास्यातून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळेल.’—रोमकर ८:२१.

स्वर्गातील पित्यासोबत पुनर्मीलन

या लेखाच्या सुरुवातीला ज्यांचा उल्लेख करण्यात आला होता त्या सेझारला व हजारो कोरियन लोकांना आपल्या कुटुंबीयांना परत भेटण्याकरता स्वतः विशिष्ट प्रयत्न करावे लागले. कोरियातील त्या लोकांना कोरियन ब्रॉडकास्टिंग सिस्टमच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे लागले. तर सेझारला आपल्या दत्तक पालकांना सोडावे लागले. त्याच प्रकारे, तुम्हाला आपल्या स्वर्गीय पित्यासोबत, यहोवा देवासोबत समेट करण्याकरता आणि त्याच्या कुटुंबात सामील होण्याकरता मनाशी निश्‍चय करून काही पावले उचलावी लागतील. तुम्हाला काय करावे लागेल?

देवाच्या अर्थात तुमच्या पित्याच्या जवळ येण्याकरता तुम्ही त्याच्या वचनाचा म्हणजेच बायबलचा अभ्यास केला पाहिजे. असे केल्याने देवावर व त्याच्या प्रतिज्ञांवर दृढ विश्‍वास ठेवण्यास तुम्हाला साहाय्य मिळेल. देव जे काही सांगतो ते आपल्या भल्याकरता आहे असा भरवसा तुमच्या मनात निर्माण होईल. देवाकडून मिळणारे मार्गदर्शन व ताडनही तुम्ही स्वीकारले पाहिजे कारण बायबल ख्रिश्‍चनांना असे म्हणते: “देव तुम्हाला पुत्रांप्रमाणे वागवितो, आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असा कोण पुत्र आहे?”—इब्री लोकांस १२:७.

ही पावले उचलल्याने तुमच्या सबंध जीवनाचाच कायापालट होईल. बायबल म्हणते: “तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे, आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.” (इफिसकर ४:२३, २४) यानंतर, प्रेषित पेत्राच्या या सल्ल्याचे पालन करा: “आज्ञाधारक मुलांप्रमाणे वागा व तुम्ही अज्ञानी असताना, तुम्हाला पूर्वी ज्या दुष्ट इच्छा होत्या त्याप्रमाणे तुमच्या जीवनाला आकार देण्याचे थांबवा.”—१ पेत्र १:१४, ईझी टू रीड व्हर्शन.

देवाच्या कुटुंबाचा सदस्य बनणे

सेझारला त्याची आई सापडली, तेव्हा आपल्याला एक भाऊ आणि बहीणही आहे हे जाणून त्याला खूप आनंद झाला. त्याच प्रकारे, तुम्ही आपल्या स्वर्गीय पित्याच्या जवळ याल तेव्हा तुम्हालाही ख्रिस्ती मंडळीत अनेक भाऊ व बहिणी मिळतील. त्यांच्या सहवासात राहताना कदाचित ते तुम्हाला स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांपेक्षाही जवळचे वाटू लागतील.—प्रेषितांची कृत्ये २८:१४, १५; इब्री लोकांस १०:२४, २५.

तुम्हाला तुमच्या स्वर्गीय पित्याच्या मुलांपैकी एक होण्याचे व आध्यात्मिक भाऊबहिणींसोबत एका कुटुंबाचे सदस्य होण्याचे निमंत्रण दिले जात आहे. हे निमंत्रण स्वीकारल्यास, तुम्हालाही सेझार आणि कोरियातील त्या हजारो लोकांप्रमाणे आपल्या कुटुंबीयांना पुन्हा भेटण्याचा अवर्णनीय आनंद अनुभवता येईल. (w०८ ३/१)

[२६ पानांवरील चित्र]

सेझार १९ वर्षांचा असताना आपल्या आईसोबत

[२८ पानांवरील चित्रे]

देवाच्या जवळ येण्याकरता आवश्‍यक पावले उचला