व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | बायबल वाचनातून जास्त फायदा मिळवा

वाचनाची सुरुवात कशी कराल?

वाचनाची सुरुवात कशी कराल?

कोणत्या मार्गाने आपल्याला बायबल वाचनातून आनंद आणि पुरेपूर फायदा मिळू शकतो? खाली असे पाच सल्ले मार्ग दिले आहेत ज्यांमुळे बऱ्याच जणांना मदत झाली आहे.

योग्य वातावरण तयार करा. शांत जागा शोधा. वाचन करताना तुमचं लक्ष विचलित होऊ देऊ नका. चांगला प्रकाश, मोकळी हवा असलेल्या ठिकाणी वाचन केल्याने जास्त फायदा होऊ शकतो.

योग्य दृष्टिकोन ठेवा. बायबल हे आपल्या स्वर्गातील पित्याकडून आहे. जर आपला दृष्टिकोन, प्रेमळ आई-वडिलांकडून शिकण्यासाठी तयार असलेल्या लहान मुलासारखा असला, तर आपल्याला वाचनातून फायदा होईल. बायबलविषयी तुमच्या मनात काही पूर्वग्रह किंवा नकारात्मक विचार असतील तर ते काढून टाका. असं केल्याने, देवाला तुम्हाला शिकवता येईल.—स्तोत्र २५:४.

वाचन करण्याआधी प्रार्थना करा. बायबलमध्ये देवाचे विचार दिले आहेत. त्यामुळे यात शंका नाही की ते समजण्यासाठी आपल्याला त्याची मदत लागेल. जे मागतात त्यांना देव, “पवित्र आत्मा” देण्याचं वचन देतो. (लूक ११:१३) पवित्र आत्म्यामुळे देवाचे विचार जाणून घ्यायला आपल्याला मदत होते. तसंच हळूहळू “देवाच्या गहन गोष्टींचाही शोध” घेण्यासाठी आपलं मन तयार होतं.—१ करिंथकर २:१०.

अर्थपूर्ण वाचन करा. फक्त वरवरचं वाचन करू नका. तुम्ही जे वाचत आहात त्याबद्दल विचार करा. स्वतःला असे प्रश्न विचारा: ‘ज्या व्यक्तीबद्दल मी वाचत आहे तिच्यात कोणकोणते चांगले गुण आहेत? हे गुण मी माझ्या जीवनात कसे लागू करू शकतो?’

ठरावीक ध्येयं ठेवा. बायबल वाचनातून फायदा व्हावा यासाठी, वाचन करताना अशा गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे तुमचं जीवन समृद्ध होईल. तुम्ही पुढील ध्येयं ठेवू शकता: ‘देवाबद्दल मला आणखी जाणून घ्यायचं आहे.’ ‘मला एक चांगली व्यक्ती, चांगला पती, किंवा चांगली पत्नी बनायचं आहे.’ मग त्यानुसार बायबलमधून असे भाग शोधा जे तुम्हाला ही ध्येयं गाठण्यास मदत करतील. *

वर दिलेले पाच सल्ले तुम्हाला बायबल वाचन सुरुवात करायला मदत करतील. पण तुम्ही बायबल वाचनाची आवड कशी वाढवू शकता? पुढील लेखात याविषयी काही सल्ले दिले आहेत.

^ परि. 8 बायबलमधून कोणते भाग वाचायचे हे ठरवणं जर तुम्हाला कठीण वाटत असेल, तर यहोवाच्या साक्षीदार तुम्हाला आनंदाने मदत करतील.