उत्पत्ती ३९:१-२३

  • पोटीफरच्या घरात योसेफ (१-६)

  • योसेफ पोटीफरच्या बायकोला नकार देतो (७-२०)

  • योसेफ तुरुंगात (२१-२३)

३९  इश्‍माएली+ लोक योसेफला इजिप्तला घेऊन आले.+ तिथे पोटीफर+ नावाच्या इजिप्तच्या एका माणसाने त्याला त्यांच्याकडून विकत घेतलं. पोटीफर हा फारोच्या दरबारातला एक अधिकारी आणि पहारेकऱ्‍यांचा प्रमुख होता. २  पण यहोवा योसेफसोबत होता.+ त्यामुळे, त्याला यश मिळत गेलं आणि त्याला त्याच्या मालकाच्या घरावर कारभारी म्हणून नेमण्यात आलं. ३  यहोवा त्याच्यासोबत आहे आणि यहोवा त्याला सर्व गोष्टींत यश देत आहे, हे त्याच्या मालकाने पाहिलं. ४  योसेफचा मालक त्याच्यावर खूप खूश होता आणि तो त्याचा सगळ्यात भरवशाचा सेवक बनला. म्हणून त्याने योसेफला आपल्या घरावर अधिकारी नेमलं आणि आपला सर्व कारभार त्याच्या हाती सोपवला. ५  योसेफ त्या घराचा कारभार पाहू लागला, तेव्हापासून यहोवा इजिप्तमधल्या त्याच्या मालकाच्या घरावर आशीर्वाद देत राहिला. त्याच्या मालकाच्या सर्व घरादारावर आणि शेतीवाडीवर यहोवाचा आशीर्वाद होता.+ ६  हळूहळू त्याने आपल्या मालकीचं सर्वकाही योसेफला सोपवून दिलं आणि आपण काय खावं, हे ठरवण्याशिवाय तो इतर कोणत्याही गोष्टीची चिंता करत नव्हता. योसेफ आता उंचापुरा आणि देखणा झाला होता. ७  काही काळाने, योसेफच्या मालकाची बायको त्याच्याकडे आकर्षित झाली आणि ती त्याला म्हणाली: “माझ्याशी संबंध ठेव.” ८  पण त्याने नकार दिला आणि तो म्हणाला: “माझ्या मालकांनी घराचा सर्व कारभार माझ्या ताब्यात दिला आहे. आणि त्यामुळे ते घरातल्या कोणत्याही गोष्टीची चिंता करत नाहीत. ९  या घरात मलाच सर्वात जास्त अधिकार आहे आणि तुम्हाला सोडून बाकी सर्वकाही त्यांनी माझ्या हातात दिलं आहे, कारण तुम्ही त्यांच्या पत्नी आहात. तर मग, इतकं मोठं वाईट काम करून मी देवाविरुद्ध पाप कसं करू?”+ १०  ती दररोज योसेफशी बोलायची, पण तो तिच्याशी संबंध ठेवायला किंवा तिच्यासोबत थांबायला कधीही तयार झाला नाही. ११  एकदा, तो काही कामासाठी घरात गेला, त्या वेळी घरात कोणीही नोकरचाकर नव्हते. १२  तेव्हा तिने त्याच्या अंगावरचं वस्त्र धरलं आणि ती म्हणाली: “माझ्याशी संबंध ठेव!” पण ते वस्त्र तिच्या हातात सोडून योसेफ तिथून बाहेर पळून गेला. १३  योसेफ वस्त्र आपल्या हातातच सोडून बाहेर पळून गेला हे पाहिल्यावर, १४  तिने आरडाओरडा करून घरातल्या माणसांना बोलावलं आणि ती त्यांना म्हणाली: “पाहा, यांनी या इब्री माणसाला आपला अपमान करण्यासाठी* इथे आणलं आहे. त्याला माझ्यासोबत संबंध ठेवायचे होते, पण मी मोठ्याने आरडाओरडा केला. १५  माझा आरडाओरडा ऐकून तो आपल्या अंगावरचं वस्त्र माझ्याजवळ सोडून बाहेर पळून गेला.” १६  मग त्याचा मालक घरी परत येईपर्यंत, तिने ते वस्त्र आपल्याजवळच ठेवलं. १७  मग तिने त्यालाही तीच गोष्ट सांगितली: “तुम्ही ज्या इब्री नोकराला इथे आणलंत, तो माझा अपमान करायला माझ्याकडे आला होता. १८  पण मी आरडाओरडा करू लागताच, तो आपल्या अंगावरचं वस्त्र माझ्याजवळ सोडून बाहेर पळून गेला.” १९  “तुमच्या सेवकाने माझ्यासोबत असं केलं,” हे बायकोचे शब्द ऐकताच योसेफचा मालक भडकला. २०  म्हणून त्याने योसेफला धरून, राजाच्या कैद्यांना जिथे ठेवलं जायचं त्या तुरुंगात टाकलं आणि योसेफ तिथेच राहिला.+ २१  पण यहोवा योसेफसोबत होता आणि तो त्याला एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला. त्यामुळे तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याची त्याच्यावर कृपा झाली.+ २२  तेव्हा तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याने योसेफला सर्व कैद्यांवर नेमलं. तोच त्यांच्याकडून सगळी कामं करून घ्यायचा.+ २३  योसेफवर सोपवलेल्या कोणत्याही कामाकडे तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याला लक्ष द्यावं लागायचं नाही, कारण यहोवा योसेफसोबत होता आणि तो जे काही करायचा त्यात यहोवा त्याला यश द्यायचा.+

तळटीपा

शब्दशः “आपल्यावर हसण्यासाठी.”