व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मी यहोवा तुमचा देव पवित्र आहे लेवीय

मी यहोवा तुमचा देव पवित्र आहे लेवीय

देवाच्या जवळ या

मी यहोवा तुमचा देव पवित्र आहे लेवीय

अध्याय १९

यहोवा “पवित्र, पवित्र, पवित्र . . . देव” आहे. (प्रकटीकरण ४:८) या शब्दात बायबल यहोवाच्या पावित्र्याबद्दल सांगते. म्हणजेच तो शुद्धता व स्वच्छता यांबाबतीत सर्वोच्च आहे. त्याच्यात पापीपणाचा लवलेशही नाही. तो कोणत्याही प्रकारे पापामुळे दूषित किंवा कलंकित होऊ शकत नाही. मग पवित्रतेच्या बाबतीत सर्वोच्च असलेल्या देवाशी अपरिपूर्ण मानवाला नाते जोडण्याची आशा नाही, असा याचा अर्थ होतो का? नाही. लेवीय १९ व्या अध्यायातील आशादायक शब्दांकडे लक्ष द्या.

यहोवा मोशेला म्हणाला, “इस्राएलाच्या सर्व मंडळीस सांग की, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्‍वर तुमचा देव पवित्र आहे.” (वचने १, २) मोशेने जे सांगितले ते राष्ट्रातील सर्वांना लागू होणार होते. प्रत्येक इस्राएली व्यक्‍तीला पवित्र आचरण ठेवायचे होते. “तुम्ही पवित्र असावे” हे शब्द एक सूचना नव्हती तर ती एक आज्ञा होती. देव अशक्यप्राय गोष्टीची त्यांच्याकडून अपेक्षा करत होता का?

यहोवाने तो पवित्र आहे हे सांगितले तेव्हा लोकांनीही त्याच्या पवित्रतेच्या स्तराचे असावे अशी तो अपेक्षा करत नव्हता तर ती आज्ञा देण्यामागचे कारण तो सांगत होता. दुसऱ्‍या शब्दात सांगायचे झाल्यास यहोवा इस्राएलमधील त्याच्या अपरिपूर्ण उपासकांना त्याच्याइतके पवित्र होण्यास सांगत नव्हता. ते अशक्य होते. इतर कोणापेक्षाही यहोवाच फक्‍त ‘परमपवित्र’ आहे. (नीतिसूत्रे ३०:३) पण, त्याच्या उपासकांनी अपरिपूर्ण असतानाही होता होईल तितके त्याच्यासारखे पवित्र असावे अशी त्यांच्याकडून तो अपेक्षा करत होता. ते स्वतःला पवित्र कसे सिद्ध करू शकत होते?

पवित्र असण्याची आज्ञा दिल्यानंतर यहोवाने मोशेद्वारे इस्राएली लोकांना जीवनाच्या प्रत्येक पैलूला लागू होणारे नियम सांगितले. प्रत्येक इस्राएली व्यक्‍तीने वर्तनाबद्दलचे दर्जे पाळायचे होते. जसे की: आईवडील व वृद्धजन यांना मान द्यायचा होता (वचने ३, ३२); बहिरे व अंधळे तसेच गरीब या लोकांचा विचार करायचा होता (वचने ९, १०, १४); इतरांशी त्यांनी प्रामाणिक राहायचे होते, पक्षपात करायचा नव्हता (वचने ११-१३, १५, ३५, ३६); सहउपासकांवर स्वतःसारखे प्रेम करायचे होते. (वचन १८) या व सांगण्यात आलेल्या इतर दर्जांचे पालन करण्याद्वारे इस्राएली लोक “आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र” होणार होते.—गणना १५:४०.

पवित्रतेबद्दलच्या आज्ञेवरून यहोवा देवाच्या विचारांबद्दल व मार्गांबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती मिळते. एक गोष्ट मात्र नक्की, यावरून यहोवा देवासोबत जवळचा नातेसंबंध टिकवण्यासाठी आपण त्याच्या पवित्र वर्तनाच्या दर्जांनुसार जगण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे, हे आपण शिकतो. (१ पेत्र १:१५, १६) या दर्जांचे पालन करीत राहिल्याने आपण सर्वोत्तम जीवनाचा आनंद लुटू शकतो.—यशया ४८:१७.

पवित्र व्हा या यहोवाने दिलेल्या आज्ञेवरून त्याला त्याच्या उपासकांबद्दल असलेला भरवसा दिसून येतो. आपण जे करू शकतो त्यापेक्षा जास्तीची अपेक्षा यहोवा आपल्याकडून कधीच करत नाही. (स्तोत्र १०३:१३, १४) त्याला हे माहीत आहे की त्याच्या प्रतिरूपात बनवलेल्या मानवात, तुलनात्मक रीत्या त्याच्यापेक्षा कमी प्रमाणात का होईना, पवित्र होण्याची क्षमता आहे. (उत्पत्ति १:२६) पवित्र देव यहोवा याच्या जवळ तुम्ही कसे जाऊ शकता याबद्दल आणखी शिकून घेण्यास तुम्ही प्रेरित झाला आहात का? (w०९ ०७/०१)

[३० पानांवरील चित्र]

आपल्यात पवित्र होण्याची क्षमता आहे