व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हे पुस्तक भरवसालायक आहे का?

हे पुस्तक भरवसालायक आहे का?

हे पुस्तक भरवसालायक आहे का?

“इतर कोणत्याही धर्मेतर [लौकिक] इतिहासापेक्षा मला बायबलमध्ये विश्‍वसनीयतेचे अधिक खात्रीलायक चिन्हे आढळतात.”—सर आयझॅक न्यूटन, सुविख्यात इंग्रज शास्त्रज्ञ.

हे पुस्तक—अर्थात बायबल—भरवसालायक आहे का? त्यात उल्लेख करण्यात आलेले लोक वास्तविक होते का, त्यातली स्थाने खरोखर अस्तित्वात होती का, शिवाय त्यात वर्णिलेल्या घटना खरोखरच घडल्या होत्या का? असे असल्यास, हे पुस्तक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक लेखकांनी लिहिल्याचा पुरावा असलाच पाहिजे. पुरावा नक्कीच आहे. बहुतेक पुरावे जमिनीखालून बाहेर काढण्यात आले आहेत आणि त्याहीपेक्षा अधिक पुरावे तर या पुस्तकातच दडलेले आहेत.

पुराव्यांचा शोध

बायबल प्रदेशांच्या उत्खननात प्राचीन हस्तकृती गवसल्यामुळे बायबलच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक अचूकतेला दुजोरा मिळाला आहे. पुरातत्त्ववेत्त्यांनी खणून काढलेल्या पुराव्यांपैकी काही पुरावे विचारात घ्या.

कालांतराने इस्राएलाचा राजा बनलेला धैर्यवान षोडशवयीन मेंढपाळ दावीद बायबलच्या वाचकांना चांगलाच परिचयाचा आहे. त्याचे नाव बायबलमध्ये १,१३८ वेळा आढळते, आणि सहसा दावीदाच्या राजघराण्याविषयी बोलताना वापरलेली ‘दावीदाचे घराणे’ ही संज्ञा—२५ वेळा आढळते. (१ शमुवेल १६:१३; २०:१६) तथापि, दावीदाच्या अस्तित्वाविषयी असणाऱ्‍या बायबलमधील पुराव्याखेरीज कोणताही सुस्पष्ट पुरावा अगदी अलीकडच्या काळापर्यंत उपलब्ध नव्हता. दावीद हे केवळ एक काल्पनिक व्यक्‍तिचित्र होते का?

१९९३ साली, प्राध्यापक अव्रआम बीरान यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्‍या पुरातत्त्ववेत्त्यांच्या एका समूहाला थक्क करून सोडणारा एक शोध लागला; याचा वृत्तान्त इस्राएल अन्वेषण माहितीपत्रकात (इंग्रजी) प्रकाशित करण्यात आला. इस्राएलच्या उत्तरेकडील प्रदेशांत तेल डॅन नावाच्या एका पुरातन टेकडीच्या स्थळी एक बेसाल्ट शिला त्यांच्या हाती लागली. तिच्यावर ‘दावीदाचे घराणे’ आणि “इस्राएलचा राजा” हे शब्द कोरलेले आहेत. हा शिलालेख, सा.यु.पू. नवव्या शतकाच्या कालखंडातील असून, अरामी लोकांनी—म्हणजेच पूर्वेकडे राहणाऱ्‍या इस्राएलाच्या शत्रूंनी उभारलेल्या विजय स्मारकात या शिलालेखाचा समावेश होता असे म्हटले जाते. हा प्राचीन शिलालेख एवढा महत्त्वाचा का आहे?

प्राध्यापक बीरान आणि त्यांचे सहकारी प्राध्यापक योसफ नावेह यांनी लिहिलेल्या वृत्तावर आधारित असणाऱ्‍या बायबलच्या प्राचीनवस्तुशास्त्रासंबंधी समालोचन (इंग्रजी) यातील एका लेखात असे म्हणण्यात आले: “बायबलच्या व्यतिरिक्‍त इतर कोणत्याही प्राचीन शिलालेखात दावीदाचे नाव आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे.” a या शिलालेखात आणखी एक गोष्ट लक्षवेधक आहे. ‘दावीदाचे घराणे’ ही संज्ञा एकाच शब्दाच्या रूपात लिहिण्यात आलेली आहे. भाषा तज्ज्ञ प्राध्यापक ॲन्सन रेनी याविषयी खुलासा करतात: “खास करून शब्दसमूह सुपरिचित विशेषनाम असते त्यावेळेस त्या शब्दांना जोडणारा शब्द . . . सहसा गाळण्यात येतो. ‘दावीदाचे घराणे’ हे सा.यु.पू. नवव्या शतकाच्या मध्यात राजकीय आणि भौगोलिक दृष्टिकोनातून निश्‍चितपणे असेच एक सुपरिचित विशेषनाम होते.” म्हणजेच दावीद राजा आणि त्याचे राजघराणे हे प्राचीन जगात सुविख्यात होते हे उघड सत्य आहे.

बायबलमध्ये उल्लेखण्यात आलेली अश्‍शूरची महानगरी—निनवे—खरोखर अस्तित्वात होती का? अगदी अलीकडच्या काळापर्यंत, म्हणजे १९ व्या शतकाच्या सुरवातीपर्यंत काही बायबल टिकाकार असे मानायला तयार नव्हते. पण १८४९ साली, सर ऑस्टन हेन्री लेयर्ड यांनी केलेल्या उत्खननातून कुयुंजिक या ठिकाणी राजा सन्हेरीब याचा राजमहाल उजेडात आला; हे स्थळ पुरातन निनवेचा भाग असल्याचे शाबीत झाले. अशाप्रकारे याबाबतीत टिकाकारांचे म्हणणे खोडून काढण्यात आले. तथापि, येथील अवशेषांसोबत आणखी बरीचशी माहिती उजेडात आली. एका अपोत्थित खोलीच्या भिंतींवर एका तटबंदी शहराचा पाडाव आणि विजयी राजापुढे युद्धकैद्यांची मिरवणूक दाखविणारे एक चित्र होते. राजाच्या चित्रावर असा खोदीव लेख आढळतो: “सन्हेरीब, जगाचा राजा, अश्‍शूरचा राजा, निमेडू-सिंहासनावर बसून लाखीशच्या (लॅ-की-सू) (येथून आणलेल्या) लुटीचे परीक्षण करताना.”

हे चित्र आणि हा खोदीव लेख ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात पाहायला मिळतो; २ राजे १८:१३, १४ येथे आढळणाऱ्‍या, लाखीश या यहुदाच्या शहरावर सन्हेरीब याने मिळवलेल्या विजयाच्या बायबल वृत्तान्ताशी या चित्राचा आणि लेखाचा मेळ बसतो. या शोधाच्या महत्त्वाविषयी लेयर्ड यांनी लिहिले: “निनवेच्या स्थळी असलेल्या मातीच्या आणि केरकचऱ्‍याच्या ढिगाऱ्‍याखाली, [यहुदाचा राजा] हिज्कीया आणि सन्हेरीब यांच्यात झालेल्या युद्धांचा अहवाल, त्यातल्या त्यात ही युद्धे झाली त्याचवेळेस, खुद्द सन्हेरीब याने लिहिलेला आणि बायबलमध्ये अभिलिखित असणाऱ्‍या वृत्तान्तातील बारीकसारीक गोष्टींनाही दुजोरा देणारा अहवाल सापडेल, असे कोणालाही वाटले असते का?”

पुरातत्त्ववेत्त्यांनी उत्खनन करून बाहेर काढलेल्या इतर बऱ्‍याचशा हस्तकृती बायबलच्या अचूकपणाची खात्री पटवून देतात, उदाहरणार्थ मातीच्या वस्तू, वास्तुशिल्पांचे अवशेष, मातीच्या पट्ट्या, मुद्रा, दस्तऐवज, स्मारके आणि खोदीव लेख. उत्खनन करणाऱ्‍यांना अब्राहाम जेथे राहात होता ते वाणिज्यिक आणि धार्मिक केंद्रस्थान असणारे ऊर हे खास्द्यांचे नगर गवसले आहे. (उत्पत्ति ११:२७-३१) १९ व्या शतकात सापडलेल्या नबोनिडसच्या बखरीत सा.यु.पू. ५३९ मध्ये महान राजा कोरेश याने केलेल्या बाबेलाच्या पाडावाचे वर्णन आढळते; याच घटनेचा वृत्तान्त दानीएलच्या ५ व्या अध्यायातही आढळतो. पुरातन थेस्सलनीका येथे एका कमानीखालून जाणाऱ्‍या रस्त्यावर सापडलेल्या एका शिलालेखात (याचे काही तुकडे ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात जतन करण्यात आलेले आहेत) काही नगर अधिकाऱ्‍यांची नावे आहेत ज्यांना “पॉलिटार्ख्स” म्हणण्यात आलेले आहे; हा शब्द पारंपरिक ग्रीक लिखाणांत कोठेही आढळत नसला तरीसुद्धा बायबल लेखक लूक याने मात्र तो उपयोगात आणला आहे.१० (प्रेषितांची कृत्ये १७:६, NW, तळटीप) अशाप्रकारे, इतर बारीकसारीक गोष्टींच्या बाबतीत ज्याप्रकारे यापूर्वीही लूकचा अचूकपणा शाबीत झाला होता तोच प्रकार पुन्हा घडला.—पडताळा लूक १:३.

तथापि, पुरातत्त्ववेत्त्यांचे बायबलशी तर सोडाच, पण एकमेकांशीसुद्धा नेहमी एकमत असतेच असे नाही. तरीसुद्धा, स्वतः बायबलमध्ये ते एक भरवसालायक पुस्तक आहे याविषयीचा सबळ पुरावा दडलेला आहे.

प्रामाणिक अहवाल

सात्त्विक इतिहासकार (सन्हेरीब याने लाखीश हस्तगत केले त्याविषयीच्या शिलालेखाप्रमाणे) केवळ विजयच नव्हे तर पराजय देखील अभिलिखित करतात, केवळ यशोगाथाच वर्णित नाहीत तर अपयशांचा देखील अहवाल देतात, केवळ जमेच्या बाजूंवरच प्रकाश टाकत नाहीत तर कमकुवतपणा देखील प्रामाणिकपणे लोकांपुढे मांडतात. तथापि, लौकिक इतिहासाच्या वृत्तान्तांत अशी प्रामाणिकता अभावानेच आढळते.

अश्‍शूरी इतिहासकारांविषयी, डॅनियल डी. लकनबिल स्पष्टीकरण देतात: “सहसा शाही अहंकारापुढे ऐतिहासिक अचूकपणाचा बळी दिलेला स्पष्ट दिसून येतो.”११ अश्‍शूरी राजा अशुरनासिरपाल याच्याविषयीच्या ऐतिहासिक वृत्तान्तात आढळणारे हे आत्मस्तुतीचे शब्द याचेच उदाहरण आहेत: “मी वैभवशाली आहे, मी थोर आहे, मी अत्युच्च आहे, मी सामर्थ्यशाली आहे, मी बहुमानित आहे, मी महिमावान आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे, मी शक्‍तिशाली आहे, मी पराक्रमी आहे, मी सिंहासारखा शूर आहे, आणि मी पुरुषोत्तम आहे!”१२ अशाप्रकारच्या ऐतिहासिक वृत्तान्तात वाचलेले सर्वकाही अचूक इतिहास असल्याचे तुम्ही मानाल का?

याउलट, बायबलच्या लेखकांनी दाखवलेला प्रामाणिकपणा अत्यंत नाविन्यपूर्ण होता. इस्राएलचा नेता, मोशे याने आपला भाऊ अहरोन व बहीण मिर्याम, आपले पुतणे नादाब व अबीहू यांच्यासहित आपल्या लोकांच्याही दोषांविषयी स्पष्टपणे लिहिले; तसेच त्याने स्वतःच्या हातून घडलेल्या चुका देखील अंधारात ठेवल्या नाहीत. (निर्गम १४:११, १२; ३२:१-६ लेवीय १०:१, २ गणना १२:१-३; २०:९-१२; २७:१२-१४) राजा दावीद याच्या गंभीर चुकांवर पांघरूण न घालता त्या अभिलिखित करण्यात आल्या—त्यासुद्धा दावीद गादीवर असतानाच. (२ शमुवेल, अध्याय ११ व २४) स्वतःच्याच नावाचे पुस्तक लिहिणारा मत्तय, (त्याच्या सहित) सर्व प्रेषित कशाप्रकारे वैयक्‍तिक महत्त्वाच्या मुद्द्‌यावर वाद घालत असत याविषयी आणि येशूला अटक झाली त्या रात्री त्यांनी कसे त्याला सोडून दिले होते याविषयी आपल्याला माहिती देतो. (मत्तय २०:२०-२४; २६:५६) ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील पत्रांच्या लेखकांनी आरंभीच्या ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये लैंगिक अनैतिकता आणि फाटाफूट यांसारख्या विविध समस्या असल्याचे कबूल केले. शिवाय, त्यांनी या समस्यांविषयी लिहिताना अनावश्‍यक पाल्हाळ लावला नाही.—१ करिंथकर १:१०-१३; ५:१-१३.

अशाप्रकारचा सडेतोड, सुस्पष्ट अहवाल दिल्यामुळे, लेखकाला सत्याविषयी प्रांजळ आवड असल्याचे दिसून येते. ज्याअर्थी बायबल लेखकांनी आपल्या जवळच्या माणसांविषयी, आपल्या लोकांविषयी, एवढेच काय तर स्वतःविषयीही अननुकूल माहितीचे वृत्त देताना मागेपुढे पाहिले नाही त्याअर्थी त्यांच्या लिखाणांवर भरवसा ठेवण्यात तथ्य नाही का?

अचूक तपशील

न्यायालयीन खटल्यांमध्ये एखाद्या साक्षीदाराने दिलेल्या साक्षीची विश्‍वासार्हता सहसा बारीकसारीक तपशीलांच्या आधारावर ठरवता येते. या लहानमोठ्या तपशीलांत सुसंगतता असल्यास ती साक्ष अचूक आणि प्रांजळ ठरते, तर दुसरीकडे पाहता गंभीर विसंगती आढळल्यास ती तयार केलेली खोटी साक्ष असल्याचे सिद्ध होऊ शकते. तसेच, खुलासा करताना, अतिशय खबरदारीने एकेक शब्द निवडून—प्रत्येक तपशीलाचा विचारपूर्वक बंदोबस्त लावलेला असल्यास, अशा वृत्तान्तातूनही—खोट्या साक्षीचे पितळ उघडे पडू शकते.

बायबल लेखकांची “साक्ष” या बाबतीत कितपत कसोटीस उतरते? बायबल लेखकांच्या लिखाणांत उल्लेखनीय सुसंगतता आढळते. बारीकसारीक तपशीलांतही विलक्षण एकवाक्यता आहे. तथापि, अशाप्रकारची ही सुसंगतता मुद्दामहून घडवून आणण्यात आलेली नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारची कटबाजी झाली असावी असा संशय येत नाही. उलट समान अहवालांतही पूर्वयोजनेचा अभाव प्रकर्षाने जाणवतो, सहसा हे लेखक अनाहूतपणे परस्परांच्या एकमतात असतात. काही उदाहरणे पाहा.

बायबल लेखक मत्तयाने लिहिले: “नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले.” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय ८:१४) मत्तयाने येथे एक रोचक पण अनावश्‍यक तपशीलाचा समावेश केला आहे, तो असा की: पेत्र विवाहित होता. या किरकोळ तपशीलास पौल पुष्टी देतो, तो लिहितो: “इतर प्रेषित . . . व केफा ह्‍यांच्याप्रमाणे मलाही एखाद्या ख्रिस्ती बहिणीला लग्नाची पत्नी करून घेऊन तिला बरोबर नेण्याचा हक्क नाही काय?” b (१ करिंथकर ९:५, द न्यू इंग्लिश बायबल) संदर्भावरून असे दिसते की पौलाची विनाकारण टीका केली गेली असताना तो स्वतःच्या रक्षणार्थ प्रत्युत्तर देत होता. (१ करिंथकर ९:१-४) स्पष्टपणे, पेत्र विवाहित होता—या लहानशा तपशीलाचा उल्लेख पौलाने मत्तयाच्या वृत्तान्ताला दुजोरा देण्यासाठी मुद्दामहून केलेला नव्हता, पण हे आपोआपच घडून आले.

मत्तय, मार्क, लूक व योहान—या चौघाही शुभवर्तमान लेखकांनी नमूद केले आहे की येशूला अटक होण्याच्या रात्री त्याच्या एका शिष्याने तलवार काढून मुख्य याजकाच्या एका दासावर वार केल्यामुळे त्या माणसाचा कान कापला गेला होता. यांपैकी केवळ योहानाच्या शुभवर्तमानात एक अनावश्‍यक भासणारा बारीक तपशील नोंदलेला आहे: “त्या दासाचे नाव मल्ख होते.” (योहान १८:१०, २६) एकट्या योहानानेच त्या माणसाच्या नावाचा उल्लेख का करावा बरे? काही वचनांनंतर याच अहवालात आणखी एक किरकोळ तपशील आढळतो जो इतरत्र सापडत नाही: योहान हा “प्रमुख याजकाच्या ओळखीचा होता.” तो प्रमुख याजकाच्या सबंध घराण्याच्याही ओळखीचा होता; याजकाचे दास त्याच्या परिचयाचे होते आणि तो त्यांच्या परिचयाचा होता. (योहान १८:१५, १६) अशा परिस्थितीत योहानाने त्या दुखापत झालेल्या माणसाचा नावाने उल्लेख करावा हे तर स्वाभाविकच होते; पण अर्थातच इतर शुभवर्तमान लेखकांना तो माणूस अनोळखी असल्यामुळे त्यांनी तसे केले नाही.

काही वेळा, एखादा वृत्तान्त देताना सविस्तर खुलासा करण्यात आलेला नाही पण तो इतरत्र, सहज केलेल्या विधानांतून मिळतो. उदाहरणार्थ, यहुदी सन्हेद्रिनापुढे येशूच्या चौकशीच्या मत्तयातील वृत्तान्तात म्हटले आहे की तेथे उपस्थित असणाऱ्‍या काहींनी “त्याला चपडाका मारून म्हटले, अरे ख्रिस्ता, आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले?” (तिरपे वळण आमचे.) (मत्तय २६:६७, ६८) मारणारा पुढे उभा असताना कोणी मारले हे “अंतर्ज्ञानाने सांग” असे त्यांनी येशूला का म्हणावे बरे? मत्तय याविषयी खुलासा करीत नाही. तथापि शुभवर्तमान लेखकांपैकी इतर दोघे हा वगळलेला तपशील पुरवतात: येशूला चपडाका मारण्यात आल्या त्याआधी त्याला छळणाऱ्‍यांनी त्याचे तोंड झाकले होते. (मार्क १४:६५; लूक २२:६४) मत्तयाने मात्र प्रत्येक तपशील पुरवण्यात आला आहे किंवा नाही याची काळजी न करता आपले साहित्य मांडले.

येशूची शिकवण ऐकण्याकरता लोकांनी मोठी गर्दी केली होती त्या घटनेविषयी योहानाचे शुभवर्तमान सांगते. अहवालानुसार, ती गर्दी पाहून येशू “फिलिप्पाला म्हणाला, ह्‍यांना खावयाला आपण भाकरी कोठून विकत आणाव्या?” (तिरपे वळण आमचे.) (योहान ६:५) तेथे उपस्थित असलेल्या सर्व शिष्यांना न विचारता येशूने, भाकरी कोठून विकत आणाव्यात हे फिलिप्पालाच का विचारले? लेखक याचे उत्तर देत नाही. तथापि, याच्या समांतर अहवालात लूक असे वृत्त देतो की ही घटना गालील समुद्राच्या उत्तरेकडील किनाऱ्‍यांवर वसलेल्या बेथ्‌सैदा या नगराजवळ घडली, आणि यापूर्वी योहानाच्या शुभवर्तमानात सांगण्यात आलेले आहे, ‘फिलिप्प हा बेथ्‌सैदाचा होता.’ (योहान १:४४; लूक ९:१०) यामुळे ज्याचे मूळचे गाव जवळ होते अशालाच येशूचे विचारणे यथातथ्य होते. तपशीलांमध्ये आढळणारी एकवाक्यता अद्‌भुत आहे, पण त्याचवेळेस ती अगदीच निर्हेतूक होती.

काही ठिकाणी विशिष्ट तपशील वगळल्यामुळे त्या त्या बायबल लेखकाच्या विश्‍वासार्हतेत उलट भरच पडते. उदाहरणार्थ, १ राजे या पुस्तकाचा लेखक इस्राएलातील भयंकर दुष्काळाविषयी सांगतो. दुष्काळ एवढा भयंकर होता की पुरेसे पाणी आणि गवत न मिळाल्यामुळे राजाच्या घोड्यांवर आणि खेचरांवर शेवटी मरण्याची पाळी आली. (१ राजे १७:७; १८:५) पण, त्याच अहवालात पुढे संदेष्टा एलिया अंदाजे १,००० चौरस मीटरचे क्षेत्रफळ असलेली खळगी भरू शकेल इतके पाणी कर्मेल पर्वतावर (एका यज्ञाच्या संबंधाने उपयोगात आणण्याकरता) त्याच्यासमोर आणावे अशी मागणी करतो असेही वृत्त आहे. (१ राजे १८:३३-३५) ऐन दुष्काळात, एवढे पाणी आले तरी कोठून? १ राजे पुस्तकाच्या लेखकाने याविषयी खुलासा करण्याची तसदी घेतली नाही. तथापि, इस्राएलात राहणाऱ्‍या प्रत्येकाला याविषयी माहिती होती की कर्मेल हे भूमध्य समुद्राच्या तटाशी आहे, शिवाय याच वृत्तात नंतर आलेल्या एका विधानातूनही याविषयी अनायासे संकेत मिळतो. (१ राजे १८:४३) अर्थातच, समुद्रातील पाणी सहज उपलब्ध झाले असावे. अन्य ठिकाणी तपशीलवार माहिती पुरवणारे हे पुस्तक वस्तुस्थितीच्या नावाखाली निव्वळ काल्पनिक साहित्य असल्यास याचा लेखक नक्कीच थापा मारण्यात चांगलाच तरबेज असावा; पण असे असल्यास त्याने आपल्या लेखनात इतक्या सहज लक्षात येण्यासारखी तफावत कशी काय राहू दिली असती बरे?

तर मग, बायबल भरवसालायक आहे का? बायबल हे वास्तविक लोकांविषयी, खरोखरच्या ठिकाणांविषयी आणि सत्य घटनांविषयी सांगते याची खात्री पटवून देणाऱ्‍या भरपूर प्राचीन हस्तकृती पुरातत्त्ववेत्त्यांनी गोळा केल्या आहेत. तरीसुध्दा, स्वतः बायबलमध्ये दडलेला पुरावा अधिक प्रभावकारी आहे. याच्या प्रामाणिक लेखकांनी निर्मम सत्ये अभिलिखित करताना—कोणाचीही गय केली नाही—अगदी स्वतःचीही नाही. लिखाणांमध्ये आढळणारी अंतर्गत सुसंगतता, शिवाय, पूर्वयोजना न करता आपोआप जुळून आलेल्या समानता, यांमुळे ही “साक्ष” खरी असल्याचे लगेच लक्षात येते. बायबलमध्ये ‘विश्‍वसनीयतेची इतकी खात्रीलायक चिन्हे’ असल्यामुळे हे पुस्तक निश्‍चितच तुमच्या भरवशाच्या लायक आहे.

[तळटीपा]

a हा शोध लागल्यानंतर, प्राध्यापक आन्द्रे लमेर यांनी माहिती दिली की १८६८ साली सापडलेला मेशा स्टेला (उर्फ मोॲबाइट शिलालेख) यावरील अस्पष्ट झालेल्या एका वाक्यात दुरुस्ती करण्यात आल्यावर त्यातही ‘दावीदाचे घराणे’ असा उल्लेख असल्याचे दिसून येते.

b “केफा” हे यहुदी भाषेत “पेत्र” याऐवजी वापरतात.—योहान १:४२.

[१५ पानांवरील चित्र]

तेल डॅन शिलालेखाचा तुकडा

[१६, १७ पानांवरील चित्र]

२ राजे १८:१३, १४ येथे उल्लेखित लाखीशला घातलेल्या वेढ्याचे रेखाटन करणारी अश्‍शूरी भिंत