व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या जवळ या

“मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल”

“मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल”

येशूच्या शिष्यांपैकी एकाने त्याला अशी विनंती केली, प्रभुजी “प्रार्थना करावयास . . . आम्हाला शिकवा.” (लूक ११:१) मग उत्तरात येशूने दोन दृष्टांत सांगितले. देवाला प्रार्थना कशी करावी व त्याने आपले ऐकावे म्हणून आपण काय केले पाहिजे हे या दोन दृष्टान्तांवरून आपल्याला शिकायला मिळते. देव तुमची प्रार्थना ऐकतो का अशी शंका जर तुमच्या मनात आली असेल तर येशूने दिलेल्या दृष्टान्तांचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.—लूक ११:५-१३ वाचा.

पहिला दृष्टान्त प्रार्थना करणाऱ्‍या व्यक्‍तीविषयी सांगतो. (लूक ११:५-८) या दृष्टान्तात एका माणसाच्या घरी मध्यरात्री एक पाहुणा येतो पण त्याला जेवण देण्यासाठी त्याच्याजवळ काही नसते. कसेही करून घरधन्याला त्याच्या घरी आलेल्या पाहुण्याच्या जेवणाची व्यवस्था करायची असते. मध्यरात्र असूनही तो त्याच्या एका मित्राकडे भाकरी मागण्याकरता जातो. मित्राच्या कुटुंबातील सदस्य गाढ झोपेत असल्यामुळे मित्र सुरुवातीला दार उघडण्यास कचरतो. पण, घरधन्याने पुन्हा पुन्हा केलेल्या विनंतीमुळे शेवटी त्याचा मित्र उठतो आणि त्याला भाकरी देतो. *

हा दृष्टान्त आपल्याला प्रार्थना करण्याविषयी काय शिकवतो? येशू सांगत आहे की आपण सतत मागत, शोधत आणि ठोकत राहिले पाहिजे. (लूक ११:९, १०) असे का? येथे येशूला असे म्हणायचे आहे का ज्याप्रकारे तो मित्र दार उघडण्यास उत्सुक नव्हता तसाच देव आपल्या प्रार्थना ऐकण्यास उत्सुक नाही? असे मुळीच नाही. येशूला हे म्हणायचे होते की देव त्या मित्रासारखा नाही. देवाला जे विश्‍वासाने व त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतात त्यांच्या प्रार्थना ऐकण्यास तो उत्सुक असतो. या गोष्टीवर आपला विश्‍वास आहे हे आपण सतत केलेल्या मागण्यांवरून दिसून येते. आपण जे मागत आहोत त्याची आपल्याला खरोखर गरज आहे आणि त्याच्या इच्छेनुसार मागितल्यास तो नक्की देईल असा आपला पक्का विश्‍वास आहे हे आपण सतत केलेल्या प्रार्थनांतून दिसून येते.—मार्क ११:२४; १ योहान ५:१४.

दुसरा दृष्टान्त प्रार्थना ऐकणाऱ्‍या यहोवाविषयी सांगतो. (स्तोत्र ६५:२) येशूने विचारले: “तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो, आपल्या मुलाने मासा मागितला असता त्याला मासा न देता साप देईल? किंवा अंडे मागितले असता त्याला विंचू देईल?” साहजिकच एक प्रेमळ पिता आपल्या मुलाला हानिकारक गोष्टी कधीच देणार नाही. नंतर येशूने दृष्टान्ताचा अर्थ सांगितला: जर एक अपरिपूर्ण पिता आपल्या मुलांना “चांगल्या देणग्या” देतो तर मग “स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल.” आणि पवित्र आत्मा तर जगातील सर्वांत उत्तम देणगी आहे. *लूक ११:११-१३; मत्तय ७:११.

देवाला जे विश्‍वासाने व त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतात त्यांच्या प्रार्थना ऐकण्यास तो उत्सुक असतो

हा दृष्टान्त आपल्याला प्रार्थना ऐकणाऱ्‍या यहोवाविषयी काय शिकवतो? यहोवा हा एक प्रेमळ पिता आहे जो आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यास आतुर आहे. त्यामुळे, यहोवाचे उपासक आपल्या मनात कोणताही संकोच न बाळगता त्याच्याशी मनमोकळेपणे बोलू शकतात. आणि यहोवाच्या उपासकांना माहीत आहे की यहोवा नेहमी आपल्या भल्याचा विचार करतो. म्हणून यहोवाकडून मिळालेले उत्तर जरी त्यांच्या मनासारखे नसले तरी ते त्याचा स्वीकार करतात. * ▪ (w१३-E ०४/०१)

बायबल वाचन

मार्क ९-लूक ६

^ येशूने जी गोष्ट सांगितली ती त्या काळी सहसा घडायची. यहूदी लोक पाहुणचार करण्यास खूप महत्त्व द्यायचे. ते एका दिवसाला पुरेल इतक्या भाकरी बनवायचे. त्यामुळे जर पाहुणे आले तर ते सहसा दुसऱ्‍यांकडून भाकरी मागायचे. त्याचबरोबर, जर ते गरीब असतील तर संपूर्ण कुटुंब एकाच खोलीत जमिनीवर झोपायचे.

^ लोकांना शिकवताना, येशू सहसा “किती विशेषकरून” या वाक्यांशाचा वापर करून दोन गोष्टींची तुलना करायचा. एखादा साधा मुद्दा सांगून, त्यावरून एखाद्या जास्त महत्त्वाच्या विषयासंबंधी निष्कर्ष काढण्यास तो आपल्या श्रोत्यांना मदत करायचा.

^ देवाला प्रार्थना कशी करावी व त्याने आपले ऐकावे म्हणून आपण काय केले पाहिजे याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातील अध्याय १७ पाहा.