यिर्मया २९:१-३२

  • बाबेलमधल्या बंदिवानांना यिर्मयाचं पत्र (१-२३)

    • इस्राएल ७० वर्षांनंतर परत येईल (१०)

  • शमायासाठी संदेश (२४-३२)

२९  नबुखद्‌नेस्सर राजाने ज्या लोकांना यरुशलेममधून बाबेलला बंदी बनवून नेलं होतं, त्या सगळ्या लोकांना, त्यांच्यामध्ये उरलेल्या वडीलजनांना, याजकांना आणि संदेष्ट्यांना यिर्मया संदेष्ट्याने यरुशलेमहून एक पत्र पाठवलं. २  त्याने हे पत्र राजा यखन्या,+ राजमाता,+ राजदरबारी, यहूदा व यरुशलेमचे अधिकारी; तसंच, कारागीर आणि धातूकाम करणारे* यांना यरुशलेममधून बंदिवासात नेण्यात आलं त्यानंतर पाठवलं.+ ३  यहूदाचा राजा सिद्‌कीया+ याने ज्यांना बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्याकडे बाबेलला पाठवलं होतं, त्या दोघांच्या हातून, म्हणजे शाफानचा+ मुलगा एलासा आणि हिल्कीयाचा मुलगा गमरयाह यांच्या हातून यिर्मयाने ते पत्र पाठवलं. पत्रात असं लिहिलं होतं: ४  “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा बंदिवासात असलेल्या सगळ्या लोकांना, म्हणजे ज्यांना त्याने यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात पाठवलं त्या सगळ्यांना असं म्हणतो, ५  ‘घरंदारं बांधा आणि त्यांत राहा. मळे लावा आणि त्यांची फळं खा. ६  लग्न करा आणि मुलाबाळांना जन्म द्या. तुमच्या मुला-मुलींचीही लग्नं करून द्या, म्हणजे त्यांनाही मुलंबाळं होतील. तिथे तुमची संख्या कमी होऊ देऊ नका; ती वाढू द्या. ७  मी ज्या शहरात तुम्हाला बंदी म्हणून पाठवलंय, त्याच्या भल्यासाठी प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. कारण तिथे जर शांती असेल, तर तुम्हीपण शांतीत राहाल.+ ८  इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “तुमच्यामध्ये असलेल्या तुमच्या संदेष्ट्यांना आणि शकुन पाहणाऱ्‍यांना तुमची फसवणूक करू देऊ नका.+ तसंच, स्वप्नं पाहणाऱ्‍यांचंही ऐकू नका. ९  कारण ‘ते माझ्या नावाने तुम्हाला खोट्या भविष्यवाण्या सांगतात. मी त्यांना पाठवलेलं नाही,’+ असं यहोवा म्हणतो.”’” १०  “यहोवा म्हणतो, ‘तुम्हाला बाबेलमध्ये राहून ७० वर्षं पूर्ण झाल्यावर मी तुमच्याकडे लक्ष देईन.+ आणि तुम्हाला या ठिकाणी परत आणायचं माझं वचन मी पूर्ण करीन.’+ ११  यहोवा म्हणतो, ‘तुमच्यासाठी माझे काय विचार आहेत, हे मला चांगलं माहीत आहे. ते विचार शांतीचे आहेत; संकटाचे नाहीत.+ ते तुम्हाला चांगलं भविष्य आणि आशा देणारे आहेत.+ १२  तुम्ही मला हाक माराल, माझ्याकडे येऊन प्रार्थना कराल आणि मी तुमचं ऐकेन.’+ १३  ‘तुम्ही मला शोधाल आणि मी तुम्हाला सापडेन.+ कारण तुम्ही अगदी मनापासून मला शोधाल.+ १४  हो, मी नक्की तुम्हाला सापडेन,’+ असं यहोवा म्हणतो. ‘मी तुमच्या बंदिवानांना गोळा करीन. आणि ज्या-ज्या राष्ट्रांमध्ये व ज्या-ज्या ठिकाणी मी तुमची पांगापांग केली, तिथून मी तुम्हाला एकत्र करीन,’+ असं यहोवा म्हणतो. ‘मी तुम्हाला ज्या ठिकाणाहून बंदिवासात पाठवलं, त्या ठिकाणी परत आणीन.’+ १५  तुम्ही मात्र म्हणता, ‘यहोवाने आमच्यासाठी बाबेलमध्ये संदेष्टे नेमले आहेत.’ १६  पण, दावीदच्या राजासनावर बसणाऱ्‍या राजाबद्दल+ आणि या शहरातल्या सगळ्या लोकांबद्दल, म्हणजे तुमच्यासोबत जे बंदिवासात गेले नाहीत त्या तुमच्या भाऊबंदांबद्दल यहोवा काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. १७  ‘सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ आणि रोगराई पाठतोय.+ मी त्यांना सडलेल्या* अंजिरांसारखं करतोय; कोणीही खाऊ शकणार नाही अशा खराब अंजिरांसारखं करतोय.”’+ १८  ‘मी तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने त्यांचा पाठलाग करीन.+ मी त्यांची अशी दशा करीन, की ती पाहून पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांना दहशत बसेल.+ मी राष्ट्रांमध्ये त्यांची पांगापांग करीन आणि ती राष्ट्रं त्यांना शापित समजतील, शिट्टी वाजवून त्यांची थट्टा करतील,+ त्यांना पाहून चकित होतील आणि त्यांची बदनामी करतील.+ १९  कारण मी वारंवार माझ्या सेवकांकडून, संदेष्ट्यांकडून त्यांना संदेश पाठवत राहिलो, पण त्यांनी तो ऐकला नाही,’ असं यहोवा म्हणतो.+ ‘आणि तुम्हीसुद्धा तो ऐकला नाही,’+ असं यहोवा म्हणतो. २०  म्हणून बंदिवासात असलेल्या लोकांनो! ज्यांना मी यरुशलेममधून बाबेलला पाठवलं, त्या लोकांनो! मी यहोवा काय म्हणतो ते ऐका. २१  माझ्या नावाने खोट्या भविष्यवाण्या करणारा+ कोलायाचा मुलगा अहाब आणि मासेयाचा मुलगा सिद्‌कीया यांच्याबद्दल इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो, ‘पाहा! मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याच्या हाती देईन. तो तुमच्या डोळ्यांदेखत त्यांना मारून टाकेल. २२  आणि त्यांच्या बाबतीत जे घडेल त्यावरून बाबेलमध्ये असलेले यहूदाचे बंदिवान एखाद्याला शाप देताना असं म्हणतील: “बाबेलच्या राजाने जसं सिद्‌कीया आणि अहाबला आगीत जाळलं, तसं यहोवा तुझ्या बाबतीत करो!” २३  कारण ते इस्राएलमध्ये निर्लज्जपणे वागले.+ त्यांनी आपल्या शेजाऱ्‍यांच्या बायकांशी व्यभिचार केला आणि मी आज्ञा केली नसताना माझ्या नावाने खोटा संदेश दिला.+ “या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत, आणि मी या गोष्टींचा साक्षीदार आहे,”+ असं यहोवा म्हणतो.’” २४  “आणि नेहेलमचा शमाया+ याला तू असं सांग, २५  ‘इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “तू यरुशलेममधल्या सगळ्या लोकांना, मासेयाचा मुलगा सफन्या+ याजक याला, आणि सर्व याजकांना स्वतःच्या नावाने पत्रं पाठवलीस आणि म्हणालास, २६  ‘यहोवाने यहोयादा याजकाच्या जागी तुला यहोवाच्या मंदिराची देखरेख करणारा म्हणून नेमलंय. आणि एखादा वेडा माणूस संदेष्ट्यासारखं वागू लागला, तर त्याचे हातपाय आणि डोकं खोड्यांत* अडकवण्याचा अधिकारही तुझ्याकडे आहे.+ २७  तर मग, तुमच्यासमोर संदेष्ट्यासारखं वागणाऱ्‍या अनाथोथच्या+ यिर्मयाला तू शिक्षा का नाही केलीस?+ २८  त्याने तर इथे बाबेलमध्येही आम्हाला असा संदेश पाठवलाय: “बंदिवास बराच काळ राहील! म्हणून घरंदारं बांधा आणि त्यांत राहा. मळे लावा आणि त्यांचं फळ खा,+​—”’”’” २९  सफन्या+ याजकाने यिर्मया संदेष्ट्यासमोर हे पत्र वाचून दाखवलं, ३०  तेव्हा यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: ३१  “बंदिवासात असलेल्या सगळ्या लोकांना असा संदेश पाठव, ‘नेहेलमचा शमाया याच्याबद्दल यहोवा असं म्हणतो: “मी शमायाला पाठवलं नाही. पण तरी त्याने तुम्हाला भविष्यवाणी सांगितली आणि खोट्या गोष्टींवर विश्‍वास ठेवायला लावला.+ ३२  म्हणून यहोवा म्हणतो, ‘पाहा! मी नेहेलमच्या शमायाला आणि त्याच्या वंशजांना शिक्षा करतोय. त्याच्या घराण्यातला एकही माणूस या लोकांमध्ये जिवंत राहणार नाही. मी माझ्या लोकांसाठी ज्या चांगल्या गोष्टी करणार आहे, त्या शमाया पाहणार नाही,’ असं यहोवा म्हणतो. ‘कारण त्याने लोकांना यहोवाविरुद्ध बंड करायला लावलंय.’”’”

तळटीपा

किंवा कदाचित, “सुरक्षा-भिंत बांधणारे.”
किंवा कदाचित, “फुटलेल्या.”