नेहमी योग्य न्याय करणारा न्यायाधीश
देवाच्या जवळ या
नेहमी योग्य न्याय करणारा न्यायाधीश
मानवी न्यायाधीश न्याय करताना कदाचित अन्याय करू शकतात किंवा चुकीची शिक्षा देऊ शकतात. पण “न्याय प्रिय” असणारा यहोवा देव असा नाही. (स्तोत्र ३७:२८) तो जरी सहनशील असला तरी अन्याय किंवा वाईट गोष्टी बिलकूल खपवून घेत नाही. योग्य गोष्टींवर तो नेहमी ठाम राहतो. गणनाच्या २० व्या अध्यायात सांगितलेली भांडणाची व बंडाळीची घटना त्याने कशी हाताळली यावर विचार करा.
इस्राएली लोकांचा अरण्यातील प्रवास संपत आला असताना त्यांना पाण्याची कमी भासली. * तेव्हा ते मोशे व अहरोनाशी भांडू लागले: “तुम्ही परमेश्वराची मंडळी ह्या रानात कशाला आणिली? आम्ही व आमच्या पशूंनी मरावे म्हणून?” (वचन ४) इस्राएली लोक या अरण्याला ‘भिकार ठिकाण’ म्हणत होते व अनेक वर्षांपूर्वी वचनयुक्त देशातून इस्राएली हेरांनी आणलेली “अंजीर, द्राक्षवेल अथवा डाळिंबे” ही फळे तर इथे नाहीतच, पण “प्यावयाला पाणी सुद्धा नाही” अशी तक्रार ते करू लागले. (वचन ५; गणना १३:२३) हे अरण्य इस्राएली लोकांच्या कुरकुर करणाऱ्या आधीच्या पिढीने ज्या सधन देशात जायला नकार दिला होता त्या देशासारखे नव्हते, असा दोष खरे तर ते मोशे व अहरोनावर लावत होते.
यहोवाने कुरकुर करणाऱ्या त्या लोकांचा त्याग केला नाही. उलट, त्याने मोशेला तीन गोष्टी करायला सांगितल्या: आपली काठी घे, मंडळीला जमव व ‘त्यांच्यादेखत त्या खडकाला आज्ञा कर म्हणजे त्यातून पाणी निघेल.’ (वचन ८) मोशेने पहिल्या दोन आज्ञा मानल्या पण तिसरी आज्ञा मानायला मात्र तो चुकला. यहोवावर विश्वास ठेवून खडकाला आज्ञा देण्याऐवजी तो लोकांशी रागाने बोलला. तो म्हणाला: “अहो, बंडखोरांनो, ऐका; तुमच्यासाठी आम्ही ह्या खडकातून पाणी काढावयाचे काय?” (वचन १०; स्तोत्र १०६:३२, ३३) नंतर मोशेने दोनदा आपली काठी खडकावर आपटली “तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले.”—वचन ११.
अशा प्रकारे मोशेने व अहरोनाने गंभीर पाप केले. देव त्यांना म्हणाला: “तुम्ही . . . माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून बंड केले.” (गणना २०:२४) मोशेने व अहरोनाने लोकांना बंडखोर म्हटले होते. पण, देवाची आज्ञा न मानल्यामुळे या प्रसंगी ते स्वत:च बंडखोर बनले. देवाचा न्याय स्पष्ट होता: मोशे व अहरोनाला वचनयुक्त देशात इस्राएली लोकांचे नेतृत्व करता येणार नव्हते. ही शिक्षा खूपच कडक होती का? नाही, त्याची अनेक कारणे आहेत.
पहिले कारण, देवाने मोशेला लोकांशी बोलायला सांगितले नव्हते, मग त्यांना बंडखोर ठरवणे तर दूरच. दुसरे कारण, मोशे व अहरोन देवाचे गौरव करायला चुकले होते. देवाने त्यांना म्हटले: “[तुम्ही] माझे पावित्र्य प्रगट केले नाही.” (वचन १२) “आम्ही ह्या खडकातून पाणी काढावयाचे काय?” असे बोलण्याद्वारे मोशेने, चमत्काराने पाणी देणारा देव नसून, तो व अहरोन आहे असे सुचवले. तिसरे कारण, देवाने आधी केलेल्या न्यायाच्या सुसंगतेत ही शिक्षा होती. बंडाळी करणाऱ्या आधीच्या पिढीला देवाने कनान देशात प्रवेश करू दिला नव्हता. मोशेला व अहरोनालाही त्याने हीच शिक्षा दिली. (गणना १४:२२, २३) चौथे कारण हे होते की मोशे व अहरोन इस्राएली लोकांचे नेते होते. ख्रिस्ती मंडळीत अधिक जबाबदारी असणारे यहोवासमोर जास्त जबाबदार आहेत.—लूक १२:४८.
जे योग्य आहे त्याबद्दल यहोवा अगदी ठाम आहे. त्याला न्याय प्रिय असल्यामुळे तो न्याय करताना कोणावरही अन्याय करू शकत नाही किंवा त्यांना चुकीची शिक्षा देऊ शकत नाही. असा न्यायाधीश भरवसा व आदरास नक्कीच पात्र आहे. (w०९ ०९/०१)
[तळटीप]
^ परि. 5 इजिप्तमधून निघाल्यावर इस्राएली लोक देवाने अब्राहामाला जो देश देण्याचे वचन दिले होते त्या कनान देशात जायच्या तयारीत होते. पण जेव्हा दहा हेर त्या देशाबद्दल वाईट बातमी आणतात तेव्हा ते मोशेविरुद्ध कुरकुर करू लागतात. तेव्हा यहोवा त्यांना अरण्यात ४० वर्ष भटकत राहण्याची शिक्षा सुनावतो. ही बंडखोर पिढी नष्ट व्हायला एवढा वेळ पुरेसा होता.