व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्तुतीस योग्य असलेला निर्माणकर्ता

स्तुतीस योग्य असलेला निर्माणकर्ता

देवाच्या जवळ या

स्तुतीस योग्य असलेला निर्माणकर्ता

प्रकटीकरण ४:११

‘जीवनाचा उद्देश काय आहे?’ हा प्रश्‍न कधी तुमच्या मनात आला आहे का? आपोआप झालेल्या उत्क्रांतीने जीवनाची सुरुवात झाली, असा विश्‍वास करणारे लोक या प्रश्‍नाचे उत्तर धुंडाळत राहतात आणि त्यांना याचे उत्तर सापडत नाही. पण यहोवा देव हा जीवनाचा झरा आहे, हे सिद्ध झालेले सत्य मानणाऱ्‍यांना असे धुंडाळत राहावे लागत नाही. (स्तोत्र ३६:९) त्यांना माहीत आहे, की आपल्याला निर्माण करण्यामागे त्याचा एक उद्देश होता. तो उद्देश प्रकटीकरण ४:११ मध्ये देण्यात आला आहे. प्रेषित योहानाने लिहिलेले ते शब्द, आपण इथे का आहोत याचे स्पष्टीकरण कसे देतात ते पाहू या.

योहान एका स्वर्गीय गीतसमूहाविषयी सांगतो जे देवाची स्तुती करत आहेत: “हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” केवळ यहोवाच अशा भक्‍तीस योग्य आहे. का? कारण त्यानेच “सर्व काही निर्माण केले.” मग त्याच्या बुद्धिमान सृष्टीने काय करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे?

गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्‍यांचा “स्वीकार करावयास” यहोवा योग्य आहे, असे या वचनात म्हटले आहे. अख्ख्‌या विश्‍वात तोच सर्वात वैभवी, आदरणीय व शक्‍तीशाली आहे, यात तीळमात्रही शंका नाही. पण, बहुतेक मानवाजात त्याला निर्माणकर्ता म्हणून मानत नाही. तरीपण असेही काही लोक आहेत ज्यांना, देवाने बनवलेल्या गोष्टींतून त्याचे “अदृश्‍य” गुण दिसून येतात. (रोमकर १:२०) त्यामुळे कृतज्ञतेने ओतप्रोत भरलेल्या अंतःकरणाने ते यहोवाचा गौरव व त्याचा आदर करण्यास प्रवृत्त होतात. आणि जे लोक ऐकण्याची तयारी दर्शवतात त्यांना ते, यहोवानेच सर्व गोष्टी अद्‌भुत रीतीने बनवल्या आहेत याचा ठाम पुरावा देतात आणि यामुळेच तो आपल्या आदरास पात्र आहे, हेही सांगतात.—स्तोत्र १९:१, २; १३९:१४.

पण यहोवाला आपल्या उपासकांकडून सामर्थ्य कसे काय प्राप्त होते? अर्थात, कोणताही प्राणी सर्वशक्‍तिमान निर्माणकर्त्याला शक्‍ती देऊ शकत नाही. (यशया ४०:२५, २६) आपल्याला देवाच्या प्रतिरूपात निर्माण करण्यात आले असल्यामुळे, देवाच्या प्रमुख गुणांपैकी एक गुण म्हणजे शक्‍ती, हा गुण आपल्याला काही प्रमाणात देण्यात आलेला आहे. (उत्पत्ति १:२७) आपल्या निर्माणकर्त्याने आपल्यासाठी काय काय केले आहे त्याबद्दल आपण जर कृतज्ञता बाळगली तर आपण, आपल्या शक्‍तीचा उपयोग त्याचा आदर व गौरव करण्यासाठी करू शकतो. केवळ स्वतःच्याच इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यात आपली शक्‍ती खर्च करण्यापेक्षा, यहोवाची सेवा करण्यात ती खर्च करून आपण हे दाखवून देतो, की तो आपली शक्‍ती प्राप्त करण्यास योग्य आहे.—मार्क १२:३०.

तर मग आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? प्रकटीकरण ४:११ वचनाच्या शेवटल्या भागात या प्रश्‍नाचे उत्तर देण्यात आले आहे. ‘कारण तुझ्या इच्छेने त्या [सर्व सृष्ट गोष्टी] झाल्या व अस्तित्वात आल्या.’ आपण स्वतःच्या इच्छेमुळे अस्तित्वात आलो नाही. तर देवाच्या इच्छेमुळे अस्तित्वात आलो. म्हणूनच, आत्मकेंद्रित किंवा केवळ स्वतःसाठी जगलेले जीवन निरर्थक व असमाधानी आहे. आपल्याला जर आंतरिक शांती, आनंद, समाधान व तृप्ती हवी असेल तर आपण देवाची इच्छा काय आहे हे शिकून घेतले पाहिजे आणि त्या इच्छेच्या सामंजस्यात जगले पाहिजे. तेव्हाच आपल्याला, आपल्या निर्मितीमागचा आणि अस्तित्वामागचा उद्देश समजेल.—स्तोत्र ४०:८. (w०८ १२/१)

[३० पानांवरील चित्राचे श्रेय]

NASA, ESA, and A. Nota (STScI)