जागे राहा!
युक्रेनमधल्या युद्धामुळे जगात अन्नधान्याची तीव्र टंचाई
१९ मे २०२२ ला, संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीपुढे ७५ पेक्षा जास्त उच्च अधिकाऱ्यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, “जागतिक हवामानात होणारे बदल आणि कोव्हिड-१९ मुळे जगभरात निर्माण झालेली अन्नटंचाई आता युक्रेनमधल्या युद्धामुळे आणखीनच भीषण रूप धारण करत आहे.” त्यानंतर काही काळातच जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल माहिती देणाऱ्या द इकोनॉमिस्ट या मासिकाने असं म्हटलं की, “आधीच जगाची परिस्थिती खूप खराब आहे आणि आता तर या युद्धामुळे जग उपासमारीच्या दिशेने खूप वेगाने वाटचाल करत आहे.” बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं, की आपल्या काळात जगात अशा प्रकारची अन्नटंचाई निर्माण होईल. पण यासोबतच अशा परिस्थितींना तोंड देण्यासाठी ते आपल्याला काही व्यावहारिक सल्लेसुद्धा देतं.
बायबलमध्ये अन्नटंचाई आणि दुष्काळाबद्दल आधीच भविष्यवाणी केली होती
येशूने अशी भविष्यवाणी केली होती: “एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल. ठिकठिकाणी दुष्काळ पडतील.”—मत्तय २४:७.
बायबलमधल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात चार घोडेस्वारांबद्दल सांगितलं आहे. त्यातला एक घोडेस्वार युद्धाला सूचित करतो. त्यानंतर ज्या घोडेस्वाराबद्दल सांगितलंय तो दुष्काळाला सूचित करतो. म्हणजे अशा काळाला जेव्हा अन्नधान्य मिळणं मुश्कील होईल आणि धान्य विकणारे लोक थोड्या अन्नासाठी लोकांकडून खूप जास्त पैसे उकळतील. याबद्दल बायबलमध्ये असं लिहिलंय: “मला एक काळा घोडा दिसला आणि त्याच्यावर बसलेल्या स्वाराच्या हातात एक तराजू होता. मग, मला . . . एक आवाज ऐकू आला. तो म्हणाला: ‘एका दिनाराला [म्हणजे एका दिवसाच्या मजुरीला] एक माप गहू आणि एका दिनाराला तीन मापं जव” मिळेल.—प्रकटीकरण ६:५, ६.
अन्नटंचाई आणि दुष्काळाबद्दल बायबलमध्ये सांगितलेल्या भविष्यवाण्या आज पूर्ण होत आहेत. बायबलमध्ये या काळाला ‘शेवटचे दिवस’ असं म्हटलंय. (२ तीमथ्य ३:१) या ‘शेवटच्या दिवसांबद्दल’ आणि प्रकटीकरणात पुस्तकात सांगितलेल्या चार घोडेस्वारांबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी १९१४ पासून जगाचं बदललेलं चित्र हा व्हिडिओ पाहा. तसंच, चार घुड़सवार—ये कौन हैं? हा हिंदीतला लेख वाचा.
बायबल तुम्हाला कशी मदत करू शकतं?
बायबलमध्ये बरेच व्यावहारिक आणि चांगले सल्ले दिले आहेत. त्यामुळे महागाई आणि अन्नटंचाई यांसारख्या कठीण परिस्थितीला तोंड द्यायला आपल्याला मदत होते. असेच काही व्यावहारिक सल्ले कोणते आहेत ते पाहण्यासाठी “कम पैसों में कैसे करें गुज़ारा?” हा हिंदीतला लेख पाहा.
बायबल आपल्याला आशा देतं. त्यात सांगितलंय की लवकरच चांगली परिस्थिती येईल. त्यात देवाने असं अभिवचन दिलंय: “पृथ्वी भरपूर उपज देईल” आणि सर्वांना पोटभर अन्न मिळेल. (स्तोत्र ७२:१६) बायबलमधल्या या आशेबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी आणि तुम्ही त्यावर का विश्वास ठेवू शकता हे माहीत करून घेण्यासाठी, “आनेवाला कल सुनहरा होगा!” हा हिंदीतला लेख वाचा.