आपल्या मुलांना शिकवा
पेत्र व हनन्या खोटं बोलले आपण काय शिकू शकतो?
खोटं बोलणं म्हणजे काय हे तर तुला माहीतच असेल. खोटं बोलणं म्हणजे जे खरं नाही ते बोलणं. तू कधी खोटं बोललास का?— * देवावर प्रेम करणारे काही मोठे लोकसुद्धा खोटं बोलले होते. बायबलमध्ये अशाच एका मनुष्याविषयी सांगितलं आहे; त्याच्याबद्दल कदाचित तुला माहीत असेल. त्याचं नाव आहे पेत्र. तो येशूच्या १२ प्रेषितांपैकी एक होता. पण, पेत्र खोटं का बोलला त्याविषयी आता आपण वाचू या.
येशूला पकडल्यानंतर त्याला महायाजकाच्या घरी घेऊन जातात. रात्र खूप झाली आहे. पेत्र लपूनछपून महायाजकाच्या घराच्या अंगणात शिरतो. पण, शेकोटीच्या प्रकाशात महायाजकाची दासी पेत्राला ओळखते. ती त्याला म्हणते: “तूही . . . येशूबरोबर होतास.” पण पेत्र घाबरतो आणि म्हणतो ‘नाही, मी नव्हतो.’
बायबल पुढं सांगतं, की नंतर दुसरी एक दासी पेत्राला पाहते आणि म्हणते: “हा . . . येशूबरोबर होता.” पुन्हा एकदा पेत्र घाबरतो आणि म्हणतो ‘नाही, नाही मी नव्हतो.’ काही वेळानं काही लोक पेत्राजवळ येतात आणि म्हणतात: “खरोखर, तूही त्यांतला आहेस.”
पेत्र आता आणखीनच घाबरतो आणि तिसऱ्यांदा खोटं बोलतो. तो म्हणतो: “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” इतक्यात एक कोंबडा आरवतो. त्याच वेळी येशू पेत्राकडे पाहतो, आणि काही तासांआधीच येशू पेत्राला जे बोलला होता ते पेत्राला आठवतं. येशू पेत्राला म्हणाला होता, की “कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील.” पेत्र खूप दुःखी होतो आणि रडू लागतो. त्याला खूप वाईट वाटतं!
तुझ्यासोबतही असं काही होऊ शकतं का? — आता अशी कल्पना कर की तुझ्या वर्गातली काही मुलं आपसात बोलत आहेत. एक जण म्हणतो “काल आमच्या घरी काही ख्रिश्चन लोक प्रचार करायला आले होते.” दुसरा म्हणतो “अरे हो, आमच्या इथंपण आले होते, काही पुस्तकं वाटत होते ते.” मग, त्यातला एक जण अचानक तुझ्याकडे वळून तुला म्हणतो, “ए तूपण ख्रिश्चन आहेस ना, मग तूपण घरोघर जाऊन प्रचार करतो?” मग तू काय उत्तर देशील?—
अशी वेळ येण्याआधीच काय उत्तर द्यावं याचा आपण विचार केला पाहिजे, आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. पेत्रानं ती तयारी केली नव्हती. आणि म्हणून, त्याच्यावर दबाव आला तेव्हा तो खोटं बोलला. पण त्यानं जे काही केलं त्याचं त्याला खूप वाईट वाटलं आणि म्हणून देवानं त्याला माफ केलं.
बायबलच्या काळात राहणारा येशूचा आणखी एक शिष्यसुद्धा खोटं बोलला होता. त्याचं नाव होतं हनन्या. त्याच्यासोबत त्याची बायको सप्पीरा हीसुद्धा खोटं बोलली. पण यांना मात्र देवानं माफ केलं नाही. देवानं का त्यांना माफ केलं नाही हे आता आपण पाहू या.
येशू त्याच्या प्रेषितांना सोडून स्वर्गात जातो त्याच्या दहा दिवसांनंतर, जेरूसलेममध्ये जवळजवळ ३,००० लोक बाप्तिस्मा घेतात. पेन्टेकॉस्टचा सण साजरा करण्यासाठी बरेच जण दूरदूरच्या देशांतून आले आहेत; आणि येशूचे शिष्य बनल्यानंतर देवाबद्दल आणखीन शिकून घेण्यासाठी त्यांना आणखी काही दिवस जेरूसलेममध्ये राहायची इच्छा आहे. त्यामुळे येशूचे काही शिष्य स्वतःच्या पैशांतून त्यांचा सांभाळ करतात.
नवीनच बाप्तिस्मा झालेल्या या लोकांना मदत करण्यासाठी हनन्या आणि सप्पीरा आपली काही जमीन विकतात. जमीन विकल्यानंतर हनन्या प्रेषितांना पैसे आणून देतो आणि जमीन विकल्याचे इतकेच पैसे मिळाले असं त्यांना सांगतो. पण ते खरं नाही! कारण त्यातले काही पैसे हनन्या स्वतःसाठी ठेवून घेतो. या सर्व गोष्टी देव पेत्राला कळवतो तेव्हा पेत्र हनन्याला म्हणतो: “तू मनुष्याशी नव्हे तर देवाशी लबाडी केली आहेस.” तेव्हा हनन्या खाली पडतो आणि मरतो. मग काही तीन तासांनंतर हनन्याची बायको तिथं येते. आपल्या नवऱ्याला काय झालंय हे तिला माहीत नसतं आणि तीसुद्धा खोटं बोलते आणि खाली पडून मरून जाते.
यावरून एक खूप महत्त्वाचा धडा आपण शिकतो. तो म्हणजे: आपण नेहमी खरं बोललं पाहिजे! आपल्यापैकी प्रत्येकानं खरं बोलायला शिकलं पाहिजे! चुका सगळ्यांकडूनच होतात, नाही असं नाही. आणि खासकरून आपण लहान असतो तेव्हा आपल्या हातून चुका होऊ शकतात. पण, यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि त्यानं जसं पेत्राला माफ केलं तसं तो आपल्यालाही माफ करू शकतो हे कळल्यावर आपल्याला आनंद होत नाही का?— पण त्यासाठी आपण नेहमी खरं बोललं पाहिजे. आणि खोटं बोलण्याची मोठी चूक कधी आपल्या हातून झालीच तर आपण देवाला मनापासून क्षमा मागितली पाहिजे. पेत्रानं हेच केलं असावं आणि म्हणून देवानं त्याला माफ केलं. आपणही खोटं न बोलण्याचा प्रयत्न केला, तर देव नक्कीच आपल्यालाही माफ करेल! ▪ (w१३-E ०३/०१)
तुझ्या बायबलमधून वाच
^ तुम्ही हा लेख आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, जेव्हा वाक्यांच्या पुढे एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसते तेव्हा तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते त्याला विचारा.