पाठ ३५
हन्ना प्रार्थनेत देवाकडे मुलगा मागते
एलकाना नावाचा एक इस्राएली पुरुष होता. त्याच्या दोन पत्नी होत्या. एकीचं नाव हन्ना आणि दुसरीचं पनिन्ना होतं. पण, एलकानाचं हन्नावर जास्त प्रेम होतं. हन्नाला एकही मूल नव्हतं. पनिन्नाला बरीच मुलं होती. त्यामुळे पनिन्ना हन्नाला सारखी चिडवायची. एलकाना दरवर्षी आपल्या कुटुंबाला घेऊन उपासना करण्यासाठी शिलोला जायचा. कारण निवासमंडप शिलोमध्ये होता. एकदा तिथे असताना त्याने पाहिलं, की हन्ना खूप दुःखी आहे. तो तिला म्हणाला: ‘हन्ना, रडू नकोस. मी आहे ना तुझ्यासोबत. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.’
नंतर, हन्ना प्रार्थना करण्यासाठी एकटीच निवासमंडपात गेली. तिने रडून-रडून यहोवाकडे मदत मागितली. प्रार्थनेत तिने यहोवाला वचन दिलं: ‘यहोवा, जर मला एक मुलगा झाला, तर त्याला मी आयुष्यभर तुझ्या सेवेसाठी देईन.’
हन्ना हुंदके देऊन रडत असताना महायाजक एलीचं तिच्याकडे लक्ष गेलं. त्याला वाटलं, की ती दारू प्यायली आहे आणि नशेत आहे. पण, हन्ना एलीला म्हणाली: ‘नाही प्रभू! मी नशेत नाही. खरंतर, माझ्यासमोर एक खूप मोठी समस्या आहे. आणि मी यहोवाला त्याबद्दलच सांगत होते.’ एलीला कळलं की त्याचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे तो तिला म्हणाला: ‘तू देवाजवळ आता जे काही मागितलं आहेस, ते देव तुला देवो.’ हे ऐकून हन्नाला खूप बरं वाटलं आणि ती तिथून निघून गेली. त्यानंतर, एका वर्षाच्या आत तिला मुलगा झाला. तिने त्याचं नाव शमुवेल ठेवलं. हन्ना किती खूश झाली असेल, नाही का?
हन्नाने यहोवाला जे वचन दिलं होतं, ते ती विसरली का? नाही. शमुवेल थोडा मोठा झाला आणि त्याने आईचं दूध प्यायचं सोडलं, तेव्हा हन्ना त्याला निवासमंडपात सेवा करण्यासाठी घेऊन गेली. तिने महायाजक एलीला म्हटलं: ‘तुम्हाला आठवतं मी यहोवाला प्रार्थना करत होते, ती याच मुलासाठी. आयुष्यभर यहोवाची सेवा करण्यासाठी मी त्याला देत आहे.’ दरवर्षी एलकाना आणि हन्ना, शमुवेलला भेटायला जायचे. तेव्हा ते त्याच्यासाठी बिनबाह्यांचा एक नवीन झगासुद्धा घेऊन जायचे. नंतर, यहोवाने हन्नाला आणखी तीन मुलं आणि दोन मुली दिल्या.
“मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल.”—मत्तय ७:७