व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

बायबलनं बदललं जीवन!

आता मीसुद्धा इतरांना मदत करू शकतो

आता मीसुद्धा इतरांना मदत करू शकतो
  • जन्म: १९८१

  • देश: ग्वाटेमाला

  • पार्श्‍वभूमी: दुःखद बालपण

माझं आधीचं जीवन:

ग्वाटेमालाच्या पश्‍चिमेकडील डोंगराळ भागात दूरवर अकूल नावाचं एक गाव आहे. तिथं माझा जन्म झाला. आम्ही माया संस्कृतीतील इक्सील जमातीचे लोक आहोत. मला स्पॅनिश आणि आमच्या गावची भाषा बोलता येते. ग्वाटेमालात ३६ वर्षांपासून मुलकी युद्ध चालू होतं. आणि त्याच कटू आठवणी माझ्या बालपणाच्या आहेत. या युद्धात इक्सील जमातीचे खूप लोक मारले गेले.

मी चार वर्षांचा असताना माझ्या मोठ्या भावाबरोबर एकदा खेळत होतो. त्याच्या हातात एक स्फोटक हातगोळा होता. त्या हातगोळ्याचा स्फोट झाला आणि या अपघातामुळं मी कायमचा अंधळा झालो आणि माझा भाऊ मरण पावला. ग्वाटेमाला शहरात अंध मुलांसाठी असलेल्या संस्थेत माझं बालपण गेलं. तिथं मी ब्रेल (अंधांसाठी असलेली लिपी) वाचायला शिकलो. पण तिथल्या वातावरणामुळं मी एकलकोंडा झालो. तिथले कर्मचारी इतर मुलांना माझ्याबरोबर बोलू देत नव्हते. त्याचं कारण मला आजपर्यंत माहीत नाही. यामुळं मग वर्षातून एकदा मिळणारी दोन महिन्यांची सुटी केव्हा येईल, असं मला वाटायचं. घरी माझी आई होती. ती खूप प्रेमळ आणि दयाळू होती. पण, मी दहा वर्षांचा झालो तेव्हा ती मरण पावली. पुन्हा मी एकटा पडलो. माझ्यावर प्रेम करणारी एकुलती एक व्यक्तीसुद्धा माझ्यापासून दूर गेल्यामुळं मी मनानं पूर्णपणे खचलो.

वयाच्या ११ व्या वर्षी मी अंध संस्थेतून माझ्या गावी आलो. गावी माझा सावत्र भाऊ त्याच्या कुटुंबाबरोबर राहत होता. मी त्यांच्याकडं राहायला गेलो. त्यांनी माझी काळजी घेतली, पण मला मानसिक आधार ते देऊ शकले नाहीत. कधीकधी मी देवाला रडून प्रार्थना करायचो आणि म्हणायचो: “माझी आई का मेली? मी अंधळा का झालो?” ही देवाची इच्छा आहे, असं लोक मला म्हणायचे. त्यामुळं देव निष्ठुर आणि अन्यायी आहे, असं मला वाटायचं. मला जीव द्यावासा वाटायचा, पण तोही मला देता येत नव्हता.

अंधळा असल्यामुळं मी असाहाय्य होतो. मी लहान होतो तेव्हा पुष्कळदा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले. पण मी हे कुणाला सांगितलं नाही. माझं कुणी ऐकणार नाही, असं मला वाटायचं. लोक माझ्याबरोबर जास्त बोलायचे नाहीत. आणि मीसुद्धा लोकांबरोबर जास्त बोलायचो नाही. मी एकलकोंडा आणि निराश झालो. आणि माझा कुणावरच भरवसा राहिला नाही.

बायबलनं कसं जीवन बदललं?

मी १३ वर्षांचा होतो तेव्हा यहोवाचे साक्षीदार असलेलं एक जोडपं शाळेच्या मधल्या सुटीत माझ्याबरोबर बोलायला आलं. आमच्या शाळेत एक शिक्षिका होती. तिला माझी दया यायची. तिनंच या दोघांना मला भेटायला सांगितलं होतं. या जोडप्यानं मला मृत लोक पुन्हा जिवंत होतील आणि अंधळे पुन्हा पाहू शकतील, ते बायबलमधून सांगितलं. (यशया ३५:५; योहान ५:२८, २९) त्यांनी सांगितलेल्या गोष्टी मला आवडल्या पण, माझ्या लाजऱ्या स्वभावामुळं मी त्यांच्याबरोबर त्या विषयांवर जास्त बोलू शकलो नाही. तरीपण या जोडप्यानं मला सोडलं नाही. मी जास्त बोलायचो नाही तरी ते मला बायबलमधल्या गोष्टी शिकवायला यायचे. ते खूप दयाळू व सहनशील होते. माझ्या गावी येण्यासाठी त्यांना १० किलोमीटर चालत यावं लागायचं आणि डोंगर पार करावा लागायचा.

माझ्या सावत्र भावानं मला या जोडप्याचं वर्णन, नीटनेटके कपडे घातलेले पण बेताची परिस्थिती असलेले लोक, असं केलं होतं. त्यांची आर्थिक परिस्थिती खास नव्हती तरीपण ते माझ्यासाठी लहान-सहान गोष्टी आणायचे. माझी खातरी पटली की फक्त खरे ख्रिस्तीच अशा प्रकारचं निःस्वार्थ प्रेम दाखवू शकतात.

ब्रेल प्रकाशनांतून मी बायबलचा अभ्यास केला. मी शिकत असलेल्या काही गोष्टी मला समजल्या पण, काही गोष्टी स्वीकारायला मला कठीण जात होतं. जसं की, देवाला खरोखरच माझी काळजी आहे आणि इतरांनाही माझी तशीच काळजी वाटते, यावर माझा विश्वास बसत नव्हता. देवानं दुष्ट परिस्थिती अजूनपर्यंत का काढून टाकली नाही ते मला समजलं पण तो खरोखरच एक प्रेमळ पिता आहे, ही गोष्ट मान्य करायला माझं मन तयार होत नव्हतं. *

हळूहळू बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टींमुळं माझा दृष्टिकोन बदलू लागला. जसं की, दुःख सहन करणाऱ्यांबद्दल देवाला सहानुभूती वाटते. आणि ज्यांना वाईट वागणूक दिली जाते अशा त्याच्या उपासकांबद्दल तो म्हणतो: “माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे; . . . त्यांचे क्लेश मी जाणून आहे.” (निर्गम ३:७) यहोवाचे कोमल गुण समजल्यानंतर मी माझं जीवन त्याला समर्पण करायचा निर्णय घेतला. १९९८ मध्ये मी यहोवाचा साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला.

मला ज्यांनी आपल्या घरात राहायला घेतलं ते बांधव

माझा बाप्तिस्मा होऊन एक वर्ष झाल्यानंतर मी एसक्विंट्ला शहरात अंधांसाठी असलेला कोर्स केला. माझ्या गावी असताना मला सभांना यायला जमत नाहीए, हे माझ्या मंडळीतल्या वडिलांना कळलं. ते जोडपं मला जिथून भेटायला यायचं तिथं एक मंडळी होती. तीच माझ्या गावापासून सर्वात जवळची मंडळी होती. या जोडप्याला मला भेटायला यायला, कितीतरी किलोमीटर चालत यावं लागायचं आणि डोंगर पार करावे लागायचे. त्यामुळं इतक्या दूरवर असलेल्या मंडळीत मला जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग वडिलांनी, एसक्विंट्ला शहरात राहणाऱ्या एका साक्षीदार कुटुंबाला मला मदत करायला सांगितलं. या कुटुंबानं मला त्यांच्या घरात घेतलं आणि मंडळीच्या सभांना यायला मदत केली. आजही मी त्यांच्याच घरात राहत आहे. घरातील एखाद्या सदस्याप्रमाणं ते माझी खूप काळजी घेतात.

मंडळीतले बंधुभगिनी माझ्यावर खरोखर प्रेम करतात याची कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. या सर्वामुळं माझी खातरी पटली आहे, की यहोवाचा साक्षीदार या नात्यानं आज मी खऱ्या ख्रिश्चनांच्या संगतीत आहे.—योहान १३:३४, ३५.

मला झालेला फायदा:

आता मला पूर्वीसारखं निरुपयोगी किंवा आशा नसल्याप्रमाणं वाटत नाही. माझ्या जीवनात आता उद्देश आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या बायबल शिक्षणाच्या कार्यात मी पूर्ण वेळेचा एक सेवक आहे. माझ्या शारीरिक दुर्बलतेवर जास्त विचार करत बसण्याऐवजी मी, लोकांना बायबलमधील अमूल्य सत्य शिकवण्यावर माझं लक्ष केंद्रित करतो. तसंच, ख्रिस्ती मंडळीत मला वडील या नात्यानं सेवा करण्याचा आणि स्थानिक मंडळ्यांमध्ये बायबलवर आधारित भाषणं देण्याचा बहुमान मिळाला आहे. हजारो लोक उपस्थित असतात अशा प्रांतीय अधिवेशनांत बायबलवर आधारित भाषणं देण्याचा सुहक्कसुद्धा मला मिळाला!

माझ्या ब्रेल बायबलचा उपयोग करून मी भाषण देतो

२०१० साली एल साल्वाडॉर येथे भरलेल्या सेवा प्रशिक्षण प्रशालेतून (आता या प्रशालेला, ‘सुवार्तिकांसाठी प्रशाला’ असं म्हटलं जातं) मी यशस्वी रीत्या प्रशिक्षण पूर्ण केलं. या प्रशालेमुळं मंडळीत मिळालेल्या जबाबदाऱ्या मी आणखी चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. प्रशालेत भाग घेता आल्यामुळं, यहोवा देवाला माझी खरोखर किंमत आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे हे मला जाणवलं. त्याच्या कामासाठी तो कुणालाही प्रशिक्षण देऊ शकतो.

“घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे,” असं येशूनं म्हटलं. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) मी म्हणू शकतो, की मी खरोखरच आनंदी आहे. मी इतरांना मदत करू शकेन, असं मी पूर्वी स्वप्नातसुद्धा कधी पाहिलं नव्हतं. पण आज मी इतरांना मदत करू शकतो! ▪ (w15-E 10/01)

^ परि. 13 देवानं दुष्ट परिस्थिती अजूनपर्यंत का काढून टाकली नाही याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचा ११ वा अध्याय पाहा.