गणना ११:१-३५
११ मग लोक यहोवासमोर खूपच कुरकुर करू लागले. यहोवाने ती ऐकली, तेव्हा त्याचा राग भडकला आणि यहोवाकडून आग येऊन तिने छावणीच्या सीमेवर काही लोकांना भस्म केलं.
२ लोक मोशेला विनवणी करू लागले. तेव्हा त्याने यहोवाला याचना केली+ आणि ती आग विझली.
३ त्यामुळे त्या जागेला तबेरा* असं नाव पडलं, कारण तिथे त्यांच्यावर यहोवाकडून आलेली आग भडकली होती.+
४ मग त्यांच्यातल्या विदेश्यांना+ खायची हाव सुटली+ आणि इस्राएली लोकही पुन्हा रडू लागले आणि म्हणाले: “आम्हाला मांस कोण खायला देईल?+
५ इजिप्तमध्ये कसे फुकटात मासे खायला मिळायचे, याची आम्हाला खूप आठवण येते; कलिंगड, कांदे, लसूण, काकड्याही खायला मिळायच्या!+
६ पण आता तर आम्ही* वाळत चाललोय. या मान्नाशिवाय काहीच दिसत नाही इथे!”+
७ मान्ना+ दिसायला धण्यासारखा+ आणि झाडाच्या डिंकासारखा* होता.
८ लोक चारही दिशांना जाऊन तो गोळा करायचे आणि तो जात्यावर दळायचे किंवा उखळीत कुटायचे. मग लोक ते पीठ भांड्यांत उकळायचे किंवा त्यापासून भाकरी बनवायचे.+ त्याची चव तेल लावलेल्या गोड पोळीसारखी होती.
९ रात्री छावणीवर दव पडायचं, तेव्हा मान्नाही पडायचा.+
१० मोशेने लोकांना आपल्या कुटुंबांसोबत रडताना ऐकलं. प्रत्येक माणूस आपापल्या तंबूच्या दाराजवळ रडत होता. हे पाहून यहोवाला संताप आला.+ मोशेलाही खूप राग आला.
११ म्हणून मोशे यहोवाला म्हणाला: “तू आपल्या या दासाला दुःख का देत आहेस? मी असं काय केलंय, की तू माझ्यावर कृपा करत नाहीस? या सर्व लोकांचा भार तू माझ्यावर का टाकलास?+
१२ हे लोक काय माझ्या पोटचे आहेत? मी त्यांना जन्म दिलाय का, की तू मला सांगतोस, ‘तान्ह्या बाळाची काळजी घेणारा जसा त्याला आपल्या छातीशी धरतो, तसं त्यांना आपल्या छातीशी धरून,’ त्यांच्या वाडवडिलांना वचन दिलेल्या देशात ने?+
१३ हे लोक सतत माझ्यासमोर, ‘आम्हाला खायला मांस दे,’ असं रडगाणं गात राहतात. मी इतक्या लोकांसाठी मांस कुठून आणू?
१४ आता या सगळ्या लोकांचा भार मला एकट्याला झेपत नाही. आणखी सहन होत नाही मला!+
१५ तू माझ्याशी असाच वागणार असशील, तर मला आत्ताच मारून टाक.+ पण जर तुझी माझ्यावर कृपा असेल, तर मला आणखी दुःख दाखवू नकोस.”
१६ तेव्हा यहोवा मोशेला म्हणाला: “इस्राएलच्या वडीलजनांमधून, तुझ्या माहितीतल्या* ७० वडिलांना आणि अधिकाऱ्यांना निवड+ आणि त्यांना भेटमंडपाजवळ नेऊन आपल्यासोबत उभं कर.
१७ मी खाली येऊन+ तिथे तुझ्याशी बोलीन+ आणि तुझ्यावर असलेल्या पवित्र शक्तीतली* काही काढून+ त्यांना देईन; म्हणजे ते तुला या लोकांचा भार उचलायला मदत करतील आणि तुला त्यांचा भार एकट्याला उचलावा लागणार नाही.+
१८ तू लोकांना सांग, ‘उद्यासाठी स्वतःला शुद्ध करा.+ तुम्हाला नक्की मांस खायला मिळेल कारण यहोवाने तुमचं रडणं ऐकलंय.+ तुम्ही म्हणालात: “आम्हाला मांस कोण खायला देईल? आम्ही इजिप्तमध्ये होतो तेच बरं होतं.”+ आता यहोवा तुम्हाला नक्कीच मांस देईल आणि तुम्ही ते खाल.+
१९ एक दिवस, दोन दिवस, पाच दिवस, दहा किंवा वीस दिवस नाही,
२० तर अख्खा महिनाभर तुम्ही ते खाल; अगदी तुमच्या नाकपुड्यांतून ते बाहेर येईपर्यंत आणि तुम्हाला त्याची किळस येईपर्यंत खाल.+ कारण, तुमच्यामध्ये राहणाऱ्या यहोवा देवाला तुम्ही नाकारलं. आणि तुम्ही त्याच्यासमोर रडत असं म्हणाला: “आम्ही इजिप्तमधून का बाहेर आलो?”’”+
२१ तेव्हा मोशे म्हणाला: “माझ्यासोबत ६,००,००० पुरुष* आहेत+ आणि तरीही तू म्हणतोस, ‘मी त्यांना इतकं मांस देईन, की ते महिनाभर खातील’!
२२ गुराढोरांचे आणि मेंढरांचे कळपच्या कळप कापले, तरी त्यांचं मांस यांना पुरेल का? किंवा समुद्रातले सगळे मासे जरी पकडले, तरी त्यांना ते पुरतील का?”
२३ मग यहोवा मोशेला म्हणाला: “यहोवाचा हात इतका तोकडा आहे का?+ मी जे बोललो ते घडतं की नाही, हे आता तू बघशील.”
२४ यानंतर मोशेने बाहेर जाऊन यहोवाने जे सांगितलं, ते लोकांना कळवलं. मग त्याने इस्राएली लोकांच्या वडीलजनांतून ७० माणसांना निवडलं आणि त्यांना भेटमंडपाभोवती उभं केलं.+
२५ त्यानंतर यहोवा ढगात खाली आला+ आणि मोशेशी बोलला.+ मग त्याने मोशेवर असलेल्या पवित्र शक्तीतली* काही काढून+ ती त्या ७० वडिलांपैकी प्रत्येकाला दिली. पवित्र शक्ती त्यांच्यावर येताच, ते संदेष्ट्यांसारखे वागू लागले,*+ पण त्यानंतर त्यांनी पुन्हा तसं केलं नाही.
२६ त्या माणसांपैकी दोन जण अजूनही छावणीतच होते. त्यांची नावं एलदाद आणि मेदाद होती. ज्यांची नावं लिहिण्यात आली होती, त्यांत हे दोघंही होते, पण ते भेटमंडपाजवळ गेले नव्हते. त्यामुळे, ते छावणीत असतानाच पवित्र शक्ती त्यांच्यावर आली आणि ते संदेष्ट्यांसारखे वागू लागले.
२७ तेव्हा एका तरुणाने धावत जाऊन मोशेला सांगितलं, “एलदाद आणि मेदाद छावणीत संदेष्ट्यांसारखे वागत आहेत!”
२८ यावर, तरुण वयापासून मोशेची सेवा करणारा, नूनचा मुलगा यहोशवा+ मोशेला म्हणाला: “प्रभू, थांबव त्यांना!”+
२९ पण मोशे त्याला म्हणाला: “आता माझं काय होईल याची तुला काळजी वाटते का? काळजी करू नकोस. माझी तर इच्छा आहे, की यहोवाचे सगळेच लोक संदेष्टे असावेत आणि यहोवाने त्या सर्वांना आपली पवित्र शक्ती* द्यावी!”
३० नंतर मोशे इस्राएलच्या वडीलजनांसोबत छावणीत परत गेला.
३१ मग, यहोवाकडून आलेल्या वाऱ्यामुळे समुद्रावरून लावे* आले आणि ते छावणीभोवती पडू लागले;+ ते इतके होते, की छावणीच्या दोन्ही बाजूला एकेका दिवसाच्या प्रवासाच्या अंतरापर्यंत त्यांचा सुमारे दोन हात* उंचीचा थर जमला.
३२ त्यामुळे लोकांनी दिवसभर लावे गोळा केले; ते रात्रभर जागून दुसऱ्या दिवशीही लावे गोळा करत राहिले. कोणीही दहा होमरपेक्षा* कमी गोळा केले नाहीत आणि त्यांनी ते छावणीभोवती सगळीकडे पसरवून ठेवले.
३३ पण मांस त्यांच्या तोंडात असतानाच, त्यांनी ते चावण्याआधीच यहोवाचा राग त्यांच्यावर भडकला आणि यहोवाने मोठी पीडा आणून त्यांचा नाश केला.+
३४ म्हणून, त्यांनी त्या जागेला किब्रोथ-हत्तव्वा*+ असं नाव दिलं, कारण खायची हाव सुटलेल्या लोकांना त्यांनी तिथे पुरलं होतं.+
३५ किब्रोथ-हत्तव्वा इथून इस्राएली लोक हसेरोथ इथे जायला निघाले आणि त्यांनी तिथे मुक्काम केला.+
तळटीपा
^ म्हणजे, “जळणं,” भडका; ज्वाला.
^ किंवा “आमचे जीव.”
^ शब्दशः “गुग्गुळाचा डिंक.” मोत्यासारखा दिसणारा एक पारदर्शक पदार्थ.
^ किंवा “ज्यांना तू ओळखतोस अशा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “६,००,००० पायदळ,” म्हणजे, युद्धासाठी योग्य असे पुरुष.
^ किंवा “भविष्यवाणी करू लागले.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ एक लहानसा १८ सें.मी. (७ इंच) लांबीचा गुबगुबीत पक्षी, ज्याचं मांस खूप चविष्ट असतं.
^ म्हणजे, “हाव सुटलेल्या लोकांना पुरण्याच्या जागा.”