बायबलने बदललं जीवन
मला मरण नको होतं!
-
जन्म: १९६४
-
देश: इंग्लंड
-
पार्श्वभूमी: किशोरवयात आई झालेली आणि स्वछंदी जीवन जगणारी
माझं आधीचं जीवन
माझा जन्म खूप लोकसंख्या असलेल्या लंडनमधल्या पॅडिंगटन या ठिकाणी झाला. मी माझ्या आईसोबत आणि तीन मोठ्या बहिणींसोबत राहायचे. माझ्या बाबांना दारूचं व्यसन असल्यामुळे ते कधी घरी यायचे तर कधी बाहेरच राहायचे.
मी लहान असताना, माझ्या आईने मला रोज रात्री प्रार्थना करायला शिकवलं. माझ्याकडे एक लहान बायबल होतं ज्यामध्ये फक्त स्तोत्रांचं पुस्तक होतं. मला ती स्तोत्रं गाता यावी, म्हणून त्यांना मी स्वतःच चाली लावल्या. मला एकदा माझ्या शाळेतल्या पुस्तकातून एक वाक्य वाचल्याचं आठवतं, जे माझ्या मनात घर करून बसलं: “एके दिवशी आपल्या जीवनात उद्याचा दिवस नसेल.” या शब्दांमुळे मी रात्रभर जागी राहून भविष्याबद्दल विचार करू लागले. ‘जीवन म्हणजे यापेक्षा जास्त काहीतरी आहे. माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे?’ असा मी विचार करायचे. मला मरण नको होतं!
मला भूतविघेबद्दल खूप जिज्ञासा वाटू लागली. मी मेलेल्या व्यक्तींशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, शाळेतल्या मित्रमैत्रिणींसोबत कब्रस्थानात जायचे, त्यांच्यासोबत भुतांचे चित्रपट बघायचे. आम्हाला या गोष्टींची भीती तर वाटायची, पण त्या आवडतदेखील होत्या.
मी दहा वर्षांची झाले तेव्हापासून स्वछंदी जीवन जगू लागले. मी सिगरेट ओढायला सुरुवात केली आणि मला लगेच त्याचं व्यसन लागलं. त्यानंतर मी गांजा ओढू लागले. अकरा वर्षांची होईपर्यंत मी दारू प्यायला सुरुवात केली होती. मला जरी दारूची चव आवडत नसली, तरी त्यातली नशा मला आवडायची. मला संगीत आणि डान्स करायलादेखील आवडत होतं. मी नेहमी पार्ट्यांमध्ये आणि नाईट क्लब्समध्ये जायचे. मी रात्री कुणाला न सांगता हळूच घरातून निघायचे आणि दिवस सुरू व्हायच्या थोडा वेळ आधी कुणाच्या नकळत घरी यायचे. दुसऱ्या दिवशी मी खूप दमलेले असल्यामुळे बऱ्याचदा शाळा चुकवायचे. आणि जेव्हा कधी शाळेत जायचे तेव्हा तिथंदेखील लपून दारू प्यायचे.
शाळेच्या शेवटच्या वर्षी मला खूप कमी मार्क मिळाले. त्यामुळे माझी आई माझ्यावर खूप रागावली आणि निराश झाली. तिला माझ्या स्वछंदी वागण्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. आमचं भांडण झालं आणि मी घरातून पळून गेले. मी काही वेळ माझा बॉयफ्रेंड टोनी, याच्यासोबत राहिले. तो चोरी करायचा, ड्रग्स विकायचा आणि खूप रागीट स्वभावाचा होता. लवकरच मी गरोदर राहिले आणि फक्त सोळाव्या वर्षी मी आमच्या मुलाला जन्म दिला.
बायबलने जीवन कसं बदललं?
मी जेव्हा लग्न न झालेल्या मातांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी असलेल्या हॉस्टेलमध्ये राहात होते, तेव्हा तिथं पहिल्यांदा यहोवाच्या साक्षीदारांशी माझी भेट झाली. मला स्थानिक अधिकाऱ्यांनी तिथं एक खोली दिली होती. दोन यहोवाच्या साक्षीदार बहीणी, तिथं काही तरुण मातांना भेटायला नेहमी यायच्या. एके दिवशी मी त्यांच्या चर्चेत भाग घेतला. मला साक्षीदारांना चुकीचं ठरवायचं होतं. पण त्यांनी माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं शांतपणे आणि स्पष्टपणे बायबलमधून दिली. त्या खूप प्रेमळ होत्या आणि ही गोष्ट मला खूप आवडली. म्हणून मी स्वतः त्यांच्यासोबत बायबल अभ्यास करायला तयार झाले.
लवकरच मी बायबलमधून असं काही शिकले ज्यामुळे माझं जीवन पार बदलून गेलं. लहानपणापासून मी मरणाला घाबरत होते. पण आता मला येशूच्या पुनरुत्थानाच्या शिकवणीबद्दल कळलं! (योहान ५:२८, २९) आणि हेदेखील कळलं, की देव वैयक्तिक रितीने माझी काळजी करतो. (१ पेत्र ५:७) खासकरून यिर्मया २९:११ मधले शब्द माझ्या काळजाला भिडले. तिथं म्हटलं आहे: “परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो; ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत; ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.” मला याच पृथ्वीवर नंदनवनात कायम जगण्याची आशा आहे, या गोष्टीवर माझा विश्वास पटला.—स्तोत्र ३७:२९.
यहोवाच्या साक्षीदारांनी माझ्यावर खरं प्रेम दाखवलं. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्या सभेला गेले तेव्हा तिथलं चांगलं वातावरण मला खूप आवडलं. सर्व जण खूप मनमिळाऊ होते! (योहान १३:३४, ३५) मला आमच्या चर्चमध्ये जी वागणूक मिळाली त्यापेक्षा हे खूप वेगळं होतं. माझी परिस्थिती खूप वाईट होती, तरी साक्षीदारांनी माझं स्वागत केलं. त्यांनी मला वेळ दिला, माझी काळजी घेतली, माझ्याकडे लक्ष दिलं आणि माझी मदतदेखील केली. मी एका मोठ्या प्रेमळ कुटुंबाची सदस्य असल्यासारखं मला वाटू लागलं.
बायबलचा अभ्यास केल्यावर मला कळलं, की देवाच्या उच्च नैतिक स्तरांचं पालन करण्यासाठी मला माझ्या जीवनात बदल करावे लागतील. सिगरेट सोडणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. त्याच वेळी मला हे जाणवलं की मी जेव्हा विशिष्ट प्रकारचं संगीत ऐकायचे तेव्हा मला गांजा ओढण्याची खूप इच्छा व्हायची, म्हणून मी दुसरं संगीत ऐकू लागले. मला दारूपासून दूर राहायचं होतं. दारू पिण्याचा मोह होऊ नये म्हणून मी पार्ट्यांमध्ये आणि नाईट क्लब्समध्ये जाणं बंद केलं. आणि मी अशा लोकांशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला जे मला माझं नवीन जीवन जगण्यासाठी मदत करू शकतील.—नीतिसूत्रे १३:२०.
याच काळात टोनीदेखील यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करू लागला. साक्षीदारांनी जेव्हा त्याच्या प्रश्नांची उत्तरं बायबलमधून दिली, तेव्हा त्याचीही खातरी पटली की हेच सत्य आहे. त्याने आपल्या आयुष्यात मोठमोठे बदल केले: त्याने आपल्या हिंसक मित्रांची संगती सोडून दिली, चोरी करणं थांबवलं आणि गांजा ओढण्याचं सोडून दिलं. यहोवाला पूर्णपणे खूश करण्यासाठी आणि आमच्या मुलाला चांगल्या वातावरणात वाढवण्यासाठी, आम्हाला आमचं अनैतिक जीवन सोडावं लागेल हे आम्हाला कळलं. म्हणून आम्ही १९८२ मध्ये लग्न केलं.
आता मी भविष्याबद्दल आणि मरणाबद्दल काळजी करत, रात्रभर जागी राहात नाही
मला आठवतं की मी टेहळणी बुरूजात आणि सावध राहा! * नियतकालिकात अशा लोकांच्या जीवन कथा शोधायचे, ज्यांनी आपल्या जीवनात यशस्वीपणे असे बदल केले होते, जे मला माझ्या जीवनात करायचे होते. मला त्यांच्या उदाहरणातून खूप प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे मला सतत प्रयत्न करत राहण्यासाठी आणि हार न मानण्यासाठी बळ मिळायचं. यहोवाने माझ्याबाबतीत सहनशीलता दाखवावी यासाठी मी सतत प्रार्थना करायचे. मी आणि टोनीने जुलै १९८२ मध्ये यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतला.
मला झालेला फायदा
यहोवा देवासोबतच्या मैत्रीमुळेच माझं जीवन वाया जाण्यापासून वाचलं आहे. कठीण परिस्थितीत यहोवा आपली नेहमी मदत करतो हे मला आणि टोनीला अनुभवता आलं. समस्यांचा सामना करताना आम्ही यहोवावर अवलंबून राहायला शिकलो आणि त्याने नेहमी आमच्या कुटुंबाची मदत केली आणि आमचा सांभाळ केला.—स्तोत्र ५५:२२.
आमच्या मुलाला आणि मुलीला यहोवाबद्दल शिकवण्यात, मला नेहमीच खूप आनंद मिळाला आहे. त्यांच्या मुलांनादेखील यहोवाबद्दल शिकताना पाहून मला तोच आनंद होतो.
आता मी भविष्याबद्दल आणि मरणाबद्दल काळजी करत, रात्रभर जागी राहात नाही. आता टोनी आणि मी यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना भेटून, त्यांना प्रोत्साहन देण्याचं कामात कायम व्यस्त असतो. आम्ही या मंडळ्यांतील सर्वांसोबत मिळून, लोकांना संदेश देतो की, जर त्यांनी येशूवर विश्वास ठेवला तर तेदेखील सर्वकाळच्या जीवनाचा आनंद घेऊ शकतील.
^ परि. 17 ही प्रकाशनं देखील यहोवाचे साक्षीदार प्रकाशित करतात.