रोमकर यांना पत्र १२:१-२१

  • आपली शरीरं जिवंत बलिदान म्हणून अर्पण करा (१, २)

  • वेगवेगळी दानं, तरी एकच शरीर (३-८)

  • खऱ्‍या ख्रिस्ती जीवनासाठी सल्ला (९-२१)

१२  त्यामुळे बांधवांनो, मी देवाच्या करुणेने तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही आपली शरीरं+ जिवंत, पवित्र+ आणि देवाला स्वीकारयोग्य बलिदान म्हणून अर्पण करावीत. असं केल्यामुळे, तुम्हाला आपल्या विचारशक्‍तीने* पवित्र सेवा करता येईल.+ २  आणि यापुढे या जगाच्या व्यवस्थेचं* अनुकरण करू नका. तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या;+ म्हणजे, देवाची चांगली, स्वीकारयोग्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे याची तुम्हाला खातरी पटेल.+ ३  देवाकडून मिळालेल्या अपार कृपेने मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, की स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठं समजू नका.+ तर देवाने प्रत्येकाला जितका विश्‍वास* दिला आहे, त्याप्रमाणे स्वतःबद्दल समंजसपणे विचार करा.+ ४  कारण जसे आपल्या शरीरात बरेच अवयव आहेत,+ पण ते सगळे एकाच प्रकारचं काम करत नाहीत; ५  तसंच, आपणसुद्धा पुष्कळ असलो, तरी ख्रिस्तासोबतच्या ऐक्यामुळे एकच शरीर असून एकमेकांना जोडलेले अवयव आहोत.+ ६  देवाच्या अपार कृपेने आपल्याला वेगवेगळी दानं मिळाली आहेत.+ म्हणून, जर भविष्यवाणी करायचं दान मिळालं असेल, तर आपल्याला दिलेल्या विश्‍वासाप्रमाणे आपण भविष्यवाणी करू या; ७  किंवा सेवेचं दान असेल, तर सेवा करत राहू या; किंवा ज्याला शिकवण्याचं दान मिळालं आहे, त्याने शिकवत राहावं;+ ८  किंवा ज्याला प्रोत्साहन देण्याचं दान मिळालं आहे, त्याने प्रोत्साहन द्यावं.+ जो दान देतो,* त्याने ते उदारपणे द्यावं;+ जो नेतृत्व करतो,* त्याने ते मेहनतीने* करावं;+ आणि जो दया दाखवतो, त्याने ती आनंदाने दाखवावी.+ ९  एकमेकांवर खऱ्‍या मनाने प्रेम करा.*+ वाइटाचा द्वेष करा+ आणि चांगल्याला धरून राहा. १०  भावाभावांसारखं प्रेम करून एकमेकांबद्दल आपुलकी बाळगा. एकमेकांचा आदर करण्यात पुढाकार घ्या.+ ११  मेहनती* असा, आळशी असू नका.*+ पवित्र शक्‍तीद्वारे* आवेशी असा.+ यहोवाचे* दास होऊन त्याची सेवा करा.+ १२  आपल्या आशेमुळे आनंदी राहा. संकटात धीर धरा.+ प्रार्थना करत राहा.+ १३  पवित्र जनांच्या गरजा भागवायला हातभार लावा.+ पाहुणचार करत राहा.+ १४  तुमचा छळ करणाऱ्‍यांना आशीर्वाद देत राहा;+ आशीर्वादच द्या, शाप देऊ नका.+ १५  आनंद साजरा करणाऱ्‍यांसोबत आनंद साजरा करा; रडणाऱ्‍यांसोबत रडा. १६  तुम्ही स्वतःबद्दल जसा विचार करता, तसाच इतरांबद्दलही करा. मोठमोठ्या गोष्टींचा विचार करू नका,* तर हलक्या समजल्या जाणाऱ्‍या गोष्टी करायला तयार असा.+ स्वतःच्या नजरेत बुद्धिमान होऊ नका.+ १७  वाइटाबद्दल कोणाचं वाईट करू नका,+ तर सगळ्यांच्या दृष्टीने* जे चांगलं ते करण्याकडे लक्ष द्या. १८  शक्यतो, सगळ्यांसोबत होईल तितकं शांतीने राहा.+ १९  प्रिय बांधवांनो, सूड घेऊ नका, तर झालेल्या वाइटाबद्दल देवाला त्याचा क्रोध व्यक्‍त करू द्या.+ कारण असं लिहिलं आहे: “ ‘सूड घेणं माझं काम आहे, मी परतफेड करीन,’ असं यहोवा* म्हणतो.”+ २०  पण, “तुझा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खायला दे; तो तहानलेला असेल, तर त्याला पाणी दे; कारण असं केल्यामुळे तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्‍यांचा ढीग रचशील.”*+ २१  वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्‍याने वाइटाला जिंकत राहा.+

तळटीपा

किंवा “तर्कबुद्धीने.”
किंवा “सध्याच्या काळाचं.” शब्दार्थसूची पाहा.
किंवा “विश्‍वासाचा हिस्सा; वाटा”
किंवा “वाटतो.”
किंवा “पुढाकार घेतो.”
किंवा “आवेशाने.”
किंवा “तुमचं प्रेम ढोंगी नसावं.”
किंवा “आवेशी.”
किंवा “कामात टंगळमंगळ करू नका.”
अति. क५ पाहा.
किंवा “गोष्टींवर मन लावू नका.”
किंवा “नजरेत.”
अति. क५ पाहा.
म्हणजे, एखाद्याचं कठोर मन सौम्य करून त्याचा राग शांत करणं.