पाठ २०
आज नियमन मंडळ कशा प्रकारे कार्य करते?
पहिल्या शतकात “यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग” यांचा एक लहान गट नियमन मंडळ या नात्याने कार्य करत होता. हा गट सर्व अभिषिक्त ख्रिस्ती मंडळ्यांच्या वतीने महत्त्वाचे निर्णय घ्यायचा. (प्रेषितांची कृत्ये १५:२) तो शास्त्रवचनांनुसार व देवाच्या आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार एकमताने निर्णय घ्यायचा. (प्रेषितांची कृत्ये १५:२५) आज आपल्या काळातही त्याच नमुन्याचे पालन केले जाते.
देवाची इच्छा पूर्ण करण्यास नियमन मंडळाचा उपयोग केला जातो. नियमन मंडळातील बांधवांना देवाच्या वचनाबद्दल गाढ प्रेम असते आणि व्यावहारिक व आध्यात्मिक बाबी हाताळण्याचा विलक्षण अनुभव असतो. जगभरातील बंधुसमाजाच्या गरजांविषयी चर्चा करण्यासाठी नियमन मंडळाची दर आठवडी सभा असते. पहिल्या शतकाप्रमाणेच आजही हे मंडळ पत्रांद्वारे किंवा प्रवासी पर्यवेक्षकांद्वारे व इतरांद्वारे आपल्याला बायबलवर आधारित मार्गदर्शन पुरवते. यामुळे देवाच्या लोकांच्या विचारांत व कार्यांत एकता टिकून राहते. (प्रेषितांची कृत्ये १६:४, ५) नियमन मंडळ आध्यात्मिक अन्न तयार करण्याच्या कार्याची देखरेख करते व राज्य प्रचार कार्याला महत्त्व देण्याचे सर्वांना उत्तेजन देते. तसेच जबाबदारीच्या पदांवर बांधवांची नेमणूक करण्याच्या कार्याचीही ते देखरेख करते.
नियमन मंडळ देवाच्या आत्म्याचे मार्गदर्शन तत्परतेने स्वीकारते. नियमन मंडळातील बांधव मार्गदर्शनासाठी सार्वभौम सत्ताधारी यहोवा आणि मंडळीचे मस्तक येशू ख्रिस्त यांच्यावर विसंबून राहतात. (१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२३) हे बांधव स्वतःला देवाच्या लोकांचे पुढारी समजत नाहीत. इतर अभिषिक्त ख्रिश्चनांसोबत, “जेथे कोठे कोकरा [येशू] जातो तेथे त्याच्यामागे” ते जातात. (प्रकटीकरण १४:४) नियमन मंडळातील बांधवांसाठी आपण करत असलेल्या प्रार्थनांची ते कदर करतात.
-
पहिल्या शतकात नियमन मंडळामध्ये कोण लोक होते?
-
नियमन मंडळ आज देवाचे मार्गदर्शन कसे मिळवते?